मुंबईतल्या अनेक गजबजलेल्या जागांपैकी ही एक जागा . हवेत समुद्राचा दमट वास , ओसंडून वाहणारी गर्दी , दाटीवाटीने उभी असलेली दुकाने ,उंचच उंच इमारती, कॉर्नरवरच्या चहाच्या टपर्या , बेवारस फिरणारी कुत्री , आणि असंख्य आवाज एकमेकात मिसळून तयार झालेला परिचित कोलाहल .
बायको क्लिनिकमध्ये पेशंट तपासत होती . माझी कामं उरकून मी तिला न्यायला आलो होतो . तिचं होतंय तोवर बाळाला घेउन मी क्लिनिकबाहेरच्या स्ट्रीटवर फेऱ्या मारायला लागलो . समोरच्या ग्यारेजवाल्याच्या दुकानातील धांदल टुकूटुकू बघत बाळ चांगलीच रमली होती . एवढ्यात कसल्याशा अनोळखी आवाजाने तिची तंद्री भंग पावली . टुणकन मान वर करून ती त्या आवाजाचा वेध घेऊ लागली . इथल्या गर्दीत असला आवाज अपेक्षितच नसल्यामुळे मी ही तिला घेऊन त्या आवाजाच्या दिशेनं गेलो . मार्केटच्या मुख्य रस्त्यावरून तो आवाज येत
होता . या आधी गावाकडेच ऐकलेला ... गुबू ..गुबू ..गुबू ...
मी आवाजाच्या दिशेनं नजर वळवली आणि बघितलं ....पोतराज !!!
कमरेच्या वर उघडेबंब अंग ,पिळदार शरीर , पाठीवरून मोकळे सोडलेले लांबसडक केस ,कपाळभरून कुंकवाचा मळवट , त्याखालचे उग्र डोळे , धारदार नाक , कमरेभोवती वेगवेगळ्या रंगांच्या कापडी झीरमाळ्याचे वस्त्र , पायात घुंगरू , ओल्या कुंकवाच्या रेषा ... आणि हातात धरलेला लांबलचक असूड!
त्याच्यासोबत त्याची बायको होती. फाटकं लुगडं नेसलेली , खांद्यावर दोरीनं अडकवलेला चामड्याचा ढोल, मानेवरून पोटावर बांधलेल्या कळकट कापडात सुकट चेहऱ्याचं तान्हं बाळ , आणि डोईवर मरीआई! तिचा चेहरा सावळा पण कोरीव होता. एका हातातली टिपरी चामड्यावर घासत ती वाजवीत होती -
गुबू ..गुबू ..गुबू ...
पोतराज मोकळ्या जागेत उभा राहायचा आणि नाचत नाचत चाबूक हवेत उंच फिरवायचा. चाबकाचा फटकारा त्याच्या पाठीवर बसताक्षणी काडकन आवाज व्हायचा. मग त्याची बायको दुकाना- दुकाना समोर उभी राहून मरिआईच्या नावानं दान मागायची. काहीजण द्यायचे , काहीजण फटकारून लावायचे ,काहीजण बघून न बघितल्यासारखं करायचे. काहीजणांच्या नजरा तिच्या फाटक्या वस्त्रामधून जे बघायचे ते बघून घेत होत्या. माझं लक्ष तिच्या झोळीतल्या बाळाकडे गेलं. धुळीनं माखून कळकट झालेलं ते बाळ कधी रडत होतं, कधी त्या झोळीच्या कापडाशी खेळत होतं. तिचं त्या बाळाकडे लक्ष नव्हतं.
पोतराज पुन्हा नवीन जागी उभा राहिला आणि नाचत नाचत त्याने कडाडकन चाबकाचा आवाज काढला . त्या आवाजासरशी माझ्या अंगावर शहारे आले आणि मला माझ्या लहानपणीचा पोतराज आठवला!
"आली आलिया मरीआई
तिचा कळंना आनभाव
भल्या भल्याचा घेती जीव
आली आलिया मरीआई "
भरदार आणि उग्र दिसणारा हा पोतराज गावात आला म्हणजे बायाबापड्यांची लेकराबाळांची एकच धांदल उडायची. ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या सावरीत आणि शेंबडी नाकं पुशीत आम्ही लेकरं मोठ्या उत्साहानं "पोतराज आला!" "पोतराज आला!" म्हणीत उड्या मारीत पोतराज बघायला पळत सुटायचो.पायातल्या घुंगराचा नाद करीत ठेका घेऊन पोतराज नाचायला लागला की आम्हा लेकरांना आभाळाएवढा आनंद होई . चाबूक हवेत फिरवून त्यानं पाठीवर 'कडाड' आवाज काढला की छातीत धड धड करी आणि तरी आम्ही दोन्ही डोळे विस्फारून पोतराजाकडे बघत रहायचो.
