Sunday, 7 July 2013

मराठी आडनावे - एक चिंतन



शेक्सपिअर म्हणायचा नावात काय आहे ? आम्ही म्हणतो नावात नसेल हो काही, पण आडनावात मात्र बरंच काही आहे.  
पाणिनी ऋषीने तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले.   महादेवाने डमरू वाजविले आणि त्यातून अख्ख्या शब्द्सृष्टीचा उगम झाला असे  म्हणतात . शब्दांमधून नावांचा उगम झाला… ईथपर्यंत सगळं  ठीक. पण पुढे नावातून आडनावे कधी आणि का उदयाला आली हा एक मोठाच प्रश्न आम्हाला हल्ली पडलेला आहे. 
त्याचा झालं  असं की आमचे एक मित्र आहेत. 'बब्रुवाहन महाडिक' म्हणून . यांना आपल्या नावाचा जबर अभिमान बरं का. एकदा हे असेच स्वतःवर खूष असताना आम्हाला म्हणाले, 
          " काही म्हण फकीरा, पण आपलं नाव कसं वजनदार वाटतं का नाही?" 
आता आम्हाला स्पष्टवक्तेपणाची खोड ! आम्ही आपलं सांगितलं प्रामाणिकपणे,
        " नाव आहे रे वजनदार… पण आडनाव मात्र जरा अश्लिलच वाटतं बघ "
 पठ्ठ्या पडला न पेचात!  म्हणाला,
           "त्यात अश्लील काय?"  
आता 'महाडिक' आडनावात अश्लील काय हे मराठी आणि इंग्रजी भाषेचं प्राथमिक ज्ञान असलेल्या कुणाच्याही लक्षात येईल.  पण हा जाणूनबुजून  'महाडिक'च होता . चार दिवसानंतर महाडिकचा मेसेज आला - 
          " साल्या फकीर!  आडनावाची टिंगल करतोस काय? मला कळलं तू काय म्हणालास ते ". 
 चार दिवसानंतर ! 
त्यादिवशी संध्याकाळी महाडिकने चार पैलवानांना सोबत घेऊन मला गाठलं.… आणि  चार दिवसानंतर थेट हॉस्पिटलमधेच आम्हाला शुद्ध आली . एक हात आणि एक पाय फ्र्याक्चरलेला  घेऊन  हॉस्पिटलमध्ये पडल्या-पडल्या आम्ही फारच आंतर्मुख झालो. असं का व्हावं ? जिगरदोस्त असलेल्या महाडिकने  आपल्याला डबल फ्र्याक्चर का करावं ? फक्त आडनावावरून ?  मग आम्ही 'आडनाव' या विषयावरच खूप विचारमंथन केलं .  त्या विचारमंथनाचा सारांश आपल्या आणि मराठी भाषेच्या सेवेत आम्ही इथे सादर करीत आहोत--
आडनाव ही एक लोकोत्तर संकल्पना आहे. उत्तरेकडच्या लोकांची आडनावे आणि दक्षिणेकडच्या लोकांची आडनावे यांची  स्वतंत्र वैशिष्ट्ये  आहेत . ही वैशिष्ट्ये राज्यनिहाय वेगवेगळी असतात.  
कपूर,चोप्रा, खन्ना ,बेदी ही  पंजाबी आडनावं  कशी श्रीमंत आणि glamorous वाटतात . 
तर शहा, पटेल, पारीख, मेहता ही  गुजराथी आडनावं तुंदिलतनु आणि थुलथुलीत वाटतात.  
केरळातली अय्यर, मेनन, सुब्रमण्यम ही  मल्लू आडनावं  intellectual  वाटतात तर 
बंगाल्यांच्या दास, घोष, बनर्जी, मुजूमदार या आडनावांना क्रांतीचा वास येतो. 
पण मराठी माणसाच्या आडनावाचे   असे  वैशिष्ट्य कोणते  याचा आम्ही फार विचार केला . प्रगाढ चिंतानांती आम्ही असा निष्कर्ष काढला की  'अगम्य आडनाव असणे'  हे मराठीपणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे . खरा मराठी माणूस तोच ज्याच्या आडनावाचा काही म्हणून अर्थ लागत नाही . जेवढे आडनाव अगम्य तेवढे  त्याच्यात मराठीपण ठासून भरलेले.  (पहा - चव्हाण, भोसले,शिंदे, पवार इ . ). ही आडनावं  इतकी परिचयाची झाली आहेत की  मुळात ती अगम्य आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही .  नाहीतरी धोंडगे, शेंडगे, शिंगटे असल्या आडनावांचा तुम्ही लावून लावून काय अर्थ लावाल ?

