Sunday, 22 June 2014

प्रिय ढेकूण,



प्रिय ढेकूण ,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्रास कारण की आज सकाळीच ऑफिसच्या भिंतीवर तुझे दुर्मिळ दर्शन झाले . तू  मॉर्निंग वॉकला निघाला असशील कदाचित .
एरवी तुझं अस्तित्व नुसतंच कुचूकुचू जाणवत असतं पण असा प्रत्यक्ष दर्शनाचा योग मात्र क्वचितच येतो . 
स्वतःच्याच मस्तीत गुंग असल्यासारखा धीम्या चालीने आजुबाजूच्या जगाचे आपण काही  देणे घेणे लागत नसल्यासारखा मान खाली  घालून 
त्या भिंतीवर तू कुठूनतरी निघून कुठेतरी जात असताना तुला मी पहिलं.… अगदी डोळे भरून पाहिलं! 
तुला असा पाहता पाहता तुझ्याविषयी विचार करीत गेलो आणि असा विचार करता करता मला तुझे महात्म्य लक्षात यायला लागले . 


रात्र रंगात आली की तू हळूच अंथरुणाखालून बुळूबुळत येतोस. जराही खुट्ट न होऊ देता  मिट्ट अंधारातही त्वचेखालची नेमकी शीर शोधून काढतोस.
डोळे मिटून उष्ण रक्त गुटू गुटू  पिउन घेतोस  आणि  काम झाले की आपले गलेलठ्ठ शरीर सांभाळीत पुन्हा गुपचूप आपल्या जागी जाऊन निमूट बसून राहतोस . 
रक्त पिताना चावा तर असा घेतोस की हळव्यातल्या हळुवार प्रियकरालाही लाज आणतोस !
शोषण करण्यातली ही एवढी नजाकत तू कुठून शिकलास ?

तू Gazetted की  Non -gazetted हे मी तुला विचारणार नाही. 
सरकारी दप्तरातल्या फायली, शय्याघरं, पुस्तकालयं अशी मोक्याची ठिकाणं हेरून तू योग्य संधीची वाट बघत बसतोस . किती दिवस ? किती वर्षं ?
चावताना तू त्या उत्श्रुंखल sophomoric डासांप्रमाणे उगाच गुणगुणाट करून बोभाटा करीत नाहीस. त्याबाबतीत फारच मुरलेला दिसतोस तू !
'आपलंच काहीतरी खाजतंय' असं वाटून माणूस मुकाट झोपी जातो .
शोषितालाच guilt आणण्याची ही कला तू कुठून शिकलास?

जुन्या आणि दुर्लक्षित जागांवर तू फोफावतोस. फर्निचर,अडगळी,घरं,माणसं,समाज,संस्कृती… तुला काहीही चालतं . 
शक, हूण, मंगोलांच्या  टोळ्यांप्रमाणे तू आधीच्या शुष्क वस्त्या मागे टाकून नव्या सुपीक जागा शोधून काढतोस.  
कुठूनही उचलून कुठेही टाकला तरी तग धरतोस. भारतातल्या तर हवामानातच काय पण मानसिकतेतही अगदी समरसून जातोस. 
(खरं म्हणजे  आम्ही तुला राष्ट्रीय कीटक म्हणूनच सन्मानित करायला हवे !)
 किंबहुना माझे  तुला 'प्रिय' म्हणून संबोधन करणे हेच मला अशिष्ट वाटायला लागले आहे . तुला मी 'आदरणीय' म्हणून संबोधले तर चालेल काय ? 
तर हे आदरणीय ढेकूण, हे मारुन न मरण्याचे चिवटपण, हे 'अछेद्य-अदाह्य-अक्लेद्य-अशोष्य'पण तू कुठून शिकलास ?