हा पोतराज शहरी पोतराजासारखा चिरमटलेला नसायचा . हा मिजाशीने गावात मिरवायचा . हक्काने घरा घरात जायचा . वाड्याच्या दारासमोर उभा राहून कडक आवाजात साद घालायचा-
'दार उघड बये दार उघड!"
त्या हाकेसरशी घरातल्या सवाशीण बायका, म्हातारी आजी- जी कुणी असेल ती -घाई गडबडीने हळदी कुंकुवाचा करंडा घेऊन, सुपात धान्य घेऊन, डोक्यावर पदर घेऊन मरीआईच्या दर्शनाला यायच्या. पोतराज मरीआईचा सांगावा घेऊन यायचा. कोणी काही नवस बोलला असेल तर बायका, म्हाताऱ्या पोतराजाची वाट बघायच्या. मग तो आला की मरीआईला साडी चोळी करून नवस फेडायच्या. आई पोतराजाच्या अंगात यायची आणि प्रसन्न होऊन वरदान द्यायची-
" इडा पीडा टळो. वंश वाढीला लागो. धन धान्याला बरकत येवो" .
मरीआई म्हणजे 'कडकलक्ष्मी'. तिचा 'सराप' वाईट असतो. तिचा कोप झाला तर घरात पडझड सुरु होते, माणसं, लेकरं, गुरं ढोरं दगावतात. म्हणून तिला खूष ठेवण्यासाठी माय मावल्या धडपड करायच्या. दान मिळालं की पोतराज खुश होई. मग नाचत नाचत गोल रिंगण घेई आणि आम्हा लेकरांकडे बघून पुन्हा एकदा चाबूक फिरवून पाठीवर आवाज काढी- कडाड!
तेव्हा आमच्या वाड्यात पोतराज यायचा, वासुदेव यायचा, गोंधळी यायचे...हे लोक पावसासारखे हवे हवेसे आणि विठ्ठलाइतके खरेखुरे वाटायचे !
इथे- मुंबईत- मात्र हा पोतराज फारच विजोड वाटत होता. आजूबाजूच्या चकचकीत इमारतीत, इमारतींप्रमाणेच वसकन अंगावर येणाऱ्या लोकांच्या नजरांमध्ये, इथल्या करकरीत अलिप्तपणात हा कसातरीच बेंगरूळ वाटत होता. रानात सुंदरपणे बागडणारं फुलपाखरू एखादे दिवशी बेडरूमच्या ट्यूबलाईट भोवती चिलटासारखं घिरट्या घालायला लागलं म्हणजे कसं ओंगळवानं वाटत तसं!
हा पोतराज त्याचं गाव सोडून इथे का आला असावा ?
कदाचित शहरामध्ये खूप पैसा असतो असं त्याला कुणीतरी सांगितलं असेल. कदाचित इथे तुला चांगला लौकिक मिळेल असं कुणीतरी म्हटलं असेल . कदाचित ही बाई दुसऱ्या जातीची असेल आणि तिच्याशी लग्न केलं म्हणून याला गावातल्या लोकांनी हाकलला असेल....तोंड लपवायला मुंबई सारखं शहर नाही. तुटून पडलेल्या सगळ्या लोकांसाठी आणि गावातून भिरकावून दिलेल्या सगळ्यांसाठी उकीरड्यासारखं, हे शहर म्हणजे एक वरदान आहे.
माझं लक्ष पोतराजाच्या चाबूक धरलेल्या हाताकडे गेलं. त्याचा अंगठा तुटलेला होता. गावातून रानावनातून निखळलेला हा एकलव्य शहरात आला होता. आणि तो एकटाच नाही, अख्खी एक संस्कृतीच विस्थापित होत होती.
त्याच्या बायकोने ताल धरला होता. हातातल्या दुसऱ्या टिपरीने ती आता वेगळाच ठेका वाजवीत होती-
डंग डंग डडांग- डांगचिक डडांग, डंग डंग डडांग- डांगचिक डडांग
मघाचं केविलवानं गुबू गुबू आता बंद झालं होतं आणि हे टिपेचं, घाबरवून सोडणारं संगीत सुरु झालं होतं.
आता ती दान मागत नव्हती. निर्विकार चेहऱ्याने सरळ समोरच्या डांबरी रस्त्याकडे बघून ती भेदक सूर वाजवीत होती-
डंग डंग डडांग - डांगचिक डडांग, डंग डंग डडांग - डांगचिक डडांग
जणूकाही सगळा बाजार त्या क्षणात गोठून बसलाय आणि त्याच्या पलीकडे जाउन ती एकटीच तिथे वाजवीत होती. तिच्या वाजवण्यात लोककथेतील पात्रांचा मनस्वीपणा होता. आपलं बाळ गळ्यात लटकवून जणू ती ह्या इमारतींना, ह्या शहरांना, ह्या संस्कृतीला प्रश्न विचारत होती.
