Saturday, 23 April 2022

भोंगे घ्या...भोंगे sss !

मी काय म्हणतो, एका भोंग्याची किंमत १० लक्ष रुपये करा!

भोंगा कुणाचा वाजतोय, कुठे वाजतोय, कशासाठी वाजतोय ते बघू नका. आधी तुम्ही किमती वाढवा. 

त्या पैशातून मग तुम्ही पेट्रोल -डिझेलला सबसिडी द्या, खत- बियाण्याला सबसिडी द्या, गेलाबाजार लिंबू तरी स्वस्त करा!  कारण ह्याच गोष्टी आमच्यासाठी जास्त जिव्हाळ्याच्या आहेत... !

आणि भोंगे म्हणजे एकजात सगळेच महाग करा. राजकीय कार्यक्रमात वाजणारे भोंगे, लग्नात- मुंजीत- वाढदिवसाला वाजणारे भोंगे , जयंत्या -मयंत्यात वाजणारे भोंगे.... सगळे आवाक्याबाहेर नेऊन ठेवा. हातात माईक घेतला की लाख रुपये मीटर पडलेच पाहिजे! 

अभिव्यक्ती आपला अधिकार आहे. पण अभिनिवेशाची किंमत मात्र ज्याची त्याने मोजावी.

झालंच तर भोंग्यासोबत अजूनही काही गोष्टी महाग करा....  

ते व्हॉटसअपचे फालतू मेसेज पहिले महाग करा,

रंग कुठला आहे ते बघू नका झेंडे सगळे महाग करा,

व्यासपीठे महाग करा, 

इतिहासाची पुस्तके महाग करा...

अस्मिता आणि अभिव्यक्ती या गोष्टींना अपार मोल आहे, पावित्र्य आहे... दीर्घ लढे देऊन, प्रसंगी रक्त सांडून प्रत्येक समाजाने त्या जोपासल्या आहेत.  त्या बाजारू आणि स्वस्त होता कामा नयेत. सर्वात वाईट म्हणजे त्या राजकीय चिखलफेकीचा विषय बनता कामा नयेत.  

दुःख म्हातारी मरेल याचे नाही पण काळ सोकावला तर खरी पंचाईत मात्र लोकशाहीची आणि तिच्या दर्जाची होणार आहे हे निश्चित!

Sunday, 29 March 2020

कोरोना...निर्णायक वेळ!

अमेरिकन मानववंश शात्रज्ञ जेरेड डायमंड यांचं ‘ गन्स,जर्म्स अँड स्टील’ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर, एक इवलासा  विषाणू मानव जातीच्या इतिहासाची दिशा बदलू शकतो ह्या गोष्टीची मोठी गम्मत वाटली होती. त्यावेळी जराही कल्पना नव्हती की लवकरच अशा एका विषाणूचा प्रकोप आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
COVID १९ ची साथ आता सामाजिक संक्रमणाच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. म्हणजेच आपल्याच अवती भवती असलेल्या एखाद्याकडून हा संसर्ग आता आपल्याला होऊ शकतो. ही मोठी नाजूक अवस्था असते. ‘ गर्दी’ हा ज्या समाजाचा स्थायीभाव आहे त्या समाजासाठी ही अवस्था घातक ठरू शकते. म्हणून आपण पाहतोय की सरकार lock down जाहीर करतंय , प्रशासन परोपरीने बजावतंय की घराबाहेर पडू नका, social distancing पाळा... पण ’नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' ह्या म्हणीसारखं आपल्यावर मात्र हवा तसा परिणाम होताना दिसत नाही. बहुतेक अजूनही आपल्या मनात असा भ्रम आहे की काही केल्या आपल्याला हा आजार होणार नाही. निव्वळ गम्मत म्हणून मोटारसायकलवर फिरणारी पोरं गावात दिसतंच आहेत, औषधाची चिठ्ठी खिशात ठेवून संचारबंदी बघायला निघालेले हौशे फिरतंच आहेत, सुखासुखी बसलेले आमचे ‘इकडचे नातेवाईक तिकडे जाऊ द्या’ म्हणून पासेस मागणारे उच्चभ्रू प्रशासनाला तगादा लावतंच आहेत .... काहीही करून आपण कसे सिस्टिमच्या वरचे आहोत आणि सामान्यांना लागू असणारी बंधनं आपल्याला कशी लागू होत नाहीत हे दाखवण्याचा काही लोकांना सोस असतो. असे लोकच येत्या काळात आपल्या समाजाचा घात करतील. इतिहास पाहिला आणि नांदेड पुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडे कधीच मोठी युद्ध झाली नाहीत, कधीच कुठली सुनामी आली नाही, ज्वालामुखी, भूकंप अशा आपत्ती तर आपल्या लोकांना माहीतच नाहीत. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत अशी काहीशी बेफिकिरी आपल्या मानसिकतेत रुजली आहे....आणि इथेच हा विषाणू आपल्याला मात देऊन जाईल. आता क्षणभर अशी कल्पना करूया कीं आपल्या अशा बेफिकिरीमुळे कोरोनाची लागण आपल्याकडे सुरु झालीय . आणि अगदी फार नाही पण केवळ १ टक्का लोक या आजाराने बाधित झाले आहेत. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ढोबळ्मानाने ३५ लक्ष गृहीत धरली तरी बाधितांचा हा आकडा ३५००० इतका होतो . आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले डॉक्टर्स, हॉस्पिटलचे बेड्स, आणि व्हेंटीलेटर्स यांचं साधं त्रैराशिक मांडलं तर दर १८ कोरोना रुग्णांमागे एक डॉक्टर, २० रुग्णांमध्ये मिळून एक बेड आणि ३५००० रुग्णांमध्ये मिळून एक व्हेंटिलेटर अशी विदारक परिस्थिती समोर येते. आणि हे फक्त एक टक्क्यावरच बरं का !  ‘ घराबाहेर पडू नका’ म्हणून प्रशासनाचा जो कंठशोष चालला आहे त्यामागे हे त्रैराशिक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंय. आपली आरोग्य व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा ताण झेलण्यासाठी निदान आजघडीला तरी सक्षम नाही हे वास्तव आहे. जिथे इटली सारख्या देशाने हात टेकले आहेत तिथे वार्षिक उत्पन्नाच्या (GDP ) केवळ १.२८ % सार्वजनिक आरोग्यावर खर्च करणाऱ्या आपल्या देशाला ह्या संसर्गाचा विस्फोट झाल्यानंतरची परिस्थिती हाताळणे खूप कठीण जाणार आहे हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.   Prevention is the only cure for us !
त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा... प्रशासन म्हणतंय ते निमूटपणे ऐका आणि घरातच बसा.
आपण किती तीसमारखान आहोत हे दाखवण्याची ही वेळ नव्हे . निव्वळ उनाडपणा नियंत्रणात आणण्यासाठी जर आपण प्रशासकीय यंत्रणेची सगळी शक्ती आताच खर्च करणार असू तर उद्या ही यंत्रणा थकल्यावर आपण कुणाकडे बघणार आहोत? ह्या यंत्रणेला कुठलेच बॅक अप नाही हे लक्षात घ्या . There is no second line of defence....
अल्बर्ट कामू ह्या फ्रेंच लेखकाने ‘प्लेग’ नावाच्या त्याच्या पुस्तकात हाताबाहेर गेलेल्या साथीच्या तावडीत सापडलेल्या एका शहराचं वर्णन केलंय. व्यवस्थेचा सगळा कमकुवतपणा आणि मानवी स्वभावाच्या सगळ्या हिंस्र छटा अशा वेळी उजागर होतात. वाचताना अंगावर काटा येतो....
देव करो तशी वेळ न येवो पण तशी वेळ आलीच तर आपत्तीचा मुकाबला करण्याइतपत ऊर्जा प्रशासनात शिल्लक राहील हे बघण्याची जबाबदारी आपली आहे. डॉक्टर,पोलीस, प्रशासन,पत्रकार आणि जनता हे सगळे घटक सामंजस्याच्या एकाच पातळीवर उभे असतील तरच ह्या आपत्तीचा मुकाबला शक्य आहे .
आज ताबा आपल्या हातात आहे. उद्या तो नसेल. ह्या सार्वजनिक आपत्तीचे पर्यावसान सार्वजनिक जल्लोषात करायचे की सार्वजनिक शोकांतिकेत करायचे हा निर्णय उंबरठ्यातून पाऊल बाहेर टाकताना प्रत्येकाने घ्यायचाय...
परीक्षेच्या या घटकेला आपण कसे वागणार आहोत यावर आपलं मूल्यमापन उद्याचं जग करेल. १३५ कोटींचा भारत देश ह्या आपत्तीचा मुकाबला कसा करणार आहे ह्याकडे सगळं जग डोळे लावून आहे. खरी देशभक्ती दाखविण्याची हीच वेळ आहे. स्वयंशिस्तीने वागू तर नक्कीच आपण ही लढाई जिंकू. आणि सगळं माहित असूनही  उद्या तसेच वागणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच असू.... निर्णय आपल्या हाती सोपवतो.
जय हिंद !






