Thursday, 24 January 2013

व्हीलचेअर



अमीबापासून  ते  आजोबापर्यंत कोणीच नपुंसक निघालं  नाही 
कोणीही लग्नाआधी मेलं नाही 
की कोणीच सन्याशी झालं नाही 
चमत्कार म्हण षडयंत्र म्हण 
बाप,तू जन्माला आलास 


तू जन्माला आलास बाप आणि पाचव्या दिवशी सटवाईनं 
तुझ्यासोबत माझ्याही कपाळावर चित्रकथा  कोरली 
त्या क्षणापासून बाप माझ्या आयुष्याची गुंतावळ 
तुझी देणेकरी झाली 


पालं उचलून तू आम्हाला शेतापासून लांब 
शहरात घेउन आलास 
तेव्हापासून बाप अगदी तेव्हापासून 

तुझा संघर्ष 
तुझी शर्यत 
तुझी गरिबी 
तुझी दहशत
मुस्कटदाबी माझ्या श्वासांची 
घुसमट गुदमर करीत राहिले 

दोष, उपदेश, भाकरी, 
तुझ्या जनुकांची गुलामगिरी 
या रिंगणात बाप 
कधी मी इडीपस  कधी तू ययाती 
बनत राहिलो, कण्हत राहिलो 


आता मला  सांग बाप
आता मला सांग  
आयुष्याच्या संध्याकाळी 
खिडकीत बसून विषण्ण नजरेने 
दूरवर बघत असतोस तेव्हा 
तुला नेमकं काय आठवतं 

तीस वर्षाची मास्तरकी ? 
कपाटाच्या किल्ल्या ?
नदीतला डोह ?
गीतामाईचा पदर ?
भांडून गेलेला पूत  ?
सरणावरची लेक ...?

खरं सांग बाप 
कॅन्सरनं पांगुळलेलं शरीर घेऊन 
व्हीलचेअर वर बसल्यावर आज 
तुला नेमकं काय काय आठवतं ? 









Thursday, 28 June 2012

पावसाळा


पावसाळा. लहानपणी चिखलात अंगठे रोवून शाळेत जाणारा.
पावसाळा. मळ्यात आंब्याच्या झाडावर चढून पानावरून गळणारी टीप टीप पाहणारा.
पावसाळा. सायकलवरून भिजत कॉलेजात जाणारा. हट्टानं प्रत्येक पावसात भिजणारा. 
पावसाळा . रात्रीच्या अंधारात मद्यधुंद गझल ऐकणारा.
पावसाळा.  रेशीमस्पर्शाने गात्रांचा उत्सव सजवणारा.
पावसाळा. तुझ्या निरोपाचा.
पावसाळा. नुसताच.

Thursday, 3 May 2012

... आपली शाळा पुन्हा भरवा !