" गावं खेडी भाकड झाली . जुने सांधे निखळले. पोतराज फुटून शहराकडे वळले."
डंग डंग डडांग - डांगचिक डडांग, डंग डंग डडांग - डांगचिक डडांग
" माये नाळ वाळून गेली, पान्हे सारे आटून गेले
मुळं पाळं खुडून गेले, भगत सारे बुडून मेले"
डंग डंग डडांग - डांगचिक डडांग, डंग डंग डडांग - डांगचिक डडांग
"रेट्यामध्ये जिरत चाललो, आम्ही आता मरत चाललो
देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो"
डंग डंग डडांग - डांगचिक डडांग, डंग डंग डडांग - डांगचिक डडांग
तिच्या या प्रश्नात अगतिकता नव्हती, याचना नव्हती की उपकाराची आस नव्हती. ती फक्त साऱ्या शहरानं दवंडी देत फिरत होती - 'आम्ही आता बुडत चाललो'.
तिच्या डोळ्यात रानावनातल्या अघोरी देवतांचं तेज उतरलं होतं.
गोठून बसलेल्या त्या क्षणाच्या बुडबुड्यातून काही इमारती सरसरून वर आल्या. आणि जादू ह्वावी तशा चमचम चमकत गगनाला भिडल्या. अजस्र अफाट महाकाय. .अमरवेलीसारख्या. क्षितिजापर्यंत लांबल्या. आसमंत व्यापून गेल्या.
आणि तेवढ्या त्या चिंचोळ्या डांबरी रस्त्यावर बाई वाजवीत राहिली . तिचा ठेका या सगळ्या जंजाळातून दुमदुमायला लागला.
डंग डंग डडांग - डांगचिक डडांग, डंग डंग डडांग - डांगचिक डडांग
आणि बघता बघता त्या बाईच्या पाठीमागे एक भल्ली मोठी रांग उभी राहिली. या रांगेत पोतराज होते, वासुदेव होते, गोंधळी होते, बोहारणी, कोल्हाटणी , अंगठा तुटलेले आदिवासी, मोरपिसांचा झाडू घेतलेले फकीर होते...दूर कुठेतरी वारकरयांचे झेंडे दिसत होते.
या गर्दीला थांग नव्हता. या सगळ्यांच्या वतीनं ती वाजवीत होती-
"देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो."
डंग डंग डडांग - डांगचिक डडांग, डंग डंग डडांग - डांगचिक डडांग
तिच्या ठेक्यात कुठेतरी अस्पष्ट भूपाळीचे सूर ऐकू येवू लागले, कुठेतरी 'ग्यानबा तुकाराम' चा गजर ऐकू येऊ लागला आणि हा सगळा नादकल्लोळ वर वर चढत आभाळाला भिडत चालला. आभाळावर आता सत्ता ह्या जत्थ्याची होती की त्या इमारतींची हे सांगवत नव्हते .
आणि ह्या सगळ्या गर्दीच्या पुढे पोतराज चालला होता. आता पोतराजाच्या अंगात आलं होतं. तो जोरजोरात घुमू लागला होता. आणि त्वेषाने गोल गोल फिरून स्वतःच्या चामड्यावर चाबकाचे आवाज काढीत होता - कडाड कडाड!
कुणीतरी 'साहेब' म्हणून हाक मारली आणि मी अचानक भानावर आलो.
माझ्या अंगावर चांगले कपडे होते. माझं बाळ संगमरवरासारखं गोरंपान आणि गुटगुटीत दिसत होतं.
शहरी झालो होतो. साहेब झालो होतो. इस्तरीच्या कपड्याची घडी मोडू देणं परवडणारं नव्हतं. पोतराज केव्हाच निघून गेला होता.
पाऊस माती सुगीत उगवलेली ही संस्कृती आणि तिचे हे शिलेदार माझ्या वनरूम किचन मधे मी कुठे बसवू? देवघरासाठी एक स्क्वेअर फूट जागा जिथे चैन वाटावी तिथे मी पंढरीची दिंडी कुठे बसवू? पोटापाण्यासाठी रोज लोकल मधून जाता येता जिथे घरातल्या भिंतींप्रमाणेच मनालाही कुबट ओल सुटते तिथे मी ही एक पोतराज झालेला असतो...सांधा निखळलेला, फुटून बाहेर पडलेला!