मराठी आडनावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती मुळातच  'Non -glamorous' असतात . म्हणजे प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय ह्या बायका  (की  मुली ?) त्यांच्या आडनावामुळेच  glamorous  वाटतात असे  आमचे  मत आहे . हेच त्या बिचाऱ्या मराठी घरात जन्माला येऊन 'प्रियांका पोटदुखे' आणि 'ऐश्वर्या ढोले' असल्या नावानिशी चमकू म्हटल्या असत्या तर झाल्या असत्या का एवढ्या फेमस?  म्हणजे बघा, आता 'शारोन स्टोन' हे नाव जितकं glamorous वाटतं तितकं 'सुवर्णाबाई धोंडे' का वाटू नये ?   'स्टेलिओन' आडनाव जेवढं  macho वाटतं तेवढं  'घोडके' हे आडनाव का वाटू नये? 'चावला' हे आडनाव glamorous  आणि 'तांदळे'  हे आडनाव उगाच गरीब होतकरू असल्यासारखे का वाटावे?  तरी बरं मातोंडकर, बेंद्रे (असल्या) आडनावाच्या मुलींनी (की  बायकांनी?) मराठी नावाला थोडं फार का होईना glamour ( थोडे फार का होईना कपडे घालून) मिळवून द्यायचं पुण्यकर्म केलय. पण महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णदिन तोच असेल जेव्हा ढमढेरे, धोत्रे किंवा जमसांडे या आडनावाची तरुणी मिस युनिवर्स होईल !
आडनावासंबंधी आमची अजून काही निरीक्षणे आहेत ती सोदाहरण खाली देत आहोत. 
मराठी आडनावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे  ठासून  भरलेली दांडगाई.  त्यातली  जरग,जठार, जाचक, गडाख ही नुसती आडनावं जरी उच्चारली तरी अंगाला दरदरून घाम फुटतो! या उलट काही आडनावं  मात्र नावाला जागत नाहीत. 'खुळे' आडनावाचे आमचे एक मित्र आहेत. हे एकदा बोलायला लागले की ऐकणाऱ्यालाच  खुळं लागायची पाळी (वेळ ) येते.  बरं यांना उलटं काही बोलावं  तर हे एवढे दांडगट की  आपलाच खुळखुळा करून टाकतील. दुसरे असेच आमचे मित्र 'भोळे ' आडनावाचे आहेत. त्यांचे  आडनाव भोळे असणे म्हणजे तमाम  महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक आहे. हे भोळे इतके अतरंगी आहेत की  त्यांच्या सौभाग्यवती देखील " भोळे हे फिल्मी गडे" असे गाऊन त्यांचे प्रियाराधन करतात असे आमच्या ऐकिवात आहे.  
काहीजण मात्र आडनावाला जागतात. शाळेत आमचे एक मित्र होते. त्याचं  आडनाव होतं 'रणवीर' . ह्यांचे वडील मिलिटरीत होते आणि हा क्रिकेट टीममध्ये एक नंबरचा batsman होता . वेगवेगळया  मार्गाने का होईना पण बापलेकांनी आडनाव सार्थक केलं !  
बरीच मराठी आडनावं मात्र धारणकर्त्याला awkward करायला लावणारी असतात. उदा. नागवेकर, भोंगळे ई.   
एखाद्याला आडनाव विचारल्यावर त्याने 'नागवेकर' असे सांगितल्यावर ते assertive statement आहे की imperative statement ते कळायला मार्ग नसतो .
'भोंगळे' आडनावाची पंचाईत अशी आहे की अशा व्यक्तीचे first name तुम्हाला माहीत नसेल आणि ऐन गर्दीत यांना हाक मारून बोलवायची वेळ पडली तर फारच अवघड परिस्थिती निर्माण होते. ( आमचा आपणास सल्ला आहे की ह्या आडनावाची व्यक्ती- स्त्री किंवा पुरुष - आपल्याशी परिचित झाल्यास  त्याचे किंवा तिचे 'प्रथम नाम' आधी  विचारून घ्यावे . म्हणजे गर्दीत पंचाईत होणार नाही .)     