तीर्थरूप मास्तर, 
तुम्ही गेल्याचं कळलं... खूप खूप दुःख झालं मास्तर .एवढं दुःख बाप मेला तेव्हाच झालं होतं.
कळायला लागल्यापासून तुम्हाला बघतोय मास्तर .तुमचा तो जाड फ्रेमचा चष्मा आता मिळत नाही बाजारात. (आता बाजारात पिझ्झा, मोबाईल आणि शिक्षण मिळतं.)
तुमचा तो ट्रेड मार्क चष्मा, चुरगळलेला पांढरा सदरा, आणि पांढरी ढगळ पतलून ...लहानपणापासून तुम्ही जुनेच वाटायचात मास्तर .पण  तो  उत्साह..एवढा उत्साह आणायचात  कुठून मास्तर? दहावीला बोर्डात आलो तेव्हा लहान मुलासारखं कडेवर घेवून नाचलात मला! केवढा ओशाळलो होतो तेव्हा..वर्गमित्र अजूनही चिडवतात... कधी भेटलेच तर! पण तुमचा विषय आता फारसा निघत नाही. कुणी काढत नाही. जुनी  कोवळीक आठवणीतही सोसवत नाही कुणालाच आता...
वर्गात यायला मला नेहमीच उशीर व्हायचा तेव्हा अख्ख्या  वर्गासमोर  'कोंबडी' ची  शिक्षा द्यायचात. कान पकडून खाली वाकल्यावर तुमच्या चपलीचा तुटलेला अंगठा दिसायचा...किती वर्षे एकच जोड  वापरत होतात मास्तर? 
निकालाचे पेढे द्यायला तुमच्या घरी यायचो तेव्हा मंगळवार पेठेतल्या तुमच्या त्या दोन खोल्याच्या कळकट बसक्या घरात आणि तुमच्यात मला फारसा फरक वाटायचा नाही... आताच्या मास्तरांनी गावात plotting चा धंदा सुरु केलाय. नुसत्या पगारावर कुठं भागतंय  आजकाल मास्तर! सोबतीला शिकवण्या, real -estate  , राजकारण असं काहीतरी करावंच लागतं की...तसं आताच्या मास्तरांना मास्तर म्हटलेलंही आवडत नाही. पण टी - शर्ट घालणाऱ्या , आणि शाळेच्याच टपरीसमोर गुटखा चघळणाऱ्या  या पोरांना 'मास्तर' म्हणवत देखील नाही...सर्व शिक्षा अभियान , मिड डे मिल , पट पडताळणीच्या गदारोळात गुरु मात्र हरवलाय !
फाशी घेउन मेलात मास्तर!
बातमीत त्यांनी  छापलं होतं तुमच्या मागे परिवार नाही. पोरकं करून गेलात मास्तर, पण  जाताना डोक्यावर फार मोठे ओझे ठेवून गेलात. तुमच्या मरणाचं दुःख एकवार सोसवेल मास्तर, पण तुमच्या संस्कारांचा भार सोसवत नाही . 
तुम्ही  म्हणायचात तसं पाय ठेवील तिथे पांढरी कमळे  उगवीत गेलो मी,पण आज माझ्या अंगावर फक्त    चिखलच उरलाय मास्तर!
तुम्ही काय गांधी- टोलस्टोयच्या गोष्टी  सांगायचात पण असलं काहीच चालत नाही इथे .  तुम्ही कसलं  ते मूल्य-शिक्षण म्हणायचात...आज शिक्षण विकत मिळतंय, उद्या  मास्तर मूल्येही मिळतीलच की...तुम्ही सांगायचात तसं काही होत नसतं... भव्य ,उदात्त असलं  आयुष्यात काहीच नसतं ,जे काही असतं ते फारच मुलभूत आणि भोंगळ असतं...नागड्या जगात नागडंच होऊन जगावं लागतं ..आता भेटलात कधी तर मीच तुमची शिकवणी घेईन म्हणतो...
पण हेसुद्धा फार उशिरा कळलं मास्तर! 
रागावू नका मास्तर, पण पाटी आणि दप्तर सावरण्याच्या नादात प्रभातफेरी फार पुढे निघून गेली हे कळेस्तोवर आयुष्य मध्याह्नी आलं होतं...वर्गात नेहमी पुढच्या बाकावर बसलो पण आयुष्यात मात्र मागे राहिलो मास्तर... तुम्ही अभिमानाने 'माझा  विद्यार्थी'  म्हणून ओळख करून द्यावी अशांपैकी मी काहीच झालो नाही. गर्दीतलाच एक निनावी चेहरा बनलोय. लोकलने अप-डाऊन करतो मास्तर, ई. एम. आय. भरून संसार करतो, ऑफिसात बसून  तिकिटाच्या कागदावर महिन्याचे हिशोब जुळवीत असतो. दिवस रात्र भेदरलेला असतो मास्तर, दाखवत नाही कुणाला पण आतून नुसता फाटलेला असतो. चेहऱ्यावरची घडी विस्कटू देत नाही मी वर्षभर...पण १५ ऑगस्टला, 'ऐ मेरे वतन के लोगो' ऐकू आलं की आपोआपच  रडू येतं मास्तर!!!
आपली शाळा पांगली मास्तर, बालपण कुठल्याकुठे विरून गेलं...आणि  तुमच्यासोबत आता निरागस चांगुलपणाशी असलेलं नातं देखील..
खूप खूप एकटं  वाटतंय मास्तर...
सोडून गेलात मास्तर! . 
पहिल्या पगारावर तुम्हाला एक नवा कोरा सदरा  घेउन द्यायचा होता, कुठे खूप मोठा अधिकारी झालो तर भाषणात तुमचं नाव घ्यायचं होतं, वेळ काढून तुमच्या घरी एकदा भेटायला यायचं होतं,तुमचे सुरकुतलेले हात हातात घेउन माहेरवाशिणीसारखं  गुज करायचं होतं... सगळ्या जगाचे गाऱ्हाणे तुमच्याकडे सांगून तुमच्यापाशी मनभरून रडायचं होतं...
माफ करा मास्तर , यातलं काहीच करू शकलो नाही.
पण, एकदा या की मास्तर!
परत या मास्तर, आपली शाळा पुन्हा भरवा ! 
पुन्हा एकदा वर्गात तोच चुरगळलेला सदरा आणि  पतलून घालून या...पुन्हा एकदा मला  शिक्षा करा, पुन्हा एकदा जाड भिंगाचा चष्मा सावरीत आम्हाला त्या हितोपदेशाच्या गोष्टी सांगा...परत या मास्तर, आपली शाळा पुन्हा भरवा ! 