Thursday, 9 July 2015

कोवळाई





इथून पुढे आता,  तुझा आणि माझा रस्ता वेगळा असेल
तुला मी आता इथेच, या वळणावर सोडून पुढे जात आहे.

असा घाबरतोस काय?…  अरे उलट घाबरायला तर मी हवं !
कारण तुझ्यासोबत मी माझ्या कितीतरी गोष्टी ठेऊन  जात आहे

बघ ,
तुझ्यासोबत मी माझ्या बालपणीची गाणी ठेवली आहेत
पऱ्यांची कहाणी ठेवली आहे …

अजून जरा पुढे बघ

फुटलेली पाटी
नव्याकोऱ्या पुस्तकांचा वास
शाळा सुटल्यावरचा कल्लोळ
राष्ट्रगीते अन प्रभातफेऱ्या …
हे सगळं  मी तुझ्यासोबतच तर ठेऊन जात आहे.

आता जरा अजून पुढे बघ

तो आर्त नजरेनं चंद्राकडे बघणारा छोकरा मी आहे !
तो 'चंद्र' मी तुझ्यासोबत ठेऊन जात आहे.

भाबडी काही वचने
स्पर्श काही हळवे
दुखरे काही दुरावे
पापण्याकाठचे ओलावे

खळखळून हसू ठेऊन जात आहे
कातरवेळची हुरहूर ठेऊन जात आहे .


बघ जरा नीट बघ अजून…

ती डोळ्यातली जिद्दी स्वप्ने
तो निर्मळ उन्मेष
काही तत्त्वे , मूल्ये
मंगळ  काही श्रद्धा

पवित्र चौथरे ठेवून जात आहे
घवघवीत मनोरे ठेवून जात आहे.


अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत…

रात्रीची जागरणं आहेत
जीवघेणे शोध आहेत
जगण्यातली बेदरकारी आहे
एक  भणंग फकिरी आहे …

कवितेची शाई ठेऊन जात आहे
माझी सारी कोवळाई ठेऊन जात आहे.


इथून पुढे आता,  तुझा आणि माझा रस्ता वेगळा असेल
तुला मी आता इथेच, या वळणावर सोडून पुढे जात आहे.

मला जायलाच पाहिजे , मी गेलंच पाहिजे.






Tuesday, 24 March 2015

सातबारा


मले वाचवून दाखवा हो , जरा माह्या सातबारा
का हो माह्या नशिबीच, लिव्हला ह्यो भोग सारा

कोण चढीवला बोजा, कसा झाला फेरफार
रिन फेडता फेडता, झाली जिन्दगानी गार

नाही टिप्पुस पाण्याचा, झाली शिवारं कोरडी
फास लावुनिया बाप मेला, लेक बांधतो तिरडी

झाला निसर्गच वैरी, अशी झाली गारपीट
घास मातीमोल झाला, बाकी उरे पायपीट

रोज घाशीत चपला, माय जाती तालुक्याले
"पैशे अनुदानाचे सायेब, कवा भेटीन वं मले" ?

माय कपाळ कोरडे, तुह्ये मला बघवेना
भेगा मातीत पडल्या, धग आता सोसवेना

माय मातीत राबता, झाले माती माती हात
रान रक्तानं शिम्पलं, केला दैवानंच घात

कशे पसरू हे हात…कशे पसरू हे हात
जाऊ कोणाले शरण
औंदा भैनीचे लगीन, पुढी दिसते मरण

ब्यांक नडे गरीबाले, झाल्या बंद साऱ्या वाटा
दारी दिसे सावकार , अंगी उभा राही काटा

आज्जी म्हणे काल मले, "काय फुलला मोहोर"!
आज्जी म्हणे काल मले, "काय फुलला मोहोर"!

दोरी टांगलेली दिसे, मले तठी  फांदीवर



Monday, 21 July 2014

जुन्या प्रेयसीस…


एवढं मात्र दोघांनी, एक जरा  सांभाळायला हवं 
असं  एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण  टाळायला हवं 


अजूनही तुला विसरलो नाही, खरं सांगतो गम्मत नाही 
७:१२ च्या लोकल सारखा, काळ कुणासाठी थांबत नाही 
आयुष्याच्या चाकोरीमध्ये  आपणही थोडं  रुळायला  हवं 
असं  एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण  टाळायला हवं


तुझा नवरा, माझी बायको  सगळेच असतात थोडे सायको
संसाराची रीतच असते , खाली-पीली टेन्शन कायको !
'ज्याचं प्रेम त्याला' शेवटी काही म्हण, मिळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण  टाळायला हवं


खाणाखुणा, शपथा-बिपथा , वाईनचे ते  दोन प्याले
रुसवे, फुगवे, शिकवे, गिले…  हाs य  गेले ते दिन गेले !
माझे सिक्स पॅक्स , तुझी झीरो फिगर… आठवून  थोडं हळहळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण  टाळायला हवं


"माझ्या शोन्या"… " "माझी शोनुली"…
"… चिडल्यावर फार सुंदर दिसतेस ! "
"love you , miss you… "
"तुझी, तुझी आणि फक्त तुझ्झीच… "

जुनी पत्रं वाचता वाचता, गालातल्या गालात हसताना
अन हसता हसता नकळतपणे  मधेच डोळे टिपताना
वेडेपण या वागण्यातलं, आतातरी आपल्याला  कळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण  टाळायला हवं


बाकी सगळी दुनियादारी, त्याला आपण चुकलो नाही
आधी तूच लग्न केलंस , तसा प्रेमाला मीही  मुकलो नाही
तुझ्या चष्म्याचा वाढता नंबर
एक माझा पांढरा केस
वयाचं तरी  भान थोडं,  जs रा आपण पाळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण टाळायला हवं


मनाचे लाख बहाणे असतात ,पण भूतकाळ जपणारे शहाणे नसतात

गुलाबाचं एक फूल
एक पत्र चुरगळलेलं
एक चुंबन दीर्घसं
हळुवार मिठीत विरघळलेलं…!

