Monday, 1 April 2013

एक 'एप्रिल फूल ' मुलाखत !



सनदी अधिकारी म्हणून आम्हाला पदरात घ्या अशी विनंती गेली कित्येक वर्षे आम्ही राज्य शासनाकडे करतोय . आमच्या अर्ज-विनंत्यांना मान देऊन शेवटी त्यांनी आमची कलेक्टरकीसाठी  मुलाखत घ्यायचं ठरवलं . आणि मुलाखतीसाठी आम्हाला थेट मंत्रालयात पाचारण केलं . तिथे झालेल्या आमच्या मुलाखतीचा हा वृत्तांत … 



(मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी आमचा बायो-डाटा वाचला आणि पहिला प्रश्न विचारला )

तुम्ही मराठवाड्यातले दिसता.  सांगा पाहू दुष्काळ म्हणजे काय ?
 दुष्काळ हा तीन प्रकारचा असतो. ओला  दुष्काळ ,कोरडा दुष्काळ आणि  अकलेचा दुष्काळ .
पहिले दोन दुष्काळ परवडतात  पण तिसऱ्या प्रकारचा दुष्काळ हा  फार वाईट असतो .  अकलेचा दुष्काळ असला की  बाकी दोन प्रकारचे दुष्काळ त्यामागे आपोआप चालत येतात.
अकलेच्या  दुष्काळाला स्थलकालाचे बंधन नसते.  किंबहुना काही भागात हा दुष्काळ endemic म्हणून असतो . गीतेत ज्याला 'स्थानुरचलोयम  सनातनः'  म्हटले आहे तसा तो काही भारतीय राज्यकर्त्यांच्या ठायी दिसून येतो.
प्रशासनाच्या भाषेत त्याला 'नियोजनाचा अभाव' किंवा फारच sophisticated  शब्द  द्यायचा झाला तर 'policy paralysis' असेही म्हणतात .
हजारो कोट खर्चूनही केवळ  शून्य पॉईन्ट  काहीतरी टक्के शेतजमीन  सिंचनाखाली येणे, दुष्काळप्रवण  भाग आहे हे माहित असूनही साठ पासष्ट वर्षात काहीही ठोस उपाय-योजना न करणे  ही अकलेचा दुष्काळ पडल्याची  काही उदाहरणे देता  येतील .

जल-सिंचन खात्याची कार्ये सांगा. 
 जल सिंचन खात्याला सोन्याचे  अंडे देणारी कोंबडी असेही म्हणतात . महाराष्ट्रात नुकत्याच उघडकीस आलेल्या काही घटनांवरून ही  कोंबडी काहीजणांनी कापून खाल्ली असा संशय आहे.

तुम्हाला कार्ये विचारलीत तुम्ही व्याख्या सांगताय!
sorry  सर … जल-सिंचन खात्याचे मुख्य कार्य म्हणजे पाट बंधारे प्रकल्पांची टेंडरं भरणे आणि त्यातून अमाप पैसा खाणे . असे करताना तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांचे  उखळ पांढरे होईल याकडे खास लक्ष दिले जते. प्रकल्पाची जागा चुकली तरी चालेल पण कार्यकर्ता  नाराज नाही झाला पाहिजे हे या खात्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे. म्हणूनच हे खाते नेहमीच वजनदार माणसाकडे दिले जाते. वर सांगितलेल्या कार्यांव्यातिरिक्त  दुष्काळाची उपाययोजना म्हणून जलसंधारण  करणे वगैरे चिल्लर कामेही जल-सिंचन खात्याला करावी लागतात . पण ही  कामे दुय्यम किंवा वैकल्पिक समजण्याची महाराष्ट्रात प्रथा अहे.

 घटनेतील कलम ३७१   कशाबद्दल आहे  ?
विभागीय असमतोल  राहू नये  व 'अनुशेष! अनुशेष!' म्हणून गळा काढून आपली झोळी भरणाऱ्या राजकारण्यांची पिलावळ निपजू नये म्हणून घटनेतच अशा प्रकारच्या राजकारण्यांची नसबंदी करण्याची तरतूद  आहे . ती म्हणजे  कलम  ३७१   अंतर्गत असलेली वैधानिक विकास महामंडळे . तथापि हे कलाम सत्ताधारी  पक्ष धाब्यावर बसवतात . कारण तसे केले नाही तर खरच समतोल विकास साधेल  आणि विकासाच्या राजकारणाशिवाय पर्याय राहणार नाही अशी धास्ती त्यांना वाटत रहाते .

राज्यात विविध महामंडळे स्थापन करण्यामागचा  हेतू काय आहे ?
 लोकमतावर निवडून यायची क्षमता नसलेल्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करणे हा या महामंडळांच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू असतो . मर्जीतल्या लोकांची,, इमानी नोकरशहांची ,पडेल नेत्यांची या महामंडळावर नेमणूक करून त्यांनी केलेल्या सेवेची पावती देणे हा आपल्याकडे एक राजकीय शिरस्ता आहे.

