Tuesday, 24 March 2015

सातबारा


मले वाचवून दाखवा हो , जरा माह्या सातबारा
का हो माह्या नशिबीच, लिव्हला ह्यो भोग सारा

कोण चढीवला बोजा, कसा झाला फेरफार
रिन फेडता फेडता, झाली जिन्दगानी गार

नाही टिप्पुस पाण्याचा, झाली शिवारं कोरडी
फास लावुनिया बाप मेला, लेक बांधतो तिरडी

झाला निसर्गच वैरी, अशी झाली गारपीट
घास मातीमोल झाला, बाकी उरे पायपीट

रोज घाशीत चपला, माय जाती तालुक्याले
"पैशे अनुदानाचे सायेब, कवा भेटीन वं मले" ?

माय कपाळ कोरडे, तुह्ये मला बघवेना
भेगा मातीत पडल्या, धग आता सोसवेना

माय मातीत राबता, झाले माती माती हात
रान रक्तानं शिम्पलं, केला दैवानंच घात

कशे पसरू हे हात…कशे पसरू हे हात
जाऊ कोणाले शरण
औंदा भैनीचे लगीन, पुढी दिसते मरण

ब्यांक नडे गरीबाले, झाल्या बंद साऱ्या वाटा
दारी दिसे सावकार , अंगी उभा राही काटा

आज्जी म्हणे काल मले, "काय फुलला मोहोर"!
आज्जी म्हणे काल मले, "काय फुलला मोहोर"!

दोरी टांगलेली दिसे, मले तठी  फांदीवर



10 comments:

  1. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून बुलढाणा जिल्ह्यात रुजू झाल्यापासूनच दुष्काळग्रस्तांसाठी मदत वाटपाचे काम अंगावर येऊन पडले. Aspirin, Paracetamol च्या जगातून अचानक 'सातबारा',फेरफार च्या जगात येउन पडलेल्या माझ्या सारख्या नवशिक्यासाठी हे ही काम तसे मोठेच होते. पण ते काम करत असताना हळूहळू ह्या दुष्काळग्रस्तांच्या व्यथांशी माझा परिचय व्हायला लागला . हजारो तोंडानी हा दुष्काळी भाग मला आपल्या व्यथा सांगायला लागला. 'मार्च एंड' आला तसतसा ईतर कामांचाही रेटा वाढायला लागला आणि मी ही त्यात पार गुंतून गेलो . मात्र हे सगळं करत असतानाही सतत आत काहीतरी ठसठसत असल्याची जाणीव असायची … अस्पष्ट अशी . काम करतानाही सारखी चीडचीड व्हायची. पण आपल्याला नेमकं काय होतंय ते मात्र कळायचं नाही… आज ही कविता पूर्ण झाली आणि जखमेतून पू बाहेर पडावा तशा आवेगाने सगळ्या नेणिवा बाहेर पडल्या … बऱ्याच दिवसांनंतर आज कसं हलकं- हलकं वाटतंय !

    ( 'मार्च एंड चालू असताना कविता कसल्या करताय' म्हणून एखादी शो-कॉज नोटीस आली तर आश्चर्य वाटायला नको !

    ReplyDelete
  2. खुप छान कविता , धन्यवाद सचिन . वेळात वेळ काढून लिहित जाणे

    ReplyDelete
  3. "सायेब, खरंच भेटतील का हो पैशे मंग? "
    नक्कीच भेटतील. एवढया जाणीवा असलेला साहेब असताना.

    ReplyDelete
  4. Vastavikteche sundar varnan

    ReplyDelete
  5. khupach chhan!
    ase janiwa asnare saglech saheb asawet...

    ReplyDelete
  6. Its very hard to empathise with others pain but your reflection in the poem shows you have greatly felt it. Nice poem....

    ReplyDelete
  7. No matter what you're going through, there's a light at the end of the tunnel and it may seem hard to get to it but you can do it and just keep working towards it and you'll find the positive side of things.

    ReplyDelete
  8. Absolutely moving as always Sachin

    ReplyDelete