Monday, 25 April 2011

शिवाय मी पण जरा गावंढळच आहे.. .



माझा एक मित्र फारच गावंढळ आहे.
काल मी त्याला म्हटलं , " अरे आपले सत्यसाईबाबा गेले रे!"
तर म्हणतो कसा , " कोण सत्यसाईबाबा ?"
मला तर आश्चर्याचा धक्काच बसला .
मी म्हटलं, " तुला चक्क सत्य साईबाबा माहित नाहीत?"

यावर तो थोडा वरमला आणि गांगरून मला म्हणाला-

त्याचं काय आहे आमच्या गावाकडे ना  न्यूजपेपर येतो ना न्यूजटीवी दिसतो. 
माफ कर मला, पण मला खरच माहित नाही सत्यसाईबाबा कोण आहेत ते. 

 हां, पण मागच्या आठवड्यात सातपुड्यात तीन मुलं कुपोषणाने मेली ते माहित आहे मला.
नक्सलांच्या हल्ल्यात चार पोलीस आणि पोलिसांच्या गोळीबारात तेरा आदिवासी
ठार झालेत हे ही कानी आलंय माझ्या.....
पण सत्यसाईबाबाच म्हणशील तर.... माफ कर मला
त्याचं काय आहे आमच्या गावाकडे ना  न्यूजपेपर येतो ना न्यूजटीवी दिसतो. 
शिवाय मी पण जरा गावंढळच आहे.

नाही म्हणायला तुम्ही inflation का काय म्हणता ते ही थोडफार कळायला लागलंय  मला
भाकर महागली, डाळ महागली , कांदा महागला हे तर मला भोगून माहित आहे,
शिवाय देशात सध्या भ्रष्टाचाराविरुद्ध खूप काहीबाही चाललंय हे ही ऐकलय मी उडत उडत.
2-G , आदर्श, commonwealth , अण्णा हजारे वगैरे परिचित आहे मला......

पण सत्यसाईबाबाच म्हणशील तर.... माफ कर मला
त्याचं काय आहे आमच्या गावाकडे ना  न्यूजपेपर येतो ना न्यूजटीवी दिसतो. 
शिवाय मी पण जरा गावंढळच आहे.

शेजारच्या सुमीचं लग्न हुंड्यापायी मोडलं हे तर मी डोळ्यादेखत पाहिलंय
झालंच तर मांगवाड्यातल्या कोंडिबाचं घर पाटलाच्याच पोरानं पेटवून दिल्याचं पण आतून माहित आहे मला,
वाड्यामागच्या सोनाजीनं कर्जापायी इंड्रेल पिऊन जीव दिला हे तर सगळ्यात आधी मलाच ठावूक होतं
फार कशाला, एवढ्या डिग्र्या घेऊन , एवढं ग्यान घेउन तू पण आज पोटा-पाण्यासाठी वणवण भटकतोयस हे ही बघतोच आहे  मी.....

बाकी तुझ्या सत्यसाईबाबाच म्हणशील तर.... माफ कर मला
त्याचं काय आहे आमच्या गावाकडे ना  न्यूजपेपर येतो ना न्यूजटीवी दिसतो. 
शिवाय मी पण जरा गावंढळच आहे.

खरच मी गावंढळ आहे मित्रा!
चिल्लरचालर लोकांचे किडूक मिडूक दुखणे तेवढे माहित असतात मला,
पण तुम्हा थोरा-मोठ्यांच्या झगमगाटी गाथा मला माहित नसतात.....
त्याचं काय आहे,
आमच्या गावाकडे ना  न्यूजपेपर येतो ना न्यूजटीवी दिसतो. 
...शिवाय मी पण जरा गावंढळच आहे.