आठवणींचं त्या साऱ्याशा,  तुझ्या माझ्या दोघांच्या
इवलंसं एक गाठोडं बांधून,  काळाच्या नदीत सोडायला हवं…
अश्रू बनून  शेवटचं मी,  गालावरून तुझ्या  ओघळायला हवं
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं,  आता आपण  टाळायला हवं


एवढं मात्र दोघांनी, एक जरा  सांभाळायला हवं 
असं एकमेकांच्या स्वप्नात येणं, आता आपण  टाळायला हवं 












Sunday, 22 June 2014

प्रिय ढेकूण,



प्रिय ढेकूण ,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्रास कारण की आज सकाळीच ऑफिसच्या भिंतीवर तुझे दुर्मिळ दर्शन झाले . तू  मॉर्निंग वॉकला निघाला असशील कदाचित .
एरवी तुझं अस्तित्व नुसतंच कुचूकुचू जाणवत असतं पण असा प्रत्यक्ष दर्शनाचा योग मात्र क्वचितच येतो . 
स्वतःच्याच मस्तीत गुंग असल्यासारखा धीम्या चालीने आजुबाजूच्या जगाचे आपण काही  देणे घेणे लागत नसल्यासारखा मान खाली  घालून 
त्या भिंतीवर तू कुठूनतरी निघून कुठेतरी जात असताना तुला मी पहिलं.… अगदी डोळे भरून पाहिलं! 
तुला असा पाहता पाहता तुझ्याविषयी विचार करीत गेलो आणि असा विचार करता करता मला तुझे महात्म्य लक्षात यायला लागले . 


रात्र रंगात आली की तू हळूच अंथरुणाखालून बुळूबुळत येतोस. जराही खुट्ट न होऊ देता  मिट्ट अंधारातही त्वचेखालची नेमकी शीर शोधून काढतोस.
डोळे मिटून उष्ण रक्त गुटू गुटू  पिउन घेतोस  आणि  काम झाले की आपले गलेलठ्ठ शरीर सांभाळीत पुन्हा गुपचूप आपल्या जागी जाऊन निमूट बसून राहतोस . 
रक्त पिताना चावा तर असा घेतोस की हळव्यातल्या हळुवार प्रियकरालाही लाज आणतोस !
शोषण करण्यातली ही एवढी नजाकत तू कुठून शिकलास ?

तू Gazetted की  Non -gazetted हे मी तुला विचारणार नाही. 
सरकारी दप्तरातल्या फायली, शय्याघरं, पुस्तकालयं अशी मोक्याची ठिकाणं हेरून तू योग्य संधीची वाट बघत बसतोस . किती दिवस ? किती वर्षं ?
चावताना तू त्या उत्श्रुंखल sophomoric डासांप्रमाणे उगाच गुणगुणाट करून बोभाटा करीत नाहीस. त्याबाबतीत फारच मुरलेला दिसतोस तू !
'आपलंच काहीतरी खाजतंय' असं वाटून माणूस मुकाट झोपी जातो .
शोषितालाच guilt आणण्याची ही कला तू कुठून शिकलास?

जुन्या आणि दुर्लक्षित जागांवर तू फोफावतोस. फर्निचर,अडगळी,घरं,माणसं,समाज,संस्कृती… तुला काहीही चालतं . 
शक, हूण, मंगोलांच्या  टोळ्यांप्रमाणे तू आधीच्या शुष्क वस्त्या मागे टाकून नव्या सुपीक जागा शोधून काढतोस.  
कुठूनही उचलून कुठेही टाकला तरी तग धरतोस. भारतातल्या तर हवामानातच काय पण मानसिकतेतही अगदी समरसून जातोस. 
(खरं म्हणजे  आम्ही तुला राष्ट्रीय कीटक म्हणूनच सन्मानित करायला हवे !)
 किंबहुना माझे  तुला 'प्रिय' म्हणून संबोधन करणे हेच मला अशिष्ट वाटायला लागले आहे . तुला मी 'आदरणीय' म्हणून संबोधले तर चालेल काय ? 
तर हे आदरणीय ढेकूण, हे मारुन न मरण्याचे चिवटपण, हे 'अछेद्य-अदाह्य-अक्लेद्य-अशोष्य'पण तू कुठून शिकलास ?

शोषण करत असताना आपले अस्तित्व अजिबात जाणवू न देणे ही तुझी खरी थोरवी आहे . 
खाताना तुझे खाणारे तोंड जगाला दिसत नाही. मानवी रक्तावरच पोसतोस पण इतर नरभक्षी प्राण्यांप्रमाणे तू केलेली शिकार कुणाच्या डोळ्यात भरत नाही. 
तुला मारणे हा पराक्रम समजल्या जात नाही .  मातृभाषेत तुला हिणवणारा शब्द नाही . 'ढेकूणछाप', 'ढेकुणगिरी' ह्या शिव्या ठरत नाहीत . 
तुझा कसलाच वास येत नाही . तू कुठलेच निशाण मागे सोडत नाहीस . सौंदर्यशास्त्राच्या कुठल्याही परिमाणानुसार तुझ्या अंगी कसल्याच प्रकारचा डौल नाही . 
विरोधकाचा विरोधच नपुंसक करून टाकण्याचं, विद्रोहाचा अंगारच विझवून टाकण्याचं हे तंत्र तू कुठून शिकलास ? 