Tuesday, 6 March 2012

होळीची कविता- 'कॉन्डोमचे चाराणे




सर्व  मित्रांना  कळविण्यात  अत्यंत  आनंद  होतो  की  यंदाच्या  होळी निमित्त आपणा सर्वांसाठी  प्रेमाची एक 'आंबट'  भेट  म्हणून  आम्ही  एक  कविता  सादर  करीत आहोत.  तथापि  सदरील  कविता  'फक्त प्रौढांसाठी'  या  गटात  मोडणारी  असल्यामुळे  (थोडे  सभ्यतेच्या  हव्यासापोटी आणि  थोडे  कपिल सिब्बलच्या भीतीपोटी)  आम्ही ती  जाहीरपणे  प्रकाशित  करू शकत नाही.  पण  टायटल  वाचून  एव्हाना  चाळवलेली  तुमची रसिकता ( आंबटशौकीनपणा ) भंग  पावू  नये  म्हणून  आम्ही  त्यावर  एक  तोडगाही  काढला  आहे.  सर्व  इच्छुकांनी आपआपला  ई-मेल आयडी  ह्या पोस्टखालील  कॉमेंट  मधे द्यावा.  कविता  तात्काळ  आपल्या  'इन-बॉक्स' मधे पोचती केली जाईल.  इच्छुकांमध्ये  आमच्यापेक्षाही  कुणी  लोकलज्जेला  घाबरणारे  असतील  तर त्यांनी गुपचूप  आपला  ई-मेल आयडी  आम्हास  मेसेज करावा.  "आपली प्रतिष्ठा हीच आमची प्रतिष्ठा"  असे  मानून आम्ही आपली माहिती गोपनीय ठेवू. पामराच्या कवितेमुळे होळीच्या आपल्या आनंदात तिळभर का होईना भर पडावी 'तेवढी माझी कमाई'!
आपण सर्वांना हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपलाच - फकीरा.

Friday, 30 December 2011

आयुष्यात पहिल्यांदाच मी दारू आज पिणार आहे



आयुष्यात  पहिल्यांदाच मी  
दारू आज  पिणार आहे 
ग्लास माझा काठो  काठ भरून  घेणार  आहे
जुन्या  सगळ्या  दिवसांसाठी  रडून  घेणार  आहे 
         आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
           दारू आज  पिणार आहे 


          जहाल  मवाळ  गोडसे  गांधी 
              मित्र  आपले  छंदी  फंदी 
         Thirty First ची  साधून  संधी 
              आज माजवू अंदाधुंदी
धाक धूक थोडं होणार आहे ,पण घेणार  म्हणजे घेणार   आहे
            आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
              दारू आज  पिणार आहे 


               धुंद  ,मंद ,आंबट ,धुरकट
               बार मधली मादक सृष्टी 
             ए. सी. मध्ये बसल्या बसल्या 
             हळूच  रमतील  गप्पा   गोष्टी
बोलका  मी  ही   होणार  आहे ,ऐटीत  order   देणार  आहे 
               आयुष्यात पहिल्यांदाच मी 
                 दारू आज पिणार आहे 