अशी काही अजून उदाहरणे तुम्हाला देता  येतील का?
होय सर. राज्यसभा आणि विधान परिषदा हि अनुक्रमे राष्ट्रपातळीवरील आणि राज्यपातळी वरील सर्वात मोठी राजकीय पुनर्वसन केंद्रे आहेत.
 
राज्यपाल जास्त पावरफुल असतो कि राष्ट्रपती ?
नर्मदेचा गोटा  जास्त गुळगुळीत असतो कि गंगेचा ?

तुम्ही मुलाखत द्यायला आलात कि घ्यायला आलात?
सॉरी सर!  संसदीय लोकशाहीमध्ये  कार्यकारी मंडळ जर इमानेइतबारे  काम करील तर या पदांना फार महत्व उरत नाही . म्हणूनच या पदांना  'Rubber stamp 'ची उपमा दिली जाते. माझ्या ओळखीचे  एक थोर राजकीय विचारवंत   'राष्ट्रपती हे भारतीय राज्यघटनेचे अपेंडिक्स आहे'  या मताचे आहेत.

महाराष्ट्र राज्याचे विभाजन करून वेगळा विदर्भला मान्यता द्याला पाहिजे का? तुम्हाला काय वाटते?
 एक न धड भरभर चिंध्या करून काही उपयोग होईल असे मला वाटत नाही . रक्त सांडून आपण एकसंध महाराष्ट्र घेतला आणि आता आपणच त्या महाराष्ट्राला ओरबाडून रक्तबंबाळ   करतोय .  वेगळा विदर्भ केला काय अन वेगळा मराठवाडा केला काय आपल्यासमोरच्या समस्य….   

सध्या महाराष्ट्रासामोरील मुख्य समस्या कोण कोणत्या आहेत?

दुष्काळ, प्रादेशिक असमतोल, कायदा सुव्यवस्था, नक्षलवाद, स्त्री-भृणहत्या ,दलितांवरील अत्याचार…   सर तुमच्याकडे वेळ किती आहे.?त्याचं  काय रात्री ११ ला माझी शेवटची लोकल असते.

'good governance'  म्हणजे काय?
माफ करा सर, मला या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित नाही .  मला तर वाटते काही प्रशासकीय विचारवंतांच्या डोक्यातून निघालेली ही एक कपोलकल्पित संकल्पना असावी .  good governance  ही  'नेती-नेती' न्यायाने  अभावातूनच लक्षात घेण्याची संकल्पना अहे. तथापि , नागरिकांच्या अन्न, पाणी ,वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पुरेशा प्रमाणात भागवल्या गेल्या तरी सुशासन आहे असे म्हणता येईल  असे मला वाटते .

(यानंतर मंडळातल्या दुसऱ्या सदस्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.)

तुमच्या hobbies  and  interests मध्ये तुम्ही 'spirituality' असं  लिहिलय.  spirituality  म्हणजे काय?
spirituality ला सोप्या भाषेत 'बुवागिरी' असे म्हणतात .  धार्मिकतेच्या  नावाखाली स्वतःचे प्रस्थ वाढवून घेणे हा बुवागीरीचा हेतू असतो . त्यासाठी फार उच्च दर्जाचे talent  लागते . प्रशासनात जर काही जुगाड नाही जमला तर पुढे बुवागीरीतच करीअर  करायचे असा माझा विचार आहे. परमपूज्य आसारामजी बापू हे माझे आदर्श आहेत.

बुवाबाजीच करायची तर मग प्रशासनात का येताय ?
सर, बुवागीरीसाठी जो attitude लागतो तो प्रशासनामध्ये काम केल्याने develop  होईल असा माझा विश्वास आहे.   प्रशासकीय अधिकाऱ्यांचा  मख्खपणा- म्हणजेच कितीही समस्या आल्या तरी निर्विकार रहाणे- हा खरे तर एक आध्यात्मिक गुण आहे. गीतेत ज्याला 'समशीतोष्ण सुखदुखेषु' असं  म्हटलंय तो एक तर अधिकारी असू शकतो नाहीतर बाबा!  प्रशासनात मला या skill development ची संधी तर मिळेलच शिवाय माझ्या कारकिर्दीत निर्माण झालेले राजकीय हितसंबंध पुढे बाबागीरीत उपयोगी पडतील असे मला वाटते .

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वहात आहे. या निवडणुकीत मुख्य मुद्दे काय असतील असं  तुम्हाला  वाटतंय?
राहुल गांधीने लग्न करावे की  नाही; करावे तर कुणाशी करावे; संजय दत्तला अटक ह्वावी कि नाही; असे बरेच गंभीर मुद्दे यावेळच्या निवडणुकीच्या तोंडावर उभे राहिलेले आहेत.  शिवाय तोंडी लावायला आर्थिक मंदी , अंतर्गत सुरक्षा, भ्रष्टाचार, महागाई, बलात्कार  इत्यादी चावून चोथा झालेले  विषयही आहेत. तथापि भारतीय लोकशाहीची परंपरा पाहता यावेळेसही जातीय समीकरण आणि पैसा हेच मुख्य मुद्दे ठरतील असा माझा अंदाज आहे.