'उंद्रे' आडनावाचे आमचे एक मित्र कॉलेजात होते . त्या आडनावाखाली  ते इतके ऑक्वर्डून गेले होते की  पुढे त्यांनी आडनावाचे वजन वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून 'उंद्रे पाटील' असं नाव वापरायला सुरुवात केली . कॉलेजातले काही टगे ( दस्तुरखुद्द त्यातलेच ) मात्र त्याला मुद्दाम हिणवायचे ,
    "उंदर्या , साल्या तू उद्या वाघ जरी मारलास  तरी पेपरात 'उंदरे यांनी वाघ मारला' असेच छापून येईल "
तथापि सांख्यिकीच्या दृष्टीने पाहिल्यास अशी आडनावे विरळच असतात . काही मराठी आडनावे मात्र घाऊक असतात .या आडनावाची माणसे महाराष्ट्रात पोत्याने आढळतात .  'पाटील' हे त्यातले अग्रेसर आडनाव. पाटील आडनावाने अख्खा  महाराष्ट्र भरून ( (आणि क्वचित भारून ) टाकला आहे . इतके की 'महाराष्ट्र म्हणजे पाटील'  असे समीकरणच रूढ झाले आहे. हे आडनाव जातीधर्माच्या सीमा जुमानीत नाही . पाटील आडनाव असले म्हणजे आडनाव विचारून जातीचा अंदाज काढू बघणाऱ्याची  मोठी पंचाईत होते . मराठे,ब्राह्मण दलित मुस्लिम… पाटील कुणीही निघू शकतो . डॉ. खंडीझोडे नावाचे आमचे एक  सर्जरीचे प्राध्यापक होते . त्यांचे  व्यसन आणि व्यासंग दोन्ही दांडगे होते. ते म्हणायचे,
 " धर्मात हिंदू, पक्षात काँग्रेस, प्राण्यात अमिबा आणि आडनावात पाटील - omnivorous and  formless.  "  
आमच्या विचारमंथनातही  आम्हाला याचा वारंवार प्रत्यय येत आहे . 
पाटील, कदम,मोरे,जोशी, कुलकर्णी,कांबळे  ही आडनावे आणि सचिन, संदीप, नितीन, सायली, अश्विनी ही  नावे ह्यांचे permutation-combination करून पाहिल्यास अर्ध्या महाराष्ट्रीयांची नावे cover होतात असा आमचा दावा आहे . 'महाराष्ट्रात प्रत्येकाला 'संदीप पाटील' नावाचा एक मित्र असतो' आणि 'प्रत्येकाचे आयुष्यात एकदातरी 'सायली जोशी' नावाच्या मुलीशी प्रेम जडलेले असते' असा आमचा सिद्धांत आहे.( अपवाद असलेल्यांनी वाट पहावी. )
आडनावांबद्दल असे चिंतन चालू असताना आमच्या मनाला बरेचसे  निरागस प्रश्नही पडले. जसे की - 
 ज्यांचे आडनाव 'जाधव' असते त्यांचे नाव 'माधव' कधीच का असत नाही ? 
'घैसास' आडनाव असल्यास मुलाचे नाव 'कैलास' ठेवू नये असे ठरवून होते की योगायोगाने ? 
'श्रोत्री' आडनाव असलेले लोक घराण्यात कुणी बोबडा जन्माला येऊ नये म्हणून काही विधी करीत असतील का? वगैरे. पण ज्या प्रश्नाने आमची झोप उडवली आहे तो म्हणजे - ही आडनावे ठरविते तरी  कोण? आणि त्यांना ते सुचते तरी कसे?
आडनाव मुक्रर करण्यात 'self - determination principle' नक्कीच लागू होत नसावे. उगाच कोण स्वतःचेच आडनाव 'लांडे' असे ठेऊन घेईन ? 
आडनाव देणारी एखादी गुप्त एजन्सी कार्यरत असावी असाही आम्हाला काही काळ संशय होता . राजाश्रयाने तिचे काम चालू असावे असे वाटते . त्या काळात राज्यपद्धती oligarchic असावी . आपल्या विरोधकांचा   पिढ्यानपिढ्या पुरून उरेल असा सूड उगवण्यासाठी त्यांनी असली भयंकर आडनावे शोधून काढली असावीत . 'गोडबोले' सारखी मधाळ आडनावे ठेऊन घेणारे मात्र ह्या एजन्सीतलेच insiders असावेत.