उघड्या डोळ्यांना तू दिसत नाहीस तरी यत्र तत्र सर्वत्र तुझा संचार अनिरुद्ध आहे. 
तुझा महिमा अगाध आहे. विश्वाच्या इतिहासात एक युग तरी नक्कीच तुझ्या नावे राहिले असेल. 
मला तर प्रश्न पडलाय की भगवान विष्णूच्या नऊ अवतारांमध्ये तुझा अवताराचा उल्लेख कसा नाही? 
त्या गौरवशाली 'मत्कुणयुगा'चा काहीच कसा मागमूस उरला नाही ? तुझ्या 'मत्कुणावतारा'चे काहीच कसे नामोनिशाण नाही? 
असेलही म्हणा, ज्या देशात निवडणुकीच्या याद्यातील नावे गायब होतात, मंत्रालयतल्या फायली आगीत जळून नष्ट होतात,
त्या देशात तुझ्या महान 'मत्कुणवेदा'चे, तुझ्या थोर 'मत्कुणपुराणा'चे अवशेष कुणा हितशत्रूने नष्ट करणे हे परंपरेला साजेसेच आहे. 
पण तरीही तुझी थोरवी पाहता मला मात्र असेच वाटते की 'मानवसंस्कृती' 'मानवसंस्कृती' म्हणतात ती मुळात तूच आपल्या भक्ष्याकरीता पोसलेली 'मत्कुण संस्कृती' आहे.
ही सगळी भरघोस मनुष्यवस्ती तुझ्याच तर शेतात डवरलेली पिके आहेत !  

आता निघालाच आहेस तर जाता जाता  माझ्या एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा . 
एवढं रक्त पिऊन झाल्यानंतर  , एवढं शोषण करून झाल्यानंतर  तुला कधी ढेकर येतो का ?
तृप्तीचा ?
परोपकाराचा ?
वैराग्याचा ?
उपरतीचा ?

तुझा 
मत्कुणदास 
    

Thursday, 19 December 2013

'फकिराचे राजकीय प्रयोग'



"दिल्ली विधानसभा  निवडणुकीत आम आदमी पार्टी २८ जागांवर विजयी!"


बातमी ऐकली आणि अंगात दहा हत्तीचं  बळ संचारलं . 
पेपर हातात नाचवीत आम्ही थेट मास्तर भागवतचं दुकान गाठलं . मास्तर भागवत म्हणजे आमच्या सुरूच न झालेल्या राजकीय कारकिर्दीचे फ्रेंड, फिलोसोफर आणि गाईड होते. आमच्या दुष्काळी गावातल्या रिकामचोट राजकीय टोळांचे ते पितामह भीष्म होते. 
मास्तर नेहमीप्रमाणे दुकानात माशा मारीत बसले होते .  मास्तरसमोर पेपर आदळला आणि म्हटलं, 
"मास्तर हे बघा! दिल्लीत काय धोबी पछाड दिलाय केजरीवालभाऊनं  कॉंग्रेस- बीजेपीवाल्यांना …" 
मास्तर पेपरात घुसले . पण आमच्या अज्ञानमिश्रित उत्साहाचा धबधबा धो धो वाहतच चालला, 
"… मायला, आता कळंल त्यांना . आम्हाला दारात उभे करीत नव्हते.… तुम्हाला  सांगतो मास्तर , आपल्या देशात जो काही भ्रष्टाचार चालला आहे ना, त्या सगळ्या भ्रष्टाचाराची इंजिनं आहेत हे राजकीय पक्ष म्हणजे . इंजिनं ! आपल्याला ना मास्तर, आधीपासूनच लोकशाहीतला हा 'राजकीय पक्ष' नावाचा प्रकारच मुळात कधी पटला नव्हता .साला ते महात्मा गांधी का  कोण म्हटलं होतं तसं राजकीय पक्ष पाहिजेतच कशाला हो मास्तर? सरळ सरळ जनता आणि उमेदवार असा हिशोब राहू द्या न भाऊ . म्हणजे तुम्हीच तिकीटं विकायची , लोकांची मतं वरच्यावर हायज्याक करायची, शेवटी तिसऱ्याच पक्षासोबत आघाडी करायची आणि जनतेला दाखवायचा बाबाजी का ठुल्लू … ही तर मायला लोकशाहीची होलसेल दुकानदारीच झाली… आन आमच्या सारख्या तरुण तडफदार धडाडीच्या …. "
मास्तर केव्हाशिक उठून माझ्याजवळ आले आणि तोंडाचा वास घेत म्हणाले, 
"सकसक्काळ नशापाणी करून आलायस का काय बे ? ही दिल्लीची बातमी वाचून तुला पुन्हा एकदा  निवडणुकीची हुडहुडी भरली का काय जणू ? . तुला इथं गल्लीत कोणी इचारीना अन गप्पा मारतोस दिल्लीच्या ? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उताणा पडलास ते विसरलास काय बे इतक्यात? मायला,बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. हो भाईर!" 
मास्तरनं  एका फटक्यात आमच्या दंडात उठलेली राजकीय बेटकुळी जिरवून टाकली. ते बोलले ते पण काही खोटं नव्हतं म्हणा . अपयश ही  यशाची पहिली पायरी असते असं मानून आम्ही आतापर्यंत ग्रामपंचायत ते जिल्हापरिषदेपर्यंत सगळ्या निवडणुकांना उभे राहिलो. सोसायट्या म्हणू नका पतपेढ्या म्हणू नका…आम्ही सगळीकडं हातपाय मारून पहिले . पण यश तर सोडाच , निवडणुकीनंतर साधं डिपोजिटपण हाती लागलं नव्हतं. मास्टरनं घाव फारच वर्मी हाणला होता . निराश होऊन आम्ही मोर्चा 'पार्लमेंट' कडे वळवला. 'पार्लमेंट' म्हणजे आमच्या गावातल्या कामानं रिकामचोट अन पैशानं भिकारचोट असलेल्या स्वयंघोषित बुद्धिवाद्यांच चर्चेचं ठिकाण होतं . इथं हे चार पाच टोळ दिवसभर बसून गुऱ्हाळ घालीत. 
मी गेलो तेव्हा यांच्या चर्चा ऐन रंगात आल्या होत्या. मास्टरमाईंड बंटी मालुसरे खाजगी आवाजात सगळ्यांना सांगत होता- 
"… म्हणून म्हणतो त्या  केजरीवालला काही सरकार बिर्कार स्थापन करायचच नाही . त्याला नुस्ता टाईम काढायचाय. म्हणजे पुन्हा निवडणुका होतील आणि आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत मिळेल. त्यांना नेमकं तेच पाहिजे - निर्विवाद बहुमत. तोपर्यंत त्यांचा मेडियाच्या पैशानं फुकट प्रचार चाललाय. आणि त्या १८ अटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुनर्निवडणुकीचा मेनिफेस्टो आहे त्यांचा . प्रशासकीय मुद्दे कोणते आणि राजकीय मुद्दे कोणते हे न कळण्याइतका दुधखुळा आहे की काय तो? सगळ्या अटी populistic… "
बंटी मालुसरे  म्हणजे आमच्या गावातून  दिल्लीला जाऊन आलेला एकुलता एक माणूस . कलेक्टर होण्यासाठी हा दिल्लीला गेला . तिथं  परीक्षा तर पास  झाला नाही पण एक पंजाबी पोरगी पटवून तिकडंच लग्न करून गावाकडे परत आला . त्यामुळं याचं  गावात खूप नाव झालं . तिकडं बुकात शिकलेली इंग्रजी वाक्यं बासुंदीत काजू किसमिस पेरावी तसा हा चर्चेत पेरायचा . त्यामुळं ह्याच्या कोणी नादीच लागायचा नाही . 'वासरात लंगडी गाय शहाणी' या न्यायानं पार्लमेंटनं  त्याला 'मास्टरमाईंड' हा किताब देऊन टाकला होता . 
बंटी मालुसरे सुरूच होता- 
"… पण  सत्तेत आल्यावर ह्यांची काय ग्यारंटी देता ? 'Power corrupts and absolute power corrupts absolutely' . (शांतता ) अन तू काय घाबरू नको मुन्न्या.  आम आदमी पार्टी काय महाराष्ट्रात येत नाही . ह्या चळवळ गोठून राजकीय पक्ष बनलेल्या पार्ट्यांना मराठी माणूस भीक घालीत नाही . माजघरात कोणाला घ्यायचं अन शेजघरात कुणाला न्यायचं हे मराठी माणसाला पक्कं ठाऊक असतं."
मुन्ना गवळीचा चुलत चुलत चुलत भाऊ राष्ट्रवादीचा आमदार होता . त्यामुळं मुन्ना दिल्लीतलं बघून धास्तावला होता .
इतक्यात कोपऱ्यात बसलेल्या दुलेखान बाबरची नजर आमच्यावर पडली .आमची एन्ट्री झाल्याचे कळताच पार्लमेंटचं कामकाज तहकूब करण्यात आलं . आमचा एकंदरीतच अवतार बघून भाऊ आज काहीतरी भयानक गौप्यस्फोट करणार याचा सगळ्यांना अंदाज आला. सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. पार्लमेंटमध्ये अभूतपूर्व शांतता पसरली…       
 त्या शांततेचा भंग करीत आम्ही गंभीरपणे खंबीर राहून  आमचा मानस सगळ्यांसमोर जाहीर केला .  
"दोस्तहो! या वेळेस  आपण ठरवलंय … यंदा आपण आमदारकीला उभे राहणार !"
आम्ही पार्लमेंटवर असा बॉम्ब टाकल्यावर सगळे काहीवेळ स्तब्ध झाले . आणि एकाएकी फिस्स करून सगळेचजण हसत सुटले . 
बंटी मालुसरेनं  सगळ्यांना आवर घातला . पुन्हा पार्लमेंट बसली . अन चार घंटे पन्नास सिग्रेटीनंतर पार्लमेंटचा असा ठराव झाला की नाहीतरी देशात सध्या प्रयोगशील राजकारणाचे वारे वाहत आहे . जनमत कधी नव्हे इतके सेन्शिटिव झाले आहे . Gay rights पासून ते foreign diplomats पर्यंत जनता कशावरूनही चेकाळून उठायला लागली आहे.  तेव्हा अशा अंदाधुंदीच्या वातावरणात गावातला एक नवीन राजकीय प्रयोग म्हणून भाऊ फकीरला आमदारकीला उभा करायला काहीएक  हरकत नाही.   
ठरलं ,भाऊ फकीर यंदा आमदारकी लढवणार!