राज ठाकरे यांच्या राजकीय शैलीबद्दल तुमचे काय मत आहे?
(या प्रश्नाचे उत्तर आम्ही जाहीर करू इच्छित नाहि. प्रश्न अभिव्यक्तीचा नाही . प्रश्न वैयक्तिक  सुरक्षेचा आहे.)

(यानंतर  मुलाखत मंडळाच्या तिसऱ्या  सदस्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली . )

आर्थिक तूट म्हणजे  काय?
राज्याच्या आर्थिक व्यवहारामध्ये अंगापेक्षा बोंगा मोठा झाला की जी परिस्थिती उद्भवते तिला आर्थिक तूट म्हणतात .

त्यावर उपाय म्हणून काय करतात?
आर्थिक तूट  घालवण्याचा सोपा उपाय म्हणजे उधारी घेणे . माझ्या वैयक्तिक अनुभवावरून कुठल्याही आर्थिक समस्येवर मला हा फारच नामी उपाय वाटतो . यात परतफेड नाही करता आली तर दिवाळखोरी जाहीर करता येण्याचाही पर्याय असतो. उधार उसणवारी करणे  हे आपल्या सामाजिक संस्कृतीचेच   नव्हे तर आर्थिक धोरणाचेही महत्वाचे अंग आहे. आपला देश जागतिक बँकेकडे उधारी मागतो, दुष्काळात आपले राज्य केंद्राकडे उधारी मागते. तेव्हा कुठलाही संकोच न बाळगता  "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" हे  आपल्या आर्थिक धोरणाचे तत्त्व म्हणून स्वीकारायला हवे . पूर्व नियोजन करून किंवा कष्ट करून संचित जमवण्यापेक्षा  'तंगी आली की हात पसरणे' हीच  जास्त pragmatic economic policy आहे असे मला वाटते.    

गुड! तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून नेमल्यास तुम्ही प्राधान्याने कोणत्या गोष्टी कराल?
सर्वप्रथम मी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष घालीन . महाराष्ट्र पोलिसांना आमदार- खासदारांच्या गाड्यांचे नंबर माहित नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन झाले इत्यादी  क्षुल्लक कारणावरून पोलिस मुर्खासारखे त्यांच्या गाड्या अडवतात आणि मार खातात . यासाठी  पोलिसांना खास प्रशिक्षण देउन व्हि. आय . पी . च्या गाड्या कशा ओळखायच्या , अशी गाडी आली कि नियमपुस्तिका बाजूला ठेवायची आणि लवून मुजरा कसा करायचा याचे ट्रेनिंग देण्यात येईल. दुसरी मुख्य समस्या म्हणजे शिक्षकांचा संप . यावर तोडगा म्हणून उच्च शिक्षणाचे खाजगीकरणच केले पाहिजे. म्हणजे 'तुला न मला, घाल कुत्र्याला' असे होइल आणि प्राध्यापक मंडळी  थंडगार पडतील. असंही  शिक्षणाचा आणि आयुष्यातील यशाचा काही संबंध नसतो अशी माझी धारणा असल्यामुळे यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा काही प्रश्नच  नाही .
या गोष्टी राबवणे खूप अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण 'एक धडाडीचा प्रशासक' अशी प्रतिमा बनवायची असेल तर असे कठोर निर्णय घेतलेच पाहिजेत असे मला वाटते .

व्हेरी गुड! तुम्ही पेपर कुठला वाचता?
 सर मी कुठलाच पेपर वाचत नाही.  पेपरात बातम्या कमी आणि भंकस जास्त असते. पेपर वाचल्याने विचारांची आणि मतांची originality दूषित होते अशी माझी धारणा आहे . त्यामुळे पेपरच काय पण कुठल्याच  छापील गोष्टीवर माझी श्रद्धा नाही .
माझ्यातला अंगभूत आळशीपणा हे त्यामागचे दुसरे कारण आहे.    

पुढचा प्रश्न विचारणार इतक्यात  बाहेर "आग! आग!" "पळा!पळा !" असा गोंधळ सुरु झाला . मुलाखत मंत्रालयात चालू  असल्यामुळे लागलेल्या  आगीबद्दल  शंका असण्याचे काही कारणच नव्हते .  अध्यक्षांनी घाईघाईने मुलाखत संपली असा इशारा करून पळ  काढला . आणि माझी मुलाखत संपली .

मित्रहो!  आता काही दिवसातच माझा निकाल लागेल . मुलाखत वाचून तुम्हाला काय वाटतंय.  होईल की  नाही माझं  सिलेक्शन ?