शेवटी लोकांनीच मोठे बंड करून ही जाचक पद्धती  झुगारून दिली  आणि सरळ गावावरून आडनावे लावण्याची प्रथा महाराष्ट्रात पडली असावी . उदा. वसमतकर  नांदेडकर;  पारसकर , घोनसीकर…. करमरकर  ई.
      
व्यवसायानुसार आडनावे पडली असावीत असे मात्र आम्हाला वाटत नाही . कारण तसे म्हटले तर  कुटे, ठोके, कुबल ह्या आडनावाचे लोक हाणामाऱ्या करण्याच्या सुपाऱ्या  घेत असावेत तर  डाके, डाखोरे, चोरमले  हे लोक व्यावसायिक दरोडेखोर असावेत असे मान्य करावे लागते. पण हे काही आमच्या सद्सदविवेक बुद्धीला पटत नाही . महाराष्ट्रात तर खुपसे, मानकापे, गळाकाटू यासारखी अशी काही आडनावे आहेत की  ती ऐकूनच एखाद्या  वधूपित्याला त्या  घरी मुलगी द्यावी की  नाही असा प्रश्न पडावा! 
शिवाय व्यवसाय सिद्धांतानुसार रुकारी, खल्लाळ यासारख्या अगम्य आडनावाचे  लोक नेमका काय  व्यवसाय करीत असावेत याचा तर्क लावता येत नाही . सबब हा सिद्धांताच आम्ही  मोडीत काढला. 
स्वभावानुसार आडनावे ठरत असावीत असा दुसरा एक कयास संभवतो. पण तसे घडत असते तर 'थापा' आडनावाच्या लोकांनी राजकारणात भारतीय उपखंड गाजवला असता . पण तसेही काही दिसत नाही. म्हणून हा ही सिद्धांत आम्ही बाद ठरवला . 
हे सर्वच  सिद्धांत बाद ठरतात म्हटल्यावर  आम्हीच आमचा एक नवा सिद्धांत मांडला .               
चार्ल्स डार्विन च्या 'Theory of  Evolution' वर आधारित ह्या सिद्धांताचे नामकरण आम्ही ' Theory of  Surnames' असे केले आहे. ( यथावकाश 'Origin of surnames' हा ग्रंथ लिहिण्याचा आमचा मानस आहे. )  
आमच्या सिद्धांतानुसार जशी जशी समाजाची उत्क्रांती होत गेली तशी तशी त्या त्या कालखंडातल्या भौगोलिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीनुसार मानवी समूहांची आडनावे ठरत गेली. 
उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात मानव जेव्हा टोळ्या-टोळ्यांनी  इतर प्राणिमात्रांच्या सोबतीनेच रहात होता त्या काळातच कोल्हे, लांडगे, डुकरे, चित्ते अशी प्राणिजन्य आडनावे पडली  . वाघ हे त्या टोळीच्या प्रमुखाचे आडनाव असावे . प्रमुखास मारून टोळीचा कब्जा घेणारे 'वाघमारे' असावेत . 
उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात काही कारणामुळे भीषण दुष्काळ पडून प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले असता उपासे,कोरडे, भाजीभाकरे अशा आडनावांची fashion आली असावी . 
हा दुष्काळ संपून पुढे अन्नधान्याची  सुबत्ता आल्यावर लोकांनी हरखून जावून दुधभाते, दहिफळे, भातलवंडे अशी आडनावे धारण करायला सुरुवात केली असावी .      
 ( पोटदुखे ,हगवणे ही  आडनावे  या सुबत्तेच्या परमोत्कर्षाच्या काळातली  असावीत . )
उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर धातूचा शोध लागल्यावर तांबे, लोखंडे, पितळे अशी धातूजन्य आडनावे निघाली . अश्मयुगात ज्याप्रमाणे 'खडके ' आणि 'दगडे' ही प्रमुख  घराणी होती त्याचप्रमाणे लोहयुगात  व ताम्रयुगात वरील आडनावाची घराणी प्रभावी राहिली असावीत.  
ह्याच  काळात त्यांची  सुबत्ता पाहून लुटालूट करण्यासाठी काही रानटी  टोळ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले असावे .  मघाशी उल्लेख केलेली 'रुकारी' व 'खल्लाळ' यासारखी कुठेच तर्कसंगती  न लागणारी आडनावे याच  रानटी टोळ्यांतली असावीत  . ह्या टोळ्यांविरुद्ध पराक्रमाने लढणारे  लोक हे उपरोल्लेखित खुपसे, मानकापे शिवाय  ढाले  या आडनावाचे असावेत. लढाईत प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली होती याचा अंदाज युद्धामुळे जायबंदी झालेल्यांच्या एकबोटे, आंधळे ,घयाळ ,मानमोडे   अशा आडनावावरून येतो . 