      

एकदा आम्हाला राजकीय प्रयोगातला गिनिपिग बनवायचा ठरवल्यावर सगळी टीम पार्लमेंट कामाला लागली. प्रत्येकाने कामे वाटून घेतली .आमच्या मिशन आमदारकीचे राजकीय सल्लागार म्हणून मास्तर भागवत, थिंकटैंक म्हणून मास्टरमाईंड बंटी मालुसरे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून दुलेखान बाबर तर जनसंपर्क प्रमुख म्हणून मुन्ना गवळी यांनी जबाबदाऱ्या उचलल्या . प्रायोजकपदाची जबाबदारी मात्र पद्धतशीरपणे खुद्द आमच्याच गळ्यात येउन पडली .
दुलेखान बाबर म्हणजे निव्वळ गोबेल्सची अवलाद होता. प्रोपोगंडा कसा करावा ते कुणी दुल्याकडून शिकावं. दुल्या आधी पुण्यात फ्लेक्स-बँनर प्रिंटींगचं काम करायचा. त्यामुळे 'आधी इमेज बिल्डींग, मगच निवडणुकीची फिल्डिंग' असा टीमचा ठराव झाल्याबरोबर दुल्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली .

पांढरा शुभ्र शर्ट , पांढरी शुभ्र प्यांट , तेवढाच पांढरा बूट अशा वेषात एका हाताने मोबाईल कानाला लावलेला आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी V अशी दोन बोटे दाखवणारा आमचा लाईफसाईझ  फोटो अन त्याच्या शेजारी हे वाक्य -

'डिपॉझिट जप्त होण्याला पण अंत आहे
म्हणूनच  भाऊ शांत आहे!'

कामं वाढली तसा दुल्या पेटलाच .
मुख्य प्रश्न फायनान्सचा होता. मास्तर भागवत म्हणाले, "राजकारणात सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पैशाला हात आखडून राजकारण होत नाही भाऊ फकीर" .
मग काय एक घाव दोन तुकडे . फटक्यात नदीकडची दोन एकर विकून झटक्यात पैसा उभा केला.
दुल्याचं फ्लेक्स तयार-

" नदीकाठची दोन एकर विकून निवडणुकीला पैसा उभा केल्याबद्दल भाऊचे अभिनंदन !
  चर्चा तर होणारच ! होऊ दे खर्च!!!"
           - शुभेच्छुक-
   भाऊ फकीर फ्यान क्लब .

प्रचारासाठी म्हणून आम्हाला एक गाडी विकत घेणं भाग होतं. गाडी घेतली.
दुल्या तयार -
" रोख क्याश देऊन नवी कोरी टाटा सुमो गोल्ड विकत घेतल्याबद्दल भाऊंचे  हार्दिक अभिनंदन ! होऊ दे डिझेलचा खर्च!"
खाली गाडीच्या बाजूला एका हातात मोबाईल  (अजून कानाला लावलेला)  अन दुसऱ्या हातानं गाडीची चाबी श्रीकृष्णासारखी फिरवीत असलेला आमचा फोटो!

दुल्याचं हे अती व्हायला लागल्यावर आम्ही मास्टरमाईंड बंटी मालुसरेला म्हटलं की हे काही बरं नाही.  अशानं आपण लोकांच्या नजरेत येऊ . त्यावर तो एकदम भारी बोलला. म्हणाला,
"भाऊ पंचे नेसून राजकारण करण्याचा  काळ गेला आता. आजकाल लोकांना नेता कसा भपकेबाज पाहिजे. आपण स्वतः जे करू शकत नाही ते जनता आपल्या नेत्यात पाहत असते. आपल्या दुष्काळी भागात तर भाऊ चार पाच गाड्या मागेपुढे घेऊन फिरल्याशिवाय अन अंगावर किलोभर सोनं घातल्याशिवाय  लोकं कुणाला नेता मानायलाच तयार होत नाहीत. म्हणून म्हणतो भाऊ ' Expenditure should not only be done , it must be seen to be done "
"अरे पण अशा मंदीच्या काळात भाऊनं ही  काय उधळपट्टी चालवली म्हणून लोक आपल्याला बदनाम करतील त्याचं काय ? राहुल गांधी काय म्हणील? नरेंद्र मोदी  काय म्हणील? ओबामा काय म्हणील ?"
"भाऊ, मंदीतच संधी साधायची असते. अमेरिकेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी 'केन्स' नावाच्या त्यांच्याच अर्थतज्ञानं सर्वप्रथम 'होऊ दे खर्च' चा नारा दिला होता. अमेरिकी अध्यक्षाला त्यानं बजावलं  "Dig holes in the ground and then fill them up- होऊ दे खर्च!"
बंटी मालुसरेनं असं इंटरन्याशनल अपील टाकल्यावर मात्र आम्ही दोन्ही खिसे मिशन आमदारकीसाठी मोकळे करून दिले. तेवढंच इंटरन्याशनल अपील आमच्या प्रचाराला यावं म्हणून दुल्यानं अजून एक पोस्टर बनवलं . थेट अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा आमच्या गळ्यात गळा घालून स्माईल करीत असलेला फोटो अन त्याच्याखाली वाक्य -