         कसली भीड कसली लाज  
          सज्जनतेचा  सारा साज 
        पेल्यामध्ये
                उतरवून 
                         आज
       म s स्त  मौला   होणार  आहे
         आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
           दारू आज  पिणार आहे 

                 (ओता  रे  ओता )
           आठवून  साऱ्या  जुन्या  आयटम
           पहिला  पेग  "top to bottom "
                    (cheers!)
            पहिली  स्साली         सोडून  गेली 
   दुसरी  भोळी         उगाच  भ्याली 
              तिसरी  च्यायला       बायकोच  झाली 
         चौथी  म्हणजे        माझी  साली !
    आढे   वेढे   घेणार   नाही , सगळं  खरं   सांगणार  आहे, 
                आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
             दारू
        आज  
पिणार आहे 

              यश -अपयश   सारंच  vague
              त्याच्या  साठी  दुसरा  पेग 
             मागवून  ठेव  लगेच  तिसरा  
             life चा पार  झालाय  कचरा 
पाचवा  
  सातवा 
   सहावा
     आठवा 
          मागोमाग  लगेच  पाठवा 
cock-tail भारी करणार आहे, बेफाम  होऊन  पिणार  आहे, 
          आयुष्यात  पहिल्यांदाच मी   
            दारू आज  पिणार आहे

"एवढ्यातच   अक्कराss  वाजले  भाई ?
अजून   सिग्रेट  कशी  पेटली  नाही ?"
deeeep  कश  ओढणार   आहे... 
डोळे  मिटून  घेणार  आहे.......... 
ग 
       र 
ग 
          र 
त्या 
          मग  
             भो व ऱ्या म ध्ये 
क्षणभर बुडून  जाणार आहे

सेंटी-बिंटी  होणार आहे, मुकेश-फिकेश गाणार आहे
 आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
  दारू आज  पिणार आहे 


“आत्ता  कस्सं मस्स्त  वाटतंय !, सा sला सगळंच  double दिसतंय... ”
           “आयुष्याची  कर्मकहाणी  तुला  सांगतो  ऐक  रे  भावा... ”
“चखणा सारा  तुम्हीच  खावा,  मला  अजून  एक  पेग  हवा ”
          Dialogues भारी  मारणार  आहे ,माहौल करून सोडणार  आहे 
आयुष्यात    पहिल्यांदाच    मी 
    दारू आज 
  पिणार  आहे


अटक   मटक   चवळी  चटक 
चल  रे  पांडू  साईडला  वटक 
          फेकून  थोटूक  करीन  चेटूक 
          काय  रे *** बघतोस  टुकटुक 
मोडून मुंडी मुरगळून टाकीन
ash tray मधे चुरगाळून टाकीन 
        वैताग  बाहेर  काढणार  आहे , भैन*द  माद**द  म्हणणार  आहे 
                     आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
  दारू 
आज 
 पिणार
 आहे


           तुला  माझी  शप्पथ  भाऊ 
                     अजून  एक  पेग  घेऊ 
                               स्टेशनवरती  भुर्जी  खाऊ   
                                       झालाच  बार  बंद  तर 
                                                मागच्या  दाराने  बाहेर  जाऊ 
                        टल्ली  टल्ली  होणार  आहे , वरतून  पार्सल नेणार  आहे 
                                                                   आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
                                                                               दारू आज  पिणार आहे 


नंतर पान खाणार आहे,  
चटणी चमन   रोजचंच  आहे , १२०-३०० मागवणार आहे   
  
                      बरळत 
               बरळत
         बोलता
 बोलता, 
       झुलत   
            झुलत  
                  चालता
                        चालता, 
मधेच थांबून रस्त्यावरती 
आयुष्याच्या तोंडावरती  
     'पच्चाssक्'
-कन्  थुंकणार आहे 
उमाळे  गिळून घेणार आहे, जरा डोळे  टिपणार आहे,

नंतर 
गाढ झोपणार आहे,
ठार मरून जाणार आहे 
सकाळी मात्र उद्या मी 
पुन्हा  कंबर  कसणार  आहे!  
नव्या  वर्षाचा  गालगुच्चा  घेऊन 
"काय  रे  बबड्या !" म्हणणार आहे!

