सगळा गाव
अंधाराची चादर पांघरून
चुपचाप निजला की
मला आपोआप जाग येते
आणि
काळोखात निपचित पडलेल्या
रस्त्यांवरून
माझे पाय मला
अगतिकपणे ओढत घेऊन जातात
हमरस्ते मी मुद्दामहून टाळतो
मला गल्ली-बोळातून जाणारे
वळणा-वळणाचे रस्ते
स्वतःच खेचून आणतात
अनवाणीच असतो मी अशावेळी
म्हणून
जमिनीखालचे सुप्त प्रवाह देखील
मला सहज कळतात
शांत निजलेल्या घरांच्या भिंतींना चाचपडत
मी कानोसा घेत असतो
आणि ह्या भिंती मला
घरांची रहस्ये सांगायला लागतात
गढीखाली दडलेल्या धनाचे
रहस्य
माजघरात पुरलेल्या प्रेताचे
रहस्य
वेड लागलेल्या थोरल्या मुलाचे
रहस्य
तुळईला दोर बांधून गळफास घेतलेल्या कुमारिकेचे
रहस्य…
तडा गेलेल्या घरभिंतींचे
रहस्य
घरांनाही वासना असते
घरांनाही स्वप्न पडतात
घरभिंतींची गुपितं तोलून धरीत
हळुवारपणे वाट काढीत मी पुढे चालत जातो
आणि घरस्वप्नांचे धुके माझ्या मेंदूला
वेढून टाकते
आर्जवे करीत काही कहाण्या
अजून सरसावून येतात
काहींची फिर्याद काहींचा आक्रोश…
कल्लोळ माजतो
गल्लीबोळातून वाट काढीत
मी गावाबाहेर येतो तेव्हा
गावाबाहेरच्या तळ्यावर धुके
जमलेले असते
तिथे घरस्वप्नांची कावड मी
जमिनीवर ठेवतो
आणि
मातीमध्ये पाय रोवून
आकाशाकडे पाहत
अनंतात पसरलेल्या
काळोखास
दोन्ही हात उभारून
आवाहन करतो
"तुझ्या गर्भातून सोन्याची
किरणे निघू देत आणि
उजळून जाऊ देत ही भूमी
राख होऊ दे इथल्या घराघरांची
आणि ढासळू देत
भिंती
नष्ट होऊ देत ही कोळीष्टके
आणि मुक्त होऊ दे
घुसमटलेले श्वास
बदल्यात
ह्या युगाचे शाप मी माझ्या कपाळावर कोरीन
बदल्यात
ह्या युगाचे करंटेपण मी पाठीच्या कुबडावर वाहीन
आणि
कातडीवर मिरवीन ह्या युगाच्या जखमांची रांगोळी "
कळकळून मी प्रार्थना करतो
तेव्हा दिशा हेलावून जातात
प्राण कंठाशी येतो
आणि गात्रे थरथरू लागतात
हजारो रात्रींची जाग सोसून
जर्जर झालेला मी कोसळतो
तेव्हा क्षितिजावर सोनेरी छटा
उमटू लागलेली असते
"नाळ तोडली म्हणून माय तोडता येत नाही तसाच काहीस , लांबचा रस्ता धरला म्हणून गाव सोडता येत नाही " ……… आम्ही कोसो दूर येतो आणि पार परक करून टाकतो स्वतालाच स्वताच्या ओळखीपासून तसा झ्हाल आत्ता जाणार्या या क्षणांमध्ये काहीस !!!!! शहराचं वार लागल कि आम्ही कसे पुरते व्यावहारिक होतो "मारणार्याच्या दुखावर सुधा दोनच दिवस दुख सांडायच असत हेच ठाम ठरवतो . तिथ कुठंच भावनेचा लवलेश नसतो आणि हो येडी माती आमच्या दशकातल्या एक्खाद्या फेरीला सुद्धा ढसा ढसा रडते आणि तरी हि आम्ही असतो "ढम्म , न दोन पापण्या एकमेकाला चीत्काव्णारे . न सोयर न सुतक !!!!" ………… बर जमत बाबा तुला भिंतीला गेलेल्या चीरांची दुखं समजून घ्यायला , वरच्या खपल्या काढून त्या जाख्मांमध्ये स्वत विव्हळत बसायला …. सचिन , पक्का डॉक्टर बाबा तू !!!!!!!!!
ReplyDelete