Tuesday, 27 September 2011

"कोण आहे रे तिकडे ?"

"कोण  आहे  रे  तिकडे ?"
राजमहालात अस्वस्थपणे येरझारा घालत महाराज गरजले.
एवढ्यात आपली पगडी सांभाळत प्रधानजी धावत धावत येतो.
"मुजरा महाराज. आपण आज्ञा  केलीत? सेवक आपल्या चरणी हजर आहे महाराज "
येरझारा घालीतच राजाने विचारले ,
"प्रधानजी, ही 'गरिबी' म्हणजे काय भानगड असते तुम्हाला ठावूक आहे काय?"
"नाही महाराज! मला तर काही ठावूक नाही . तसा बऱ्याचदा आपल्या राज्यात मी हा शब्द ऐकलाय पण गरिबी म्हणजे काय मला नेमकं नाही सांगता येणार."....
"तथापि आपण काळजी करू नये महाराज . मी ताबडतोब एक समिती नियुक्त करतो आणि गरिबी म्हणजे काय याचा छडा लावतो"..."काय झालं महाराज? आपण फारच अस्वस्थ दिसत आहात. नेमकं झालंय तरी काय ?"
"प्रधानजी , गोष्ट मोठी गंभीर आहे, तेवढीच ती नाजूक पण आहे. रूपनगरीच्या  राजकुमारीचं  स्वयंवर आहे. आम्ही स्वयंवराचा विडा उचलून बसलोत. पण...पण प्रधानजी आम्हाला भीती वाटतेय की आम्ही हे स्वयंवर नाही जिंकू शकणार."
"असं काय म्हणताय महाराज? अहो तुम्ही एवढे शूर वीर असताना कुणाची टाप आहे तुम्हाला स्वयंवर जिंकण्यापासून रोखण्याची?"
"प्रधानजी, रूपनगरीच्या राजकन्येनं असं जाहीर केलय की ज्या राज्यात गरीब लोक असतील त्या राजाच्या गळ्यात ती माळ घालणार नाही. प्रश्न आता प्रतिष्ठेचा होऊन बसलाय प्रधानजी."
प्रधान, " हात्तिच्या! एवढंच ना? महाराज, तुम्ही  काही  टेन्शन  घेऊ  नका. आज तुम्ही निवांत झोपा. उद्यापासून आपल्या राज्यात झाडून झटकून बघितलं तरी गरीब दिसणार नाही याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही निर्धास्त रहा."  
महाराजांना गुड नाईट करून प्रधानजी जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रधानजी दरबारात हजर होतो. त्याच्या सोबत सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला एक मरतुकडा इसम हातात  भल्या मोठ्या फायलींचा गठ्ठा   घेऊन   उभा   असतो  .
राजाला  लवून  मुजरा  करून प्रधानजी सांगतो , "महाराज , हे आपल्या राज्यातले  फार मोठे  विद्वान  आहेत . 'गरिबी' हा  त्यांचा स्पेशालिटीचा विषय  आहे. गरीबीवर  आपण काल नेमलेल्या  एकसदस्यीय  समितीचे  तेच  अध्यक्ष  आहेत. त्यांनी समितीचा अहवाल सुद्धा सोबत आणला आहे."
हे ऐकून राजा अवाक होतो.
"महाराज,त्यांच्या  अहवालानुसार   तर  आपल्या  राज्यात  भरमसाठ  गरीब  लोक  असे ठासून  भरले  आहेत . मला  तर  वाटतंय  की  महालातले  आपण  काही  निवडक  लोक  सोडले  तर  आपली  अक्खी  प्रजा  गरीब  वर्गातच  मोडत असावी  .पण  तुम्ही  घाबरू  नका  महाराज , तसाच  गरिबी  'निर्मूलनाचा'  मार्ग  सुद्धा  मी  शोधून  काढलाय ." 
"तो काय?"
"महाराज  आपण  काय  करायचं  गरिबीची  रेषाच  इतकी  खाली  ओढायची  की  सगळेजण  आपोआप  गरिबी  रेषेच्या   वरच दिसले  पाहिजेत . म्हणजे  ती  गोष्ट  नाही  का , 'रेषेला  हात  ना  लावता  तिला  छोटी  करायची  असेल  तर  तिच्या  बाजूलाच  एक  मोठी  रेषा  काढायची' ...हे  थोडफार  तसच  आहे . एक  दमडीच्या  वर  ज्याचं   उत्पन्न  असेल  तो  श्रीमंत  म्हणूनच  घोषित  करायचा!"
"अहो,  पण  प्रधानजी, असं  कोंबडा  झाकून  ठेवला  म्हणजे  काय  उजाडायचं   थोडीच  राहणार  आहे? गरीब  तर  शेवटी  गरीबच  राहणार  ना ?"
"महाराज,  तुम्हाला  राजकन्येशी  लग्न  करायचंय   की  नाही ? मग  मुकाट्याने  मी  सांगतोय  तसं  करा . अहो  ते  स्वयंवर  म्हणजे  एक प्रकारची  शर्यतच  असणार  आहे . आणि  अशा  शर्यतीत  तुम्ही  ह्या  गरीबांचं   ओझं  पाठीवर घेवून धावणार  असाल  तर  कसली  जिंकताय   तुम्ही  शर्यत ?"
"पण प्रधानजी हा चक्क खोटारडेपणा आहे. आपण सत्याच्या मार्गाने जाउन खरं म्हणजे गरिबी नष्ट करायला पाहिजे."
राजाच्या  वक्तव्यात काही दम नाही हे धूर्त प्रधान जाणून असतो. कावेबाजपणे तो राजाला म्हणतो,