 हे सगळं पुढचं पुढे, पण 
आजचा प्लान (लई  भारी ) जमणार  आहे
संध्याकाळ पर्यंत थांबतंय  कोण
दुपारीच बैठक रंगणार आहे  

 कारण 

आयुष्यात  पहिल्यांदाच मी   
 दारू आज  पिणार आहे.
ग्लास माझा काठो  काठ भरून  घेणार  आहे
जुन्या  सगळ्या  दिवसांसाठी  रडून  घेणार  आहे 
आयुष्यात पहिल्यांदाच मी 
   दारू आज पिणार आहे 


 (टीप  - कविता  हेच  आग्रहाचे  निमंत्रण  समजावे ) 

Thursday, 8 December 2011

मंत्र्याचे पसायदान

                 मंत्र्याचे पसायदान
('फकीरगाथा' अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२ )


आता हायकमांडे देवे ।  येणे सत्तायज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे ।   'कॅबिनेट' हे  ।।१।।

जे विपक्षांची व्यंकटी सांडो ।  तया फुटीरांची गती वाढो।
अपक्षांशी  आपुले पडो ।   मैत्र जीवाचे  ।।२।।
 
अल्पमताचे तिमिर जावो ।  जनकौलही म्याची पाहो । 
जो जे वांछील तो ते लाहो।   मंत्रिजात  ।।३।।

'वर्षा' त सांजसकाळी ।  सत्तानिष्ठांची मांदियाळी ।
तयांत 'फायनान्सर' मंडळी ।  भेटतु या भूता  ।।४।।

करा अस्मितेचा आरव ।  गाठा दिल्लीश्वराचे गाव ।
करिता तेथ आर्जव ।   फायद्याचे  ।।५।।
 
लोकनेते जे अलांछन ।   बुद्धिमंत जे निष्कांचन ।
ते झाडून सर्व सज्जन ।   कचरा होतु  ।।६।। 

किंबहुना सर्व सुखी ।  उरी बसुनी इये लोकी ।
भजितो मी  हीच खुरची ।   अखंडित  ।।७।।
 
आणि सत्तोपजीविये ।  राहोनि मन्त्रिपदी इये ।   
लुटालूट जी म्या करो जाये ।   वाटून घ्यावी  ।।८।।
 
तेथ म्हणे हा घडला ठराओ ।   हा होईल दान पसावो । 
येणे वरे मंत्रीदेवो ।  सुखिया झाला  ।।९।।  
 

Monday, 10 October 2011

पोतराज





मुंबईतल्या  अनेक  गजबजलेल्या  जागांपैकी  ही  एक  जागा . हवेत  समुद्राचा  दमट  वास , ओसंडून  वाहणारी  गर्दी , दाटीवाटीने  उभी  असलेली  दुकाने ,उंचच उंच इमारती, कॉर्नरवरच्या   चहाच्या  टपर्या , बेवारस  फिरणारी  कुत्री , आणि  असंख्य  आवाज  एकमेकात  मिसळून  तयार  झालेला  परिचित  कोलाहल .
बायको  क्लिनिकमध्ये  पेशंट  तपासत  होती . माझी  कामं  उरकून  मी तिला  न्यायला  आलो होतो . तिचं  होतंय  तोवर  बाळाला घेउन  मी  क्लिनिकबाहेरच्या   स्ट्रीटवर   फेऱ्या  मारायला  लागलो . समोरच्या  ग्यारेजवाल्याच्या  दुकानातील  धांदल  टुकूटुकू   बघत  बाळ   चांगलीच  रमली  होती . एवढ्यात  कसल्याशा   अनोळखी  आवाजाने  तिची  तंद्री  भंग  पावली . टुणकन मान  वर  करून  ती  त्या  आवाजाचा  वेध  घेऊ  लागली . इथल्या  गर्दीत  असला  आवाज  अपेक्षितच  नसल्यामुळे  मी  ही  तिला  घेऊन  त्या  आवाजाच्या  दिशेनं  गेलो . मार्केटच्या  मुख्य  रस्त्यावरून  तो  आवाज  येत 
होता . या  आधी  गावाकडेच  ऐकलेला ... गुबू ..गुबू ..गुबू ...
मी आवाजाच्या  दिशेनं  नजर  वळवली  आणि  बघितलं ....पोतराज !!!
कमरेच्या  वर  उघडेबंब अंग ,पिळदार  शरीर , पाठीवरून  मोकळे  सोडलेले लांबसडक  केस  ,कपाळभरून  कुंकवाचा  मळवट , त्याखालचे  उग्र  डोळे , धारदार  नाक ,  कमरेभोवती  वेगवेगळ्या  रंगांच्या  कापडी  झीरमाळ्याचे  वस्त्र , पायात  घुंगरू , ओल्या  कुंकवाच्या रेषा ... आणि हातात  धरलेला लांबलचक असूड! 
त्याच्यासोबत त्याची बायको होती.  फाटकं   लुगडं नेसलेली , खांद्यावर   दोरीनं  अडकवलेला  चामड्याचा  ढोल,  मानेवरून पोटावर बांधलेल्या कळकट कापडात सुकट चेहऱ्याचं   तान्हं बाळ , आणि डोईवर मरीआई!  तिचा चेहरा सावळा पण कोरीव होता.  एका हातातली टिपरी चामड्यावर घासत ती वाजवीत होती -
                                                                गुबू ..गुबू ..गुबू ...

