एवढं मात्र दोघांनी, एक जरा सांभाळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
अजूनही तुला विसरलो नाही, खरं सांगतो गम्मत नाही
७:१२ च्या लोकल सारखा, काळ कुणासाठी थांबत नाही
आयुष्याच्या चाकोरीमध्ये आपणही थोडं रुळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
तुझा नवरा, माझी बायको सगळेच असतात थोडे सायको
संसाराची रीतच असते , खाली-पीली टेन्शन कायको !
'ज्याचं प्रेम त्याला' शेवटी काही म्हण, मिळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
खाणाखुणा, शपथा-बिपथा , वाईनचे ते दोन प्याले
रुसवे, फुगवे, शिकवे, गिले… हाs य गेले ते दिन गेले !
माझे सिक्स पॅक्स , तुझी झीरो फिगर… आठवून थोडं हळहळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
"माझ्या शोन्या"… " "माझी शोनुली"…
"… चिडल्यावर फार सुंदर दिसतेस ! "
"love you , miss you… "
"तुझी, तुझी आणि फक्त तुझ्झीच… "
जुनी पत्रं वाचता वाचता, गालातल्या गालात हसताना
अन हसता हसता नकळतपणे मधेच डोळे टिपताना
वेडेपण या वागण्यातलं, आतातरी आपल्याला कळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
बाकी सगळी दुनियादारी, त्याला आपण चुकलो नाही
आधी तूच लग्न केलंस , तसा प्रेमाला मीही मुकलो नाही
तुझ्या चष्म्याचा वाढता नंबर
एक माझा पांढरा केस
वयाचं तरी भान थोडं, जs रा आपण पाळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
मनाचे लाख बहाणे असतात ,पण भूतकाळ जपणारे शहाणे नसतात
गुलाबाचं एक फूल
एक पत्र चुरगळलेलं
एक चुंबन दीर्घसं
हळुवार मिठीत विरघळलेलं…!
आठवणींचं त्या साऱ्याशा, तुझ्या माझ्या दोघांच्या
इवलंसं एक गाठोडं बांधून, काळाच्या नदीत सोडायला हवं…
अश्रू बनून शेवटचं मी, गालावरून तुझ्या ओघळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं
एवढं मात्र दोघांनी, एक जरा सांभाळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं