सांज ढळता ढळता मन झाले उन - पिसे
ठसे माझ्या कपाळीचे त्याची त्रिशंकूशी नाळ
करी फिर्याद जमीन झाले फितूर आभाळ
आभाळाच्या काळजात रुतलेला ढग
आसवांच्या अंगोपांगी मुरलेली धग
ढगातल्या आसवांना मृत्तिकेचे वेध
सागराच्या पोटतळी बुडता संवेद
सागराला नीज येई वेडावला चंद्र
पाण्याखाली कमळाची रडवेली रंध्र
चंद्र घेई सूड माझा भिने रात्रंदिन
माझ्या दारी मीच धनी मीच बोहारीण
दार माझे सोमाकांती माझ्या घरभिंती पारा
माजघरी पुरलेला साता जन्माचा पसारा
पाऱ्याचीच गात्रे माझी हाती पाऱ्याची लकीर
भर वाळवंटी कोण नाचे एकला फकीर
फकिराचे डोळे खोल त्याची मला गूढ बाधा
व्याभिचारी कृष्णापायी झाली वेडी कशी राधा
बाधा अशी कृष्णाकांती झाला नकोसा उजेड
माझ्या मागे भूत लागे मला सरणाचे वेड
मला सरणाचे वेड