आई , मी घरी परत येतोय
तुझ्यासाठी थोडीशी, शिदोरी घेऊन येतोय
खूप वर्षे झाली आई, घरचा उंबरठा ओलांडून
आज मी परत येतोय साऱ्या , जगासोबत भांडून
उंबरठ्यातून माझ्यानंतर , बऱ्याच गोष्टी गेल्या म्हणे
एक मढं , एक वरात , तुझ्या ओठावरले गाणे
शिदोरीचं विचारतेस आई ? त्यात काही विशेष नाही
थोडं मी कमावलेलं आभाळ , एक चार महिन्याचं बाळ
थोडी पुस्तकांची रद्दी, एक हिशोबाचं पान
झिजून गेलेल्या चपला माझ्या , कोळसा झालेला स्वाभिमान
हात हलवीत आलो म्हणून, रागावलीस की काय आई ?
पण तुला खरं सांगायला आता , मला लाज वाटत नाही
माणसांच्या या गर्दीत आई , मन कधी रमलंच नाही
स्वप्नात यायचा आपला मळा , धुर्यावरच्या गाई
इकडे माणसांना पण आई धारदार नख्या असतात
लांब लांब सुळे असतात , लाल भडक डोळे दिसतात
तुला कधी बोललो नाही , पण जीव कसा घाबरून जाई
कोपऱ्यामध्ये हमसून हमसून ,गायचो मीच तुझी अंगाई
खूप जिद्द घेऊन आई, तेव्हा घर सोडलं होतं
तुझं काळीज तुटलं खरं , मी ही मन मोडलं होतं
....आता मी हरलो आहे, झिजून झिजून जिरलो आहे
शहाण्यांच्या या जत्रेत आई, मीच वेडा ठरलो आहे
आता मी काहीच ठरवत नाही
मोठी स्वप्ने रंगवत नाही
आई मला रडू येतंय....
.....पुढचं काही सांगवत नाही....
माझं माझच करतोय आई, तू पण तुझं सांग की काही !
माझ्याशिवाय आई तू, खरंच कशी जगत असशील?
लंगडा-लुळा संसार तुझा, एकटीच कशी ओढत असशील?
अक्का परवा सांगत होती, हल्ली तुला दिसत नाही
उन,वारा, पाऊस, माती काही काही सोसत नाही
आता वैशाख सरत येतोय, आई मी घरी परत येतोय
आपण आता असं करू,पहिल्यापासून सुरुवात करू
तुझी अंगाई मला दे, माझं गोकुळ तुला घे
शिदोरी आपण वाटून घेऊ, उरल्या गोष्टी टाकून देऊ
आई आभाळ दाटून येतंय
बघ वैशाख सरत येतोय
आई मी घरी परत येतोय
आई मी घरी परत येतोय.