पोतराज मोकळ्या जागेत उभा राहायचा  आणि नाचत नाचत चाबूक हवेत उंच फिरवायचा. चाबकाचा फटकारा त्याच्या पाठीवर बसताक्षणी  काडकन आवाज व्हायचा. मग त्याची बायको दुकाना- दुकाना समोर उभी राहून मरिआईच्या नावानं दान मागायची. काहीजण द्यायचे , काहीजण फटकारून लावायचे ,काहीजण बघून न बघितल्यासारखं करायचे. काहीजणांच्या नजरा तिच्या फाटक्या वस्त्रामधून  जे बघायचे ते बघून घेत होत्या. माझं लक्ष तिच्या झोळीतल्या बाळाकडे गेलं. धुळीनं माखून  कळकट झालेलं ते बाळ कधी रडत होतं, कधी त्या झोळीच्या कापडाशी खेळत होतं. तिचं त्या बाळाकडे लक्ष नव्हतं.
पोतराज पुन्हा नवीन जागी उभा राहिला  आणि नाचत नाचत  त्याने कडाडकन चाबकाचा आवाज काढला . त्या  आवाजासरशी माझ्या अंगावर शहारे आले  आणि मला माझ्या लहानपणीचा पोतराज आठवला!
                                                   "आली आलिया मरीआई
                                                     तिचा कळंना आनभाव 
                                                   भल्या भल्याचा घेती जीव    
                                                    आली आलिया मरीआई " 