शोषण करत असताना आपले अस्तित्व अजिबात जाणवू न देणे ही तुझी खरी थोरवी आहे . 
खाताना तुझे खाणारे तोंड जगाला दिसत नाही. मानवी रक्तावरच पोसतोस पण इतर नरभक्षी प्राण्यांप्रमाणे तू केलेली शिकार कुणाच्या डोळ्यात भरत नाही. 
तुला मारणे हा पराक्रम समजल्या जात नाही .  मातृभाषेत तुला हिणवणारा शब्द नाही . 'ढेकूणछाप', 'ढेकुणगिरी' ह्या शिव्या ठरत नाहीत . 
तुझा कसलाच वास येत नाही . तू कुठलेच निशाण मागे सोडत नाहीस . सौंदर्यशास्त्राच्या कुठल्याही परिमाणानुसार तुझ्या अंगी कसल्याच प्रकारचा डौल नाही . 
विरोधकाचा विरोधच नपुंसक करून टाकण्याचं, विद्रोहाचा अंगारच विझवून टाकण्याचं हे तंत्र तू कुठून शिकलास ? 

उघड्या डोळ्यांना तू दिसत नाहीस तरी यत्र तत्र सर्वत्र तुझा संचार अनिरुद्ध आहे. 
तुझा महिमा अगाध आहे. विश्वाच्या इतिहासात एक युग तरी नक्कीच तुझ्या नावे राहिले असेल. 
मला तर प्रश्न पडलाय की भगवान विष्णूच्या नऊ अवतारांमध्ये तुझा अवताराचा उल्लेख कसा नाही? 
त्या गौरवशाली 'मत्कुणयुगा'चा काहीच कसा मागमूस उरला नाही ? तुझ्या 'मत्कुणावतारा'चे काहीच कसे नामोनिशाण नाही? 
असेलही म्हणा, ज्या देशात निवडणुकीच्या याद्यातील नावे गायब होतात, मंत्रालयतल्या फायली आगीत जळून नष्ट होतात,
त्या देशात तुझ्या महान 'मत्कुणवेदा'चे, तुझ्या थोर 'मत्कुणपुराणा'चे अवशेष कुणा हितशत्रूने नष्ट करणे हे परंपरेला साजेसेच आहे. 
पण तरीही तुझी थोरवी पाहता मला मात्र असेच वाटते की 'मानवसंस्कृती' 'मानवसंस्कृती' म्हणतात ती मुळात तूच आपल्या भक्ष्याकरीता पोसलेली 'मत्कुण संस्कृती' आहे.
ही सगळी भरघोस मनुष्यवस्ती तुझ्याच तर शेतात डवरलेली पिके आहेत !  

आता निघालाच आहेस तर जाता जाता  माझ्या एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा . 
एवढं रक्त पिऊन झाल्यानंतर  , एवढं शोषण करून झाल्यानंतर  तुला कधी ढेकर येतो का ?
तृप्तीचा ?
परोपकाराचा ?
वैराग्याचा ?
उपरतीचा ?

तुझा 
मत्कुणदास 
    

5 comments:

  1. 'डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर तुम्ही ब्लॉग लिहिणं बंद केलंय…तुम्हीपण प्रस्थापितांमध्ये सामील झालात डॉक्टर!' असे म्हणून मला लिखाणासाठी पुन्हा उद्युक्त करणाऱ्या माझ्या मित्रास…

    ReplyDelete
  2. प्रशासनात 'असे' रक्त -पिपासू ढेकण बरीच आहेत… त्यांच्यावर पण लिव्हा कधीतरी…

    ReplyDelete
  3. तब्बेत सांभाळून डॉ. साहेब !!!!!!!! तू त्याच्यावर लिखाण केलास आणि त्याला प्रसिद्धी दिलीस म्हणून तो तुला सोडेल; …………अश्या प्रकारच सरकारुई धोरण अवलाम्णार का >??

    ReplyDelete
  4. प्रिय मत्कुणदास! तुमचं बेहद्द ताजातरीन लिखाण वाचून कलिजास अमाप आनंद झाला, अशा आमच्यासारख्या आनंदपिपासू माणसांना तुमचे लिखाण उत्तरोत्तर वाचावयास मिळो.

    ReplyDelete
  5. सर एक कर्तव्यदक्ष अधिकारी व् उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून सिंदखेड राजाला तुम्हाला खुप जवळून अनुभवल पण दर्जेदार व् कुशल शैलीचे लेखक म्हणून तर तुमचा फैनच झालो..

    ReplyDelete