काल मला एक विलक्षण स्वप्न पडलं .
रात्री माझ्या स्वप्नात बापूजी आले .
बापूजी सारखं काहीतरी शोधत होते .
मी म्हटलं, "बापू काय चष्मा शोधताय की काय? तो काय तुमच्या डोक्यावरच आहे की"!!
बापू म्हणाले, " नाही रे फकिरा! मी काहीतरी दुसरंच शोधतोय ..." आणि पुन्हा इकडेतिकडे शोधायला लागले .
मी म्हटलं , "बापू , अहो सांगा तरी काय शोधताय ते. मी मदत करीन तुमची सापडून द्यायला "
मग बापूंनी नजर वर करून माझ्याकडे पाहिलं . त्यांच्या चेहऱ्यावर आशा जागी झाली . बापू माझ्या दिशेने जवळपास धावतच आले आणि म्हणाले, "खरंच ? खरंच शोधून देशीन मला ?"
स्वप्नात बापूच्या चेहऱ्यावर तेवढा उजेड दिसत होता. बाकी सर्वत्र अंधार होता . पण तेवढ्या उजेडातही बापूच्या दातांच्या फटीतून 'खरंच' म्हणण्यात मला एक वेडाची झलक दिसली .
मी जरा आश्वासक सूर धारण केला आणि विचारलं ,
"काय हरवलय बापू?"
पुन्हा अस्वस्थपणे इकडेतिकडे पाहत बापू मला म्हणाले,
"अरे, माझं चौथं माकड हरवलय रे ..."
मी चक्रावून गेलो
"अहो बापू असं काय करताय? तुमची तीनच माकडं नव्हती का ? एक डोळे बंद केलेलं , एक कान बंद केलेलं , आणि एक तोंड बंद केलेलं ?
"नाही रे. मला पक्कं आठवतंय . माझं एक चौथं माकड पण होतं ...कुठे हरवलय कोण जाणे?"
आणि असं म्हणून बापू पुन्हा इकडे -तिकडे अस्वस्थपणे भिरभिरत शोधायला लागले .
मला शंका आली बापूंना काही वेड -बीड तर लागलं नाही ना ?
मी ठरवलं की आपण बापूंची मदत करायची . मी बापूंचा हात धरला आणि म्हटलं ,
"बापू , चला आपण त्या चौकात जाऊ ,तिथे काही लोक जमलीत . आपण जाऊन त्यांना विचारू .त्यातल्या कोणीतरी नक्कीच चौथे माकड पहिले असेल ".
बापूंना लहान मुलासारखा आनंद झाला.
आम्ही दोघे चौकात गेलो.
तिथे धूसर उजेड होता आणि भयाण शांतता होती.
माणसांच्या काही आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या. पण आवाज कशाचाच होत नव्हता.
मी अजून जवळ गेलो...आणि माझं रक्तच थिजून गेलं.
यातल्या कुठल्याच माणसाला चेहरा नव्हता...
बापूंना हाताशी धरून मी धिटाईने एकाला विचारले,
"का हो! तुम्ही चौथं माकड पाहिलंत का?"
माझा प्रश्न ऐकून तो बिन-चेहऱ्याचा माणूस काहीच बोलला नाही. फक्त त्याने बोट दुसऱ्या एका माणसाकडे दाखवले. ही सगळी माणसे सारखीच दिसत होती!
त्याच्याजवळ जाऊन मी त्यालाही तोच प्रश्न केला.
"का हो! चौथं माकड पाहिलंत का?"
प्रश्न ऐकून हा माणूस एकदम रडायला लागला. मी आणि बापू गोंधळून गेलो. त्याने रडतरडतच तिसऱ्या एकाकडे बोट दाखवले.
त्याच्याकडे जाऊन मी पुन्हा प्रश्न केला.
प्रश्न ऐकला आणि हा माणूस मोठ मोठ्याने हसायला लागला.
मी आणि बापू त्याच्या हसण्याने दचकून गेलो. लगबगीने आम्ही तिथून निघून दूर, एका घोळक्याकडे गेलो.
तशीच बिना चेहऱ्याची माणसे.
मी पुन्हा तोच प्रश्न केला,
"का हो! तुमच्यापैकी कुणी चौथं माकड पाहिलंय का?"
एकजण बोलला आणि कुत्सितपणे म्हणाला,
"चौथे माकड होय? हुं.....ते गेलं पळून. बाकी तिघांची दुर्दशा बघून त्याने पळ काढला. काही बोलायचं नाही, ऐकायचं नाही, बघायचं नाही.....गेला पळून !ह्याच दिशेने गेला बघा."
त्याच्यानंतर दुसरा बोलला .दोन्ही हात जोडून म्हणाला,
"नमस्कार बापू! तुमचे चौथे माकड आम्हाला चांगले ठाउक आहे. ते आता आमचे नेते आहेत. हो,थोडं पोट सुटलंय त्यांचं आता, पण बापू,त्यांच्यासारखा थोर जगात कुणीच नाही. आता चौकात तुम्ही त्यांची लाईफ साईझ पोस्टर्स पहिलीच असतील.गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं काहीही काम असू द्या, ते नक्की करतील याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. अहो, अख्खी सत्ता शेपटात गुंडाळून फिरतात ते!....पण बापू,यंदाच्या निवडणुकीत तुमचं मत मात्र त्यांनाच पडायला हवं बरं का? ख्या ख्या ख्या !"