भरदार आणि उग्र दिसणारा हा पोतराज गावात आला म्हणजे बायाबापड्यांची लेकराबाळांची  एकच धांदल उडायची. ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या सावरीत आणि शेंबडी नाकं पुशीत आम्ही लेकरं मोठ्या उत्साहानं "पोतराज आला!" "पोतराज आला!" म्हणीत उड्या मारीत  पोतराज बघायला पळत सुटायचो.पायातल्या  घुंगराचा  नाद  करीत  ठेका  घेऊन  पोतराज नाचायला  लागला  की  आम्हा  लेकरांना  आभाळाएवढा  आनंद  होई . चाबूक हवेत फिरवून त्यानं पाठीवर 'कडाड' आवाज काढला की छातीत  धड धड करी आणि तरी आम्ही दोन्ही डोळे विस्फारून पोतराजाकडे  बघत रहायचो.
हा  पोतराज  शहरी पोतराजासारखा चिरमटलेला  नसायचा . हा मिजाशीने  गावात मिरवायचा . हक्काने घरा घरात जायचा . वाड्याच्या दारासमोर उभा राहून कडक आवाजात साद घालायचा- 
                                                           'दार उघड बये दार उघड!"
त्या हाकेसरशी घरातल्या सवाशीण बायका, म्हातारी आजी- जी  कुणी असेल ती -घाई गडबडीने हळदी कुंकुवाचा करंडा घेऊन,  सुपात धान्य घेऊन, डोक्यावर पदर घेऊन मरीआईच्या दर्शनाला यायच्या. पोतराज मरीआईचा सांगावा घेऊन  यायचा. कोणी काही नवस बोलला असेल तर बायका, म्हाताऱ्या पोतराजाची वाट बघायच्या. मग तो आला की मरीआईला  साडी चोळी करून नवस फेडायच्या. आई पोतराजाच्या अंगात यायची आणि प्रसन्न होऊन वरदान द्यायची-
                                   " इडा पीडा टळो. वंश वाढीला लागो. धन धान्याला बरकत येवो"   .
मरीआई म्हणजे 'कडकलक्ष्मी'.  तिचा  'सराप' वाईट असतो. तिचा कोप झाला तर घरात पडझड सुरु होते, माणसं, लेकरं, गुरं ढोरं दगावतात. म्हणून तिला खूष ठेवण्यासाठी माय मावल्या धडपड करायच्या. दान मिळालं की पोतराज खुश होई. मग नाचत नाचत गोल रिंगण घेई आणि आम्हा लेकरांकडे  बघून पुन्हा एकदा  चाबूक फिरवून पाठीवर  आवाज काढी- कडाड!
तेव्हा आमच्या वाड्यात पोतराज यायचा, वासुदेव यायचा, गोंधळी यायचे...हे लोक पावसासारखे हवे हवेसे  आणि विठ्ठलाइतके  खरेखुरे वाटायचे !
इथे- मुंबईत- मात्र हा पोतराज फारच विजोड वाटत होता. आजूबाजूच्या चकचकीत इमारतीत, इमारतींप्रमाणेच  वसकन अंगावर येणाऱ्या लोकांच्या नजरांमध्ये, इथल्या करकरीत अलिप्तपणात हा कसातरीच बेंगरूळ वाटत होता. रानात सुंदरपणे बागडणारं फुलपाखरू एखादे दिवशी बेडरूमच्या ट्यूबलाईट भोवती चिलटासारखं घिरट्या घालायला लागलं म्हणजे कसं ओंगळवानं वाटत तसं!
हा पोतराज त्याचं गाव सोडून इथे का आला असावा ?
कदाचित शहरामध्ये खूप पैसा असतो असं त्याला कुणीतरी सांगितलं असेल.  कदाचित इथे तुला चांगला लौकिक मिळेल असं कुणीतरी म्हटलं असेल .  कदाचित ही बाई दुसऱ्या जातीची असेल आणि तिच्याशी लग्न केलं म्हणून याला गावातल्या लोकांनी हाकलला असेल....तोंड लपवायला मुंबई सारखं शहर नाही. तुटून पडलेल्या सगळ्या लोकांसाठी आणि गावातून भिरकावून दिलेल्या सगळ्यांसाठी उकीरड्यासारखं, हे  शहर म्हणजे एक वरदान आहे.
माझं लक्ष पोतराजाच्या चाबूक धरलेल्या हाताकडे गेलं. त्याचा  अंगठा तुटलेला होता. गावातून रानावनातून निखळलेला हा एकलव्य शहरात आला होता. आणि तो एकटाच नाही, अख्खी एक संस्कृतीच विस्थापित होत होती.
त्याच्या बायकोने ताल धरला होता. हातातल्या दुसऱ्या टिपरीने ती आता वेगळाच ठेका वाजवीत होती-

                           डंग डंग डडांग-  डांगचिक  डडांग,   डंग डंग डडांग- डांगचिक  डडांग 

मघाचं केविलवानं  गुबू गुबू आता बंद झालं होतं आणि हे टिपेचं, घाबरवून सोडणारं  संगीत सुरु झालं होतं.
आता ती दान मागत नव्हती. निर्विकार चेहऱ्याने  सरळ समोरच्या डांबरी रस्त्याकडे बघून ती भेदक सूर वाजवीत होती-
                           डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 
जणूकाही सगळा बाजार त्या क्षणात गोठून बसलाय आणि त्याच्या पलीकडे जाउन ती  एकटीच तिथे वाजवीत होती. तिच्या वाजवण्यात लोककथेतील पात्रांचा मनस्वीपणा होता. आपलं बाळ गळ्यात लटकवून जणू ती ह्या इमारतींना, ह्या शहरांना, ह्या संस्कृतीला प्रश्न विचारत होती.

