तुम्ही गेल्याचं कळलं... खूप खूप दुःख झालं मास्तर .एवढं दुःख बाप मेला तेव्हाच झालं होतं.
कळायला लागल्यापासून तुम्हाला बघतोय मास्तर .तुमचा तो जाड फ्रेमचा चष्मा आता मिळत नाही बाजारात. (आता बाजारात पिझ्झा, मोबाईल आणि शिक्षण मिळतं.)
तुमचा तो ट्रेड मार्क चष्मा, चुरगळलेला पांढरा सदरा, आणि पांढरी ढगळ पतलून ...लहानपणापासून तुम्ही जुनेच वाटायचात मास्तर .पण तो उत्साह..एवढा उत्साह आणायचात कुठून मास्तर? दहावीला बोर्डात आलो तेव्हा लहान मुलासारखं कडेवर घेवून नाचलात मला! केवढा ओशाळलो होतो तेव्हा..वर्गमित्र अजूनही चिडवतात... कधी भेटलेच तर! पण तुमचा विषय आता फारसा निघत नाही. कुणी काढत नाही. जुनी कोवळीक आठवणीतही सोसवत नाही कुणालाच आता...
वर्गात यायला मला नेहमीच उशीर व्हायचा तेव्हा अख्ख्या वर्गासमोर 'कोंबडी' ची शिक्षा द्यायचात. कान पकडून खाली वाकल्यावर तुमच्या चपलीचा तुटलेला अंगठा दिसायचा...किती वर्षे एकच जोड वापरत होतात मास्तर?
निकालाचे पेढे द्यायला तुमच्या घरी यायचो तेव्हा मंगळवार पेठेतल्या तुमच्या त्या दोन खोल्याच्या कळकट बसक्या घरात आणि तुमच्यात मला फारसा फरक वाटायचा नाही... आताच्या मास्तरांनी गावात plotting चा धंदा सुरु केलाय. नुसत्या पगारावर कुठं भागतंय आजकाल मास्तर! सोबतीला शिकवण्या, real -estate , राजकारण असं काहीतरी करावंच लागतं की...तसं आताच्या मास्तरांना मास्तर म्हटलेलंही आवडत नाही. पण टी - शर्ट घालणाऱ्या , आणि शाळेच्याच टपरीसमोर गुटखा चघळणाऱ्या या पोरांना 'मास्तर' म्हणवत देखील नाही...सर्व शिक्षा अभियान , मिड डे मिल , पट पडताळणीच्या गदारोळात गुरु मात्र हरवलाय !
फाशी घेउन मेलात मास्तर!
बातमीत त्यांनी छापलं होतं तुमच्या मागे परिवार नाही. पोरकं करून गेलात मास्तर, पण जाताना डोक्यावर फार मोठे ओझे ठेवून गेलात. तुमच्या मरणाचं दुःख एकवार सोसवेल मास्तर, पण तुमच्या संस्कारांचा भार सोसवत नाही .
तुम्ही म्हणायचात तसं पाय ठेवील तिथे पांढरी कमळे उगवीत गेलो मी,पण आज माझ्या अंगावर फक्त चिखलच उरलाय मास्तर!
तुम्ही काय गांधी- टोलस्टोयच्या गोष्टी सांगायचात पण असलं काहीच चालत नाही इथे . तुम्ही कसलं ते मूल्य-शिक्षण म्हणायचात...आज शिक्षण विकत मिळतंय, उद्या मास्तर मूल्येही मिळतीलच की...तुम्ही सांगायचात तसं काही होत नसतं... भव्य ,उदात्त असलं आयुष्यात काहीच नसतं ,जे काही असतं ते फारच मुलभूत आणि भोंगळ असतं...नागड्या जगात नागडंच होऊन जगावं लागतं ..आता भेटलात कधी तर मीच तुमची शिकवणी घेईन म्हणतो...
पण हेसुद्धा फार उशिरा कळलं मास्तर!
रागावू नका मास्तर, पण पाटी आणि दप्तर सावरण्याच्या नादात प्रभातफेरी फार पुढे निघून गेली हे कळेस्तोवर आयुष्य मध्याह्नी आलं होतं...वर्गात नेहमी पुढच्या बाकावर बसलो पण आयुष्यात मात्र मागे राहिलो मास्तर... तुम्ही अभिमानाने 'माझा विद्यार्थी' म्हणून ओळख करून द्यावी अशांपैकी मी काहीच झालो नाही. गर्दीतलाच एक निनावी चेहरा बनलोय. लोकलने अप-डाऊन करतो मास्तर, ई. एम. आय. भरून संसार करतो, ऑफिसात बसून तिकिटाच्या कागदावर महिन्याचे हिशोब जुळवीत असतो. दिवस रात्र भेदरलेला असतो मास्तर, दाखवत नाही कुणाला पण आतून नुसता फाटलेला असतो. चेहऱ्यावरची घडी विस्कटू देत नाही मी वर्षभर...पण १५ ऑगस्टला, 'ऐ मेरे वतन के लोगो' ऐकू आलं की आपोआपच रडू येतं मास्तर!!!
आपली शाळा पांगली मास्तर, बालपण कुठल्याकुठे विरून गेलं...आणि तुमच्यासोबत आता निरागस चांगुलपणाशी असलेलं नातं देखील..
खूप खूप एकटं वाटतंय मास्तर...
सोडून गेलात मास्तर! .
पहिल्या पगारावर तुम्हाला एक नवा कोरा सदरा घेउन द्यायचा होता, कुठे खूप मोठा अधिकारी झालो तर भाषणात तुमचं नाव घ्यायचं होतं, वेळ काढून तुमच्या घरी एकदा भेटायला यायचं होतं,तुमचे सुरकुतलेले हात हातात घेउन माहेरवाशिणीसारखं गुज करायचं होतं... सगळ्या जगाचे गाऱ्हाणे तुमच्याकडे सांगून तुमच्यापाशी मनभरून रडायचं होतं...
माफ करा मास्तर , यातलं काहीच करू शकलो नाही.
पण, एकदा या की मास्तर!
परत या मास्तर, आपली शाळा पुन्हा भरवा !
पुन्हा एकदा वर्गात तोच चुरगळलेला सदरा आणि पतलून घालून या...पुन्हा एकदा मला शिक्षा करा, पुन्हा एकदा जाड भिंगाचा चष्मा सावरीत आम्हाला त्या हितोपदेशाच्या गोष्टी सांगा...परत या मास्तर, आपली शाळा पुन्हा भरवा !