'मला सांगा महाराज आपण किती वर्षांपासून "गरिबी हटाव"चा नारा देतोय. झाली गरिबी दूर? कशी होणार? अहो आपल्या राज्यात शेवटचा गरीब मरून जात नाही तोपर्यंत गरिबी दूर होणारच नाही. आणि गरिबी निर्मूलनाचा हाच एक शहाणपणाचा मार्ग  आहे.आपण त्यांचं अस्तित्त्वच मान्य करायचं नाही राज्यात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी..."
"....इतकच नाही तर 'गरिबी' हा शब्दावरच आपण बंदी घालायची. राज्याच्या शब्दावालीत 'गरीब' हा शब्द शोधून देखील नाही सापडला पाहिजे. फार झालं तर बाराखडीतूनच 'ग' हा शब्द आपण काढून टाकू. म्हणजे कसलीच नौबत राहणार नाही."
"पण मग प्रधानजी, सगळे गरीब गरजू लोक जर राज्यातून नष्ट झाले तर आपल्याला काम तरी काय राहणार? आपली राज्यव्यवस्था मुक्त आणि उदार आहे, जो तो आपली आपली कामे स्वतः करतो. एक जनतेला सामाजिक सुरक्षा देण्याचं काम तर तेवढं आपण करीत असतो. तेही झटकून टाकायचं म्हणजे जरा अतीच..."
" तिथेच  तर खरी मेख आहे महाराज! अहो असला फुकटचा खर्च आपण उरावर घ्यायचाच कशाला? तेवढ्या पैशात आपल्या अक्ख्या महालात ए.सी.बसवून होईल... बड्या बड्या लोकांना नजराणे भेट करता येतील... त्यांच्या आगमनासाठी मलमली गालिचे अंथरता येतील...भारी भारीची शस्त्रास्त्रे  विकत घेता येतील... त्यांच्या जोरावर शेजार्याना दम भरता येईल...आणि मुख्य म्हणजे महाराज रूपनगरच्या राजकन्येची मर्जी संपादन करता येईल! तसं पाहिलं तर आता आजूबाजूंच्या सगळ्या राज्यांमध्ये तुमच्याशिवाय सामर्थ्यवान दुसरा कोणी राहिलेला राहिला नाही. हीच नामी संधी आहे. अशा निर्वाणीच्या क्षणी  ही गरिबीची नाट लावून घेऊ नका. झटकून टाका आणि पुढे व्हा."
प्रधानाच्या ह्या बोलण्याचा  राजाला तिरस्कार वाटतो पण त्याच क्षणी त्याला  आत कुठेतरी हलकेच सुखावल्याची  जाणीव  होते. वरकरणी तो प्रधानाला विचारतो, 
"आपणच असं झटकून टाकल्यावर या लोकांनी जायचा तरी कुठे? त्यांना कोण वाली आहे. काय करणार बिचारे?"
"वा! वा! असं कसं? असं कसं? चांगले  तीन पर्याय  आहेत की त्यांच्या समोर-
पहिला पर्याय म्हणजे 'उपोषण करणे'. नाहीतरी सध्या राज्यात उपोषण करण्याची फ्याशन पडलीच आहे तेव्हा गरिबांनी सुद्धा तेच करीत रहायचं. ह्या मोठ्या मोठ्या लोकांचा अनुकरण करायचं. काय म्हणतात बरं त्याला...महाजनो येन गता स पंथः!   हा हा हा!
उपोषणे फारच असह्य व्हायला लागली की दुसरा पर्याय आहेच- 'फाशी घेणे'! तोपर्यंत आपण कायद्याने फाशी घेण्याला शिस्तशीर मान्यताही  देऊन टाकू. फार झालं तर जीव देणाऱ्या गरीबांना मरणोपरांत पुरस्कार जाहीर करू. नाहीतरी जीव देऊन हे लोक राज्यावरचा भार हलकाच तर करीत आहेत. ही पण  एक प्रकारची राष्ट्र भक्तीच आहे की? हा हा हा हा !
त्यातले काही कट्टर गरीब मात्र तिसरा मार्ग पत्करतील. तो म्हणजे- 'हाती बंदूक घेणे'! हा हा हा ! पण आपल्याला  घाबरायचं  मुळीच कारण नाही. एवढी सुसज्ज सेना आपण बनवलीय तरी कशासाठी मग? या बंडखोरानाच आपला 'एक नम्बरचा शत्रू' म्हणून जाहीर करायचं आणि...आणि करायचा गोळीबार...धाड धाड धाड..हा हा हा हा हा ! "
प्रधानाचा अभिनिवेश पाहून राजा घाबरतो पण मनातल्या मनात मात्र तेवढाच खुश होतो. 
समितीच्या शिफारसपत्रिकेवर राजा स्वहस्ते राजमुद्रा उठवतो. आणि स्मितहास्य करीत स्वयंवराची गुलाबी स्वप्ने रंगवीत स्वतःच्या कक्षात निघून जातो.





 

1 comment:

  1. दिसणारी गरीबी मिटवता येइल पण मनाने गरिब असलेला राजा आणि त्याचा प्रधान?? मनाने श्रीमंत राज्यकर्ते आणि स्वयंवरासाठी अशी अट घालणारी राजकन्या मिळणे दुरापास्तच ....याचाच विषाद वाटतो. निदान विषाद वाटुन घेण्याच स्वातंत्र्य तरि आहे....नाहीतर उगाच चौकशी समितीचं नसतं झेंगाट लावायचे हे लोक....सगळे बुर्झ्वा खॆळ!!

    ReplyDelete