Saturday 20 August 2011

'अण्णा हजारेंचा काटा काढण्याचे १०१ मार्ग'



माननीय पंतप्रधान साहेब,
आपण सध्या किती कठीण परिस्थितीतून जात आहात याची मला एक जागरूक नागरिक या नात्याने जाणीव आहे.
तुमच्या पगडीतून आतले टक्कल दिसत नसले तरी त्याच्यावर आलेला लोड मी समजू शकतो.
अण्णा हजारे या माणसाचे काय करावे तुम्हाला काही कळत नसेल नाही. होतं असं कधी कधी. (माझ्या सासऱ्याबद्दलही मला अधून मधून असंच काहीतरी वाटत असतं.)
तुम्ही एवढ्या महान देशाचे पंतप्रधान. मी आपला सामान्य माणूस. माझा वकूब तो केवढा. पण  माझ्या परीने का होईना तुम्हाला मदत करावीच म्हणतो.
 तुमची या अडचणींतून  सुटका व्हावी या निर्मळ हेतूने प्रेरित होऊन मी एक पुस्तक लिहिले आहे- 'अण्णा हजारे यांचा काटा काढण्याचे १०१ मार्ग' !
हवं तर तुम्ही याला 'सेल्फ हेल्प बुक' समजा.
हे पुस्तक मी अनुक्रमे तुम्हाला आणि सोनियाबाईंना समर्पित करीत  आहे.
अहो एक माणूस अख्खी संसदीय लोकशाही वेठीस  धरू पाहतो म्हणजे गम्मत आहे की काय? अशात काहीतरी चमत्कार घडावा आणि हे शुक्लकाष्ठ एकदाचं निघून जावं असं तुम्हाला कित्ती कित्ती वाटत असेल नाही?   
म्हणूनच असले असले जालीम उपाय सुचवले आहेत या पुस्तकात तुम्हाला सांगतो....
उदाहरणादाखल काही उपाय मी तुम्हाला वाचून दाखवतो.
पान नंबर १३ उघडा.
धडा २ रा.   
"जगबुडीची आवई उठवणे"  
अशा नाजूक  वेळेस जनतेचं ध्यान दुसरीकडे वळवायचा हा सर्वात सोपा आणि निरुपद्रवी मार्ग आहे. नाहीतरी २०१२ साली  जगबुडी येणार अशी  हवा आहेच. आपण त्याचाच फायदा घ्यायचा.आणि "जगबुडी आली! जगबुडी आली!" अशी आवई उठवायची! मेडिया सगळा म्यानेज करा. यावेळेस  ती चूक करू नका. हवं तर जॉर्ज बुशला फोन करा. त्याने पण अशीच अफगाण युद्धाच्या वेळेस रुपर्ट मर्डोकसोबत सोयीच्या प्रसारणासाठी एक डील केली होती म्हणे. तुमची अवस्था  बघून तो तुमचं काम स्वस्तात करून देईन.
तसं जनतेचं लक्ष वळविण्याचा दुसरा एक घरगुती उपाय होता माझ्याकडे. तो असा की आपण ऑलिम्पिक  सारखे  काहीतरी अचाट खेळ अगदी वाजत गाजत सुरु करून द्यायचे. जुन्या काळी जनतेला भुलवण्यासाठी ग्रीसमध्ये अशा खेळांचा उपयोग करून घ्यायचे. पण नेमकाच आपला राष्ट्रकुट खेळांचा पचका झालाय. अजून लोक तेच विसरले नाहीत. त्यामुळे तूर्तास हा उपाय वापरणे शक्य नाही. उगाच खाजवून खरुज कशाला काढायची?
हे उपाय फारच पानचट वाटत असेल काही जालीम उपायांसाठी पान नंबर ४७ उघडा .
धडा ५ वा .
"जारण मारण तंत्र" 
अण्णा हजारेंना सरळ अटक करायचं . पण यावेळेस त्यांना तिहार जेलमध्ये नाही ठेवायचं. लांब कुठेतरी नेवून ठेवायचं. ते अंदमानातले  काळ्या पाण्याचे जेल चालू आहे  का हो अजून?
अण्णांच्या मागे जाणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कार्यकर्त्यांवर गोळीबार करणे वगैरे उपाय मला सुचले होते. पण या उपायांत काही originality नाही. इंग्रज लोकांनी ते आधीच करून ठेवलय. नाहीतर निष्पाप जनतेवर गोळीबार करण्याचा तुमचा नंदीग्राम, मावळचा  अनुभव इथे कामाला आला असता. 
तसं 'प्रत्यक्ष' हिंसा न करताही आपलं काम होऊ शकेल बरं का . म्हणजे बघा अण्णा आहेत वयोवृद्ध. आधीच तब्येतीने तोळामासा. त्यात पुन्हा उपोषणाला बसलेत. आठवडा तर होतच आलाय... बसू द्या असंच...!
पण या उपायात एक फार मोठा धोका आहे. अण्णांचं असं काही बरं वाईट  झालं तर सगळीच जनता पेटून उठेल. आपल्याला आताच देशात क्रांती वगैरे परवडणार  नाही. आहे त्या सिस्टीम मधले आपले ' vested interests ' आपल्याला विसरून कसे चालेल? 
शिवाय क्रांती ,संपूर्ण क्रांती हे एकदा पोळलय ना आपल्याला ? तेव्हा आता जरा जपूनच !
आणिबाणी वगैरे लागू करा असंही सुचवणार होतो पण जाऊ द्या.... तुम्हाला नाही झेपायचं ते.
त्यापेक्षा आपला एक सनातन उपाय सांगतो- "यामागे विदेशी शक्तींचा हात आहे" असा सरळ ठोकून द्यायचं! "नेमका कोण?" म्हणून विचारलं की काहीतरी मोघम मोघम सांगून द्यायचं. तेवढं तर तुम्हाला चांगलंच जमतं की!
जारण मारण तंत्रात अजून एक उपाय आहे. तो म्हणजे अण्णांना वेडा ठरविणे. नाहीतरी "समाजसेवा"! "समाजसेवा"! करीत आयुष्यभर लोकांसाठी झिजून स्वतःसाठी दमडीही शिलकीत न ठेवणाऱ्या  माणसाला आपल्याकडे वेडाच म्हणायची पद्धत आहे. आणि  आतातर हा माणूस उभ्या देशाला वेडाच्या नादी लावतोय. अशा वेड्यांवर धमक्या बिमक्यांचाही  काही परिणाम होत नाही. नंगे से खुदा डरे!

पुस्तकात अजुन पुढे काही तात्त्विक उपाय सुचवले आहेत.त्यासाठी पान नंबर १६७ उघडा. 
धडा ११ वा . 
"मनमोहन विषाद योग" 
यातला पहिला मार्ग आहे- 'सन्यास घेणे'.
राजकारणातूनच नाही, तर एक आपला, जनरली, संन्यासाच घेऊन टाकायचा. म्हणजे कसं "राजकारण नको पण अण्णा आवर" असं जे तुमचं होतंय ना त्यातून तुमची कायमची सुटका होईल.
आता तुमचा राजकारणाचा लोभ सुटतच नसेल तर त्यासाठीही काही मार्ग आहेत आपल्याकडे.
काय करा, तुम्ही आत्तापुरता राजीनामा देउन टाका. मग तुमच्या अख्ख्या मंत्रीमंडळासोबत विदेशात जाउन सगळ्यांची  