त्याच्यानंतर तिसरा बोलला.हा सारखा सिग्रेट पीत होता.
“चौथे माकड ना? . Oh i see! I know him. तो गेला . I mean he has left this country for good. You know this country is going to dogs... मी पण देश सोडतोय लवकरच ” असं म्हणून त्याने जळालेलं थोटूक दूर भिरकावून दिलं.
मी बापूंच्या चेहऱ्याकडे बघायचं टाळत चौथ्याकडे वळलो.
तो मला दुर्लक्षित करून थेट बापूंकडेच बघत म्हणाला ,
“केम छे बापू ? ते चौथे माकड ने ? ते धंद्यामंदी लय मोठा झ्याला . बेज्या मोठ्ठा! आता ते मोठ मोठे MNCs चलावते . तुमचा ते tribal लोकांचे जमीन घेते अन मोठेमोठे प्लांट उभे करते ...तुमचा सरकारला इलेक्शनमंदी finance करते ...अन मोठ्या मोठ्या २७ मंजीली घरात राहते . तेच्या एकदम च्यांगला झाला बापू .हे हे हे !”
त्या चौथ्याला बाजूला सारीत पाचवा माणूस धाडदिशी समोर आला आणि म्हणाला ,
त्या चौथ्याला बाजूला सारीत पाचवा माणूस धाडदिशी समोर आला आणि म्हणाला ,
“ ए बापू , तेरा चौथा माकड अभी भाई बन गयेला है . बोले तो एकदम बडा डॉन ! अभी वो दुबई से धंदा करता है . इधर का पूरा सट्टा मार्केट , स्मगलिंग, match fixing पूरा देखता है ...सुप्पारी भी लेता है .तेरा कुछ सेट्टिंग होयेगा तो बोल ..”
अजून कोणी बोलायच्या आत बापूंनीच माझ्या हाताला एक हिसका दिला आणि म्हणाले,
"आधी इथून निघ" .
आम्ही जात होतो तोच अजून एक तसाच बिन चेहऱ्याचा माणूस आम्हाला सामोरा आला .
त्याच्या आवाजात नम्रता होती . तो म्हणाला ,
"बापू , तुमचं चौथं माकड पण तुमची गांधी टोपी घालतंय . देशात भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत जागवतंय . तुमच्यासारखीच आंदोलने करतंय ...आणि तुमच्यासारखच अटक पण होतंय ."
पहिल्यांदा बापूंच्या चेहऱ्यावर मी तिरस्काराशिवाय एखादी भावना पहिली .
आनंद , व्याकुळता , अभिमान , हताशपणा..... बापूंच्या डोळ्यात पाणी तरळलं .
एक एक शब्द मोजीत बापू म्हणाले,
“ नथूरामांना आता अजून एकदा पिस्तुलं तयार ठेवा म्हणावं ”
आणि एवढं बोलून उद्वेगाने बापू पुढे चालू लागले .
चौकापासून खूप दूर एका भेसूर दिसणाऱ्या झाडाच्या पारावर कुणीतरी एकटच मान खाली घालून बसलं होतं . तिथून अस्पष्टसे हुंदके ऐकू येत असल्यासारखं मला वाटलं .
अभावितपणे मी बापूंचा हात ओढीत तिकडे चालायला लागलो .
ती एक वृद्ध स्त्री होती ! जुनकट आणि बिनचेहऱ्याची.
बापुपासून नजर चोरत तिने पदर तोंडाला लावला .
डोळे पुसायच्या निमित्ताने ती बापूंना चेहरा दाखवायचं टाळत होती .
पदराआड तोंड लपवून तिच्या थकल्या वृद्ध आवाजात ती बोलायला लागली,
"बापू , तुमचं चौथं माकड मला माहित आहे . खूप वर्षे ते इथे होतं . उणीपुरी साठ वर्षे आम्ही संसार केला . ही जी सगळी बिना चेहऱ्याची प्रजा तुम्ही बघताय ती आमच्या दोघांचीच संतती आहे . पण चौथं माकड कुठे गेलं मला काहीच ठाउक नाही बापू ....." एक हुंदका देऊन पुन्हा निर्धाराने ती बोलली,
"असो ते कधीतरी जाणारच होतं ”
सुन्न शांतता पुन्हा पसरली.
मी विचारलं ,
"बाई तुझं नाव काय ?"
बापुंपासून अजूनच तोंड झाकत, अत्यंत खजील आवाजात ती वृद्ध स्त्री म्हणाली,
"माझं नाव लोकशाही !"
बापू , मी , तो चौक ... सगळेच स्तब्ध झाले .... स्मशान शांतता पसरली .
सगळी बिनचेहऱ्याची माणसे आमच्या भवती गोल रिंगण करून गोळा झाली .
बापू पुतळ्यासारखे खिळून निश्चल उभे राहिले होते .
आणि आता अंधार चहुबाजूंनी आमच्या जवळ जवळ सरकत येत चालला होता .
खूप मस्त आहे सर तुमच स्वप्न.
ReplyDeleteSachya swapna khoop padayala laglit aaj kal tula....hehehe....Good one ...i thought u r nxt post will be on "mhani"...anw i am waiting for that also....
ReplyDelete