युद्धानंतर काही काळाने शांतता प्रस्थापित होऊन सगळी स्थिरस्थावर झाली असता सुबत्ता व स्थैर्य यांची नैसर्गिक परिणीती म्हणून एक विचारयुग अवतरले . विचारे , शहाणे, सहस्त्रबुद्धे ही  आडनावे याच 'Renaissance' च्या काळातली असावीत . 
विचारयुगाचा अतिरेक होऊन जास्त विचार केल्यामुळे लोकांचे केस झडायला लागले आणि 'टकले' हे आडनाव उदयास आले …. 

अशाप्रमाणे  आमचा ' Theory of  Surnames'  हा सिद्धांत पूर्णपणे तर्काधिष्ठित असून अजून बराच प्रदीर्घ आहे . विस्तारभयामुळे आम्ही तो इथे संक्षेपात देत आहोत. आमच्या या सिद्धांतामुळे  बरेच वादंग माजण्याची  शक्यता आहे याची आम्हाला कल्पना आहे . झालेच तर लोक आम्हाला वाळीत टाकतील . आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्याही देतील . पण सत्याचा शोध घेण्याच्या मार्गावर कितीही अडचणी  आल्या तरी त्याला आम्ही तयार आहोत. मग महाडिक सारख्यांनी आमच्यावर रोज हल्ले केले तरी बेहेत्तर ! पण असे होणार नाही याची आम्हाला जाण आहे कारण महाराष्ट्राच्या सहिष्णू आणि सत्यशोधक परंपरेवर आमचा विश्वास आहे. 
तथापि आमच्या या शोधानिबंधामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांची प्रांजळपणे माफी मागतो. 
पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आमच्या चिंतनात आम्हाला जे सगळ्यात महत्वाचं गवसलं ते हे नाहीच मुळी ! ते अजून काहीतरी वेगळंच आहे. यापेक्षाही कैक पटीने मौल्यवान असं....!   
आडनावांच्या विरोधाभासातून, त्यातून निर्माण होणाऱ्या  विनोदातून आम्हाला लक्षात आली ती आडनावाची निरर्थकता… आम्हाला लक्षात आले की कसे आपण आडनावाशी आपले अहंकार जोडून घेतो...  कसे  आपल्या जातीची धर्माची ओळख आपल्या आडनावाशी जोडून देतो… आणि मग त्यासाठी इतके आग्रही होतो की  आपण कुठल्याही थराला जावून पोचतो . एकमेकांची डोकी फोडतो, माणसाला माणसापासून तोडतो, व्यक्तीला व्यक्ती म्हणून न ओळखता आडनावावरून ओळखतो … ज्या पूर्वजांमुळे त्या आडनावाला महात्म्य प्राप्त झालं  त्यांनाच आपण लाज आणतो… त्याच आडनावाशी  आपण राजकारण जोडून देतो आणि लोकशाहीसारख्या उदात्त संकल्पानाची धूळधाण करतो …. 
माझं एक ऐका! एकदा आडनावाचे सगळे संदर्भ बाजूला काढून बघा. त्या आडनावात असलेला विनोद शोधा आणि एकदा आपलंच आडनाव उच्चारून हसून पहा...  पुन्हा पुन्हा म्हणा आणि खदखदून हसा . घराबाहेर पडा . मित्रांना भेटा . त्यांचं  आडनाव   विचारून हसा . त्यांना तुमचं आडनाव सांगून हसा . आणि तुमच्या हसण्यासोबत तुमच्या आडनावाला चिकटलेले सगळे दांभिक संदर्भ गळून पडू द्या...  सगळा निचरा होऊ द्या.  आणि फक्त एक माणूस म्हणून घरी परत जा !
आम्हाला सगळ्यात मौल्यवान शोध लागला आहे तो 'Theory of Surnames' चा नव्हे तर या 'Therapy of  Surnames' चा !
चला, आज  हॉस्पिटल मधून आमचा डिस्चार्ज आहे . महाडिक स्वतःची गाडी घेऊन मला घरी न्यायला आलाय!