                    " गावं खेडी भाकड झाली . जुने सांधे निखळले.  पोतराज फुटून शहराकडे वळले."
                          
                        डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग
                     
                                  " माये नाळ वाळून गेली,  पान्हे सारे आटून गेले
                                      मुळं  पाळं  खुडून गेले, भगत सारे बुडून मेले" 
                                           
                            डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 
                 
                                   "रेट्यामध्ये जिरत चाललो, आम्ही आता मरत  चाललो 
                                    देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो" 
                                           
                             डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

तिच्या या प्रश्नात अगतिकता नव्हती, याचना नव्हती की उपकाराची आस नव्हती. ती फक्त साऱ्या शहरानं दवंडी देत फिरत होती - 'आम्ही आता बुडत चाललो'.
तिच्या डोळ्यात रानावनातल्या अघोरी देवतांचं तेज उतरलं होतं.
गोठून बसलेल्या त्या क्षणाच्या बुडबुड्यातून काही इमारती सरसरून वर आल्या.  आणि जादू   ह्वावी तशा चमचम चमकत गगनाला भिडल्या. अजस्र  अफाट  महाकाय. .अमरवेलीसारख्या.   क्षितिजापर्यंत  लांबल्या. आसमंत व्यापून गेल्या.
आणि तेवढ्या त्या चिंचोळ्या डांबरी रस्त्यावर बाई वाजवीत राहिली . तिचा ठेका या सगळ्या जंजाळातून  दुमदुमायला लागला.

                               डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

आणि बघता बघता त्या बाईच्या पाठीमागे एक भल्ली मोठी रांग उभी राहिली. या रांगेत पोतराज होते, वासुदेव होते, गोंधळी होते, बोहारणी, कोल्हाटणी , अंगठा तुटलेले आदिवासी, मोरपिसांचा झाडू घेतलेले फकीर होते...दूर कुठेतरी वारकरयांचे  झेंडे दिसत होते.
या गर्दीला थांग नव्हता. या सगळ्यांच्या वतीनं ती वाजवीत होती-

                                    "देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो."
                                
                                डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

तिच्या ठेक्यात कुठेतरी अस्पष्ट भूपाळीचे सूर ऐकू येवू लागले, कुठेतरी 'ग्यानबा तुकाराम' चा  गजर ऐकू येऊ लागला आणि हा सगळा नादकल्लोळ  वर वर चढत आभाळाला भिडत चालला. आभाळावर आता सत्ता ह्या  जत्थ्याची होती की त्या इमारतींची हे सांगवत नव्हते  .
आणि ह्या सगळ्या गर्दीच्या पुढे पोतराज चालला होता. आता पोतराजाच्या अंगात आलं होतं. तो जोरजोरात घुमू लागला होता. आणि त्वेषाने गोल  गोल फिरून स्वतःच्या चामड्यावर चाबकाचे आवाज काढीत होता - कडाड कडाड!

कुणीतरी  'साहेब' म्हणून हाक मारली आणि  मी अचानक भानावर आलो.
माझ्या अंगावर चांगले कपडे होते. माझं बाळ संगमरवरासारखं  गोरंपान आणि  गुटगुटीत दिसत होतं.
शहरी झालो होतो. साहेब झालो होतो. इस्तरीच्या कपड्याची घडी मोडू  देणं परवडणारं  नव्हतं. पोतराज केव्हाच निघून गेला होता.

पाऊस माती सुगीत उगवलेली ही संस्कृती आणि तिचे हे शिलेदार माझ्या वनरूम किचन मधे मी कुठे बसवू? देवघरासाठी एक स्क्वेअर फूट जागा जिथे चैन वाटावी तिथे मी पंढरीची दिंडी कुठे बसवू? पोटापाण्यासाठी रोज लोकल मधून जाता येता जिथे घरातल्या भिंतींप्रमाणेच मनालाही कुबट ओल सुटते तिथे मी ही एक पोतराज झालेला असतो...सांधा निखळलेला, फुटून बाहेर पडलेला!