" लक्षुमन राज्य करतो रामासंगं , भाऊची दोस्ती ओबामासंगं "
           -शुभेच्छुक -
 भाऊ फकीर NRI फ्यान क्लब !

गावात जिकडे तिकडे असले अचाट पोस्टर बघून आमच्याबद्दल हळूहळू जनमत जागे व्हायला लागले. चार दोन फुटकळ कार्यकर्तेही आमच्या मागे पुढे फिरायला लागले .
तेव्हा मास्तरच्या सल्ल्यानुसार गावात आमचा एक जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरले .
बंटी मालुसरे म्हणाला "हीच योग्य वेळ आहे. Timing is very crucial in politics."
पण कार्यक्रमाचे स्वरूप काय ठेवायचे यावर कुणाचे एकमत होईना . मुन्न्या म्हणायचा आपण एक भव्य marathon स्पर्धा ठेऊ . गुजरातेत नरेंद्र मोदी च्या 'रन फॉर युनिटी' ने मुन्न्या फारच भारावून गेला होता . पण आम्ही त्याच्या ह्या कल्पनेला व्हेटो दिला . सालं काही लोक चड्ड्या घालून रस्त्यावर पळाल्यामुळं समाजात जागृती कशी निर्माण होते हे कोडंच आपल्याला अजून उमगलेलं नाही. हा सगळा प्रकारच आपल्याला एकदम हस्तिदंती मनोऱ्यातला वाटत आलेला आहे . राष्ट्रीय एकत्मेसाठी पळा , जागतिक शांततेसाठी पळा, स्त्रियांच्या सुरक्षेसाठी पळा… अन  शेवटी पळता भुई थोडी झाली तरी एक प्रश्न सुटायच्या मार्गी नाही? अरे हुडूत!  मुन्नाचा प्रस्ताव आम्ही धुडकावून लावला .
बऱ्याच चर्चेनंतर  एक जंगी सभा घ्यायची असा  निर्णय पक्का झाला .सभेसाठी पत्रकं छापण्यात आली . आमचा राजकीय दृष्टीकोण सर्वसमावेशक वाटावा म्हणून या पत्रकांवर भारतीय उपखंडातल्या तमाम राजकीय विचारधारांच्या प्रणेत्यांचे फोटो छापण्यात आले . एका टोकाकडून सुरुवात करून - महात्मा गांधी, त्यांना खेटून भगतसिंग, त्यांच्या बाजूला अयोध्या मंदिराच्या ब्याग्रौंडवर उभे असलेले प्रभू रामचंद्र, त्यांना चिटकून दाढीवाले कार्ल मार्क्स, त्यांच्यानंतर दाटीवाटीने फुले-शाहू-आंबेडकर, त्यांच्या पलीकडे ह.भ.प. मोतीराम महाराज… सगळी मांदियाळी त्या पत्रकावर अवतरली .   मास्टरमाइंड बंटीचं लॉजिक पक्कं होतं -कोणीच सुटायला नको आणि कोणीच नाराज व्हायला नको. ह्याला तो  'Politics of Inclusion' म्हणायचा. "Not exclusion but inclusion is the essence of true democracy"!
सभेच्या तयारीसाठी मुन्न्यानं  कंबर कसली . गरज पडेल म्हणून तो आणखी डझनभर पोरं घेऊन आला आणि वाघासारखा कामाला लागला.
"मतदारसंघातली सगळी गावं कव्हर करायची म्हणजे भाऊ लाखभर तरी पत्रकं वाटावी लागतील." मुन्न्याने म्हटल्याबरोबर आम्ही फट्कन हजाराच्या नोटांचं एक बंडल काढून त्याच्या हातात दिलं.
"भाऊ धा-वीस गाड्या तरी बुक कराव लागतीन " म्हटल्याबरोबर आम्ही अजून एक बंडल त्याच्या हातात दिलं. नंतर नंतर कामं वाढली तसतशी मुन्न्याची पोरं सुद्धा पैसे न्यायला येऊ लागली. 'भाऊ शामियानावाल्याचे पैसे', 'भाऊ साउंडवाल्याचे पैसे', 'भाऊ डेकोरेशनचे पैसे','भाऊ डिझेलचे पैसे ',' भाऊ कार्यकर्त्यांना दारू तर पाजावीच लागते… त्याचे पैसे!'
मुन्ना एकदिवस म्हणाला, "भाऊ तयारी जोरदार चालू आहे . लई मोठी पब्लिक येणार असं दिसतंय . पण ऐन वेळेस काही राडा बिडा झाला तर आपल्याकडं बी काही मानसं पाहिजेत. "  असं म्हणून मुन्न्या दहाएक पहिलवानांच्या सरबराईचा खर्च घेऊन गेला.
पैसा पाण्यासारखा खर्च होऊ लागला . जादूची कांडी फिरावी तशी तिजोरीतली बंडलाची थप्पी खाली खाली येऊ लागली . रोज रात्री आमच्या स्वप्नात 'फादर ऑफ होऊ दे खर्च फिलॉसाफी' जे . एम . केन्स  यायचा आणि म्हणायचा ,
" खर्च करायला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होऊ दे खर्च!"

