अमीबापासून ते आजोबापर्यंत कोणीच नपुंसक निघालं नाही
कोणीही लग्नाआधी मेलं नाही
की कोणीच सन्याशी झालं नाही
चमत्कार म्हण षडयंत्र म्हण
बाप,तू जन्माला आलास
तू जन्माला आलास बाप आणि पाचव्या दिवशी सटवाईनं
तुझ्यासोबत माझ्याही कपाळावर चित्रकथा कोरली
त्या क्षणापासून बाप माझ्या आयुष्याची गुंतावळ
तुझी देणेकरी झाली
पालं उचलून तू आम्हाला शेतापासून लांब
शहरात घेउन आलास
तेव्हापासून बाप अगदी तेव्हापासून
तुझा संघर्ष
तुझी शर्यत
तुझी गरिबी
तुझी दहशत
मुस्कटदाबी माझ्या श्वासांची
घुसमट गुदमर करीत राहिले
दोष, उपदेश, भाकरी,
तुझ्या जनुकांची गुलामगिरी
या रिंगणात बाप
कधी मी इडीपस कधी तू ययाती
बनत राहिलो, कण्हत राहिलो
आता मला सांग बाप
आता मला सांग
आयुष्याच्या संध्याकाळी
खिडकीत बसून विषण्ण नजरेने
दूरवर बघत असतोस तेव्हा
तुला नेमकं काय आठवतं
तीस वर्षाची मास्तरकी ?
कपाटाच्या किल्ल्या ?
नदीतला डोह ?
गीतामाईचा पदर ?
भांडून गेलेला पूत ?
सरणावरची लेक ...?
खरं सांग बाप
कॅन्सरनं पांगुळलेलं शरीर घेऊन
व्हीलचेअर वर बसल्यावर आज
तुला नेमकं काय काय आठवतं ?