हे राड्याचं मुन्न्यानं इतकं जीवावर घेतलं होतं की खबरदारी म्हणून त्यानं दुल्याला सांगून एक खास पोस्टर बनवून घेतलं .  त्यात आमच्या रुबाबदार फोटोच्या शेजारी मुन्न्याचा खतरनाक गुंडासारखा दिसणारा क्लोज-अप फोटो अन खाली लिहिलेलं -
 " एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
   भाऊचा नाद केला तर हातपाय गळ्यात "
पण खटक्यावर बोट ठेवलं ते दुल्याच्या पुढच्या पोस्टरनं. सभा दोन तीन दिवसावर आली तेव्हा दुल्यानं गावातल्या मेन चौकात एक मोठ्ठ  फ्लेक्स लावलं . त्याच्यावर एका बाजूला दस्तुरखुद्द भाऊ फकीर आणि दुसऱ्या बाजूला चक्क कतरिना कैफ! खालची लाईन तर कहरच होती -
" राजाचं राजपण , कालपण आजपण
  फकीर भाऊ तुमच्यासाठी कायपण
  कधीपण , कुठेपण "

गावात चर्चेला नुसतं उधाण आलं . सभा उद्यावर आली म्हणता मुआइना करण्यासाठी म्हणून आम्ही गावात एक चक्कर टाकून यायचं ठरवलं .गाडी काढली आणि चार पाच कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही निघालो . गावात जिकडं तिकडं आमच्याच नावाची चर्चा सुरु ! चौकात, बाजारात, हॉटेलात, पानाच्या टपऱ्यावर, ब्यानर्सच्या खाली जिथं तिथं लोक गटागटानं जमून आमच्याच नावाचा महिमा गात होते . सगळं वातावरण फुल्ल पेटलं  होतं. आता सभा यशस्वी होणार हे तर पक्कंच होतं . आम्हाला तर दिवसाढवळ्या आमदार झाल्याचं स्वप्न पडायला लागलं होतं.  शेवटी एक नजर सभेच्या जागी टाकून येऊ म्हणून तिथे गेलो तर दुल्याचं लेटेस्ट ब्यानर स्वागताला तयारच होतं -
" फकीर भाऊ आहे राजकारणात दर्दी
   भाऊच्या सभेला लाखानं गर्दी !"
तृप्त मनाने आम्ही घरी परत आलो . म्हणजे एवढा खर्च केला तो काही फुकट जाणार नाही तर! 'मिशन आमदारकी' सक्सेसफ़ुल्ल होणार!
सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही मनातल्या मनात आभार मानले आणि ठरवलं 'उद्याची सभा अश्शी गाजवून सोडायची की अख्खा मतदारसंघ दणाणून उठला पाहिजे' .

 ठरलं, आता लक्ष्य उद्याची सभा !



(दोन दिवसानंतर)

" फकीर भाऊ आहे राजकारणात दर्दी
  भाऊच्या सभेला लाखानं गर्दी !"

हे पोस्टर म्हणजे गावात विनोदाचा विषयच होऊन बसलं होतं.  सभेला काळं कुत्रं देखील फिरकलं नव्हतं.
आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला असा सुरुंग लागला म्हटल्यावर आमच्यावर तर आभाळच कोसळले. पाणी नेमकं मुरलं कुठं हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही तत्काळ पार्लमेंट बोलावली. सगळ्यांना तडक वाड्यावरच यायला सांगितलं .
पार्लमेंट बसली. आमच्या रागाचा थोडा निचरा झाल्यावर सगळेजण म्हणाले,
"भाऊ  झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढं काय करायचं ते ठरवा."
"आता पुढचं अजून काय ठरवणार ? एका सभेतच आमचा पार लेहमन ब्रदर्स झालाय राजेहो !"  पैसाच संपला म्हटल्यावर कसचं करता राजकारण? "एका मताचा रेट हजार रुपये चाललाय  मतदारसंघात. मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत पाकिटं घरोघर नाही पोचली तर संपलं  आमचं  राजकारण"
मग सगळेजण आपापल्या परीने  पैसा जमवण्याचे उपाय सुचवू लागले .
मुन्न्या म्हणाला 'भाऊ ते आम आदमी पार्टीचं कोणीतरी म्हनं  नुस्त्या कविता वाचून दाखवून करोडपती झालंय . तुमच्या बी काही कविता हैतच कि भाऊ…'
 दुल्या म्हटला 'भाऊ, अजून एक पोस्टर बनवू आणि पब्लिकलाच चंदा देण्याचं अपील करू.'
 "अन पोस्टरवर काय लिहायचं?" .
सैपाक घरातून सौभाग्यवतीचा कडक आवाज आला,
" 'खायला नाही दाना अन मला आमदार म्हणा' असं लिहा म्हणाव."
राजकारणाच्या नादापायी चाललेली आमची उधळपट्टी बघून  बायको कावली होती . आमदारकीचा लढा आता आम्हाला घराबाहेर अन घराच्या आत दोन्ही ठिकाणी द्यावा लागत होता. अण्णा हजारे खरच हुशार माणूस . त्याला हे लाग्नाबिग्नाच लचांड आधीच कळलं असेल . आपल्या अंगात चळवळ करायची वळवळ आहे  हे लक्षात घेऊन त्यानं  लग्न करून हळहळत बसण्यापेक्षा अविवाहित राहून तळमळत बसणंच पसंत केलं . अण्णा हजारे जिंदाबाद!
बंटी मालुसरे म्हणाला, 'पैसा तर आम आदमी पार्टीला पण लागलाच असेल की . आपण थेट केजरीवाललाच पत्र लिहून विचारू'.
सगळे निघून गेल्यावर आम्ही पत्र लिहायला बसलो . त्यात आमची कैफियत मांडली आणि लिहिलं,
'जो गती भई कांग्रेस की, वही गती हमरी आज
बाजी जात 'आमदारकी'की,  केजरीवाल राखो लाज'
खरा मजकूर आम्ही पत्राच्या मागच्या बाजूस लिहिला , " अरविंद भाऊ तुमचे लग्न झाले आहे काय? झाले असेल तर तुम्ही अशा राजकीय उचापत्या करीत असताना तुमची बायको तुम्हाला काही म्हणीत नाही काय? म्हणत असेल तर तुम्ही तिला कसे  handle  करता? पत्राच्या मुख्य बाजूस विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे नाही दिलीत तरी चालतील पण ह्या प्रश्नाची उत्तरे मात्र तातडीने द्यावीत."
घायकुतीला आलेला-
आपला फकीर.

 दुसऱ्या दिवशी गावात मास्तर भागवतची गाठ पडली .
मास्तर म्हटले " अरे फकीर ,अशी कशी तुझी इलेक्शनची  तयारी भाऊ? पेपरात बोटभर बातमी वाचायला मिळाली  नाही तुझ्या नावची अजून ? तुला बजावून ठेवतो बघ पेपरात नाव छापून आल्याशिवाय राजकारणी म्हणून शिक्का लागत नाही माणसाला "
मास्तरनं  असं पेपरबाजीचं पिल्लू डोक्यात सोडल्यावर आम्ही लागलीच एक दोन कार्यकर्ते (भाड्याने) घेऊन   'दैनिक पिपाणी' चे  ऑफिस गाठले. तिथं तास दोन तास वाटाघाटी झाल्यानंतर संपादक  बातमी द्यायला तयार झाले. बदल्यात आम्ही दैनिक पिपानीच्या पुरवणीला पान भरून  रंगीत जाहिरात देण्याचे ठरलं. आधीच दिवाळं निघालेलं असताना ही जाहिरात बोकांडी बसल्यामुळं तर आमचं पार कंबरडंच  मोडलं. पण पेपरात नाव येणं तितकच महत्त्वाचं होतं म्हणून  यावेळेस आम्ही कर्ज काढायचं ठरवलं. दुल्या असता तर त्यानं ह्या प्रसंगावर काय सॉलिड लायनी छापल्या असत्या! पण पैशाचा ओघ आटला तशी दुल्याची कल्पकता आपोआप आटली होती.
बातमी छापून आणायची तर तशी काहीतरी घटना घडली पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसायचं ठरवलं.आता उपोषण करायचं म्हणजे काहीतरी मुद्दा तर पाहिजे . तेव्हा आमच्या सर्वसमावेशक राजकीय विचारसरणीला साजेसा असा उपोषणाचा विषयसुद्धा सर्वव्यापी ठेवण्यात आला . तालुक्याच्या गावापर्यंत पक्का रस्ता, कांद्याचे भाव या लोकल मुद्द्यांपासून  ते जगातिक आर्थिक संकट , ग्लोबल वार्मिंग असल्या  ग्लोबल मुद्द्यांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यात घेण्यात आल्या . ठरल्याप्रमाणे उपोषणाच्या दिवशी दैनिक पिपानीचे पत्रकार हजर  झाले . मुलाखत सुरु झाली.  पण सुरुवातीलाच पत्रकाराने 'कलम ३७७ बद्दल तुमची भूमिका काय?' वगैरे अवघड जागचे प्रश्न विचारायला सुरुवात केल्यामुळे आम्ही पार बावचळून गेलो. तेव्हा मास्टर माईंड बंटी मालुसरे जीवा महाला सारखा धावून आला . पत्रकारानं लोकपाल  कायद्याबद्दल विचारलं तेव्हा बंटी म्हणाला 'भ्रष्टाचार ही  निव्वळ कायदेशीर बाब नसून ती  एक सामाजिक व सांस्कृतिक बाब आहे असा भाऊंचा विश्वास आहे.   केवळ ढीगभर कायदे करून भ्रष्टाचार नष्ट होणार नाही . भाऊ नेहमी म्हणतात  'If you have ten thousand regulations you destroy all respect for the law.'! पुढे कुठल्यातरी प्रश्नाला उत्तर देताना बंटी म्हणत होता, '… निर्णयक्षमतेचा प्रश्नच कुठे येतो. थेट लोकांनाच एसएमएस, ई मेल पाठवून कौल घ्यायचा . नुस्ती डेमोक्रसी नाही तर 'ई - डेमोक्रसी' हे भाऊचे लक्ष्य आहे!  
मुलाखत झकास झाली .
दुसऱ्या दिवशी  मुलाखतीची बातमी वाचावी म्हणून आनंदाने पेपर उघडला . पानामागून पाने चाळतोय पण बातमी काही सापडेना.  दैनिक पिपाणीने आमचीच पुंगी  वाजवली होती . बातमी छापायला दिलीच नव्हती. तावातावाने जाब विचारायला संपादकाकडे गेलो तर संपादक दुसऱ्याच पक्षाच्या एका वजनदार नेत्यासोबत वाटाघाटी करीत बसले होते . सगळा प्रकार आमच्या लक्षात आला . आमची इथे पण घोर फसवणूक झाली होती… . आता मात्र आम्ही पुरते हताश झालो . एव्हाना निवडणुकीच्या रिंगणात नेहमीचे जंगी लोक उतरले होते . अमाप पैसा आणि ताकत घेऊन उतरलेल्या ह्या लोकांसमोर आमची मोहीम पाला पाचोळ्यासारखी कुठल्याकुठे उडून गेली . आमचे नामोनिशाण कुठे राहिले नाही . नवीन पोस्टर्स ब्यानार्स सजू लागले होते. आमच्या मागेपुढे फिरणारे कार्यकर्ते आता यांचे झेंडे घेऊन मिरवू लागले … हे निवडणुकीचं खूळ डोक्यात घेतल्यापासून सगळीकडे आमची फजितीच होत चालली होती . सर्रकन डोळ्यासमोरून मागचे सगळे दिवस गेले आणि घोर निराशेने मनाला ग्रासले. खुळ्यासारखं मृगजळाच्या मागे धावत जाऊन आम्ही दिवाळखोरी तर  ओढवून घेतलीच होती पण सगळीकडे स्वतःचं हसं पण करून घेतलं होतं. आम्हाला स्वतःचीच प्रचंड कीव आली . भाऊ फकीर आपण फसलो. डोळ्यात पाणी आलं.
इतक्यात अर्जंट सांगावा घेऊन एकजण आला . पार्लमेंट वरून बोलावणं आलं होतं . डोळे  पुशीत आम्ही निघालो. पार्लमेंटवर सगळेजण तर जमले होतेच. पण कधी नव्हे ते मास्तर पण आले होते . मास्तरला पाहताच आमच्या अश्रुचा बांध फुटला . आम्हाला धीर द्यायला सगळेजण जवळ आले.  बंटी मालुसरेने हळुवारपणे आमच्या खांद्यावर हात ठेवला आणि एक भयानक गौप्यस्फोट केला,
'भाऊ आम्हीच  सगळ्यांनी मिळून  तुमची गेम केली!'
आता मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली.  काय बोलवं तेच सुचेना.  तेव्हा मास्तर पुढे सरसावले आणि म्हणाले,
'आमच्याच सांगण्यावरून झालं हे सगळं'.
 'मास्तर … तुम्ही !' कानावर विश्वासच बसत नव्हता .
 'होय आम्हीच. या राजकारणाच्या नादी लागून तू पार घरदार बुडवायला निघाला होतास. अर्ध्या हळकुंडानंच पिवळा झाला होतास तू ! अरे, करतूद करणाऱ्याकडं  सत्ता आपल्या पायानं चालत येत असते … राजकारण करावं आपल्यासारख्यानं, पण ते आधी स्वतःचं घरदार सांभाळून.  पण तू असा घरदार वाऱ्यावर  टाकून अन गुडघ्याला बाशिंग बांधून नेतेगिरीचे स्वप्नं बघायला लागला म्हणल्यावर आमच्याच्यानं रहावलं नाही बघ…  या आंधळ्या वेडापायी देशोधडीला लागलेली काय कमी पोरं पाहतोस तू रोज ?  तुला वेळीच सावरलं नाही तर तुझी तीच गत होणार हे दिसत होतं आम्हाला.  म्हणून तुला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही हे सोंग रचलं.'
'म्हणजे मग सगळा झालेला खर्च , विकलेली जमीन … '?
"काही कुठे गेलं नाही . ते सगळं या सोंगाचाच एक भाग होतं. आता तरी थाऱ्यावर ये पोरा!  काढून टाक हे खूळ डोक्यातून… "
असं म्हणून मास्तरनं मायेनं हात पाठीवरून फिरवला आणि अंगात  होतं नव्हतं तेवढं सगळं बळ गळून पडलं . दोन्ही डोळे गच्च मिटून खाली बसकन मारली . खूप वेळानं मान वर काढून डोळे पुसले आणि  निर्धारानं सगळ्यांकडे बघून आम्ही शेवटची प्रतिज्ञा जाहीर केली,
"दोस्तहो! आता आपण ठरवलंय . आजपासून आपण राजकारणाच्या वाटेला चुकूनही जाणार नाही . भाऊ फकीर राजकारणातून कायमचा संन्यास जाहीर करीत आहे .आणि यावेळेस भाऊ खरंच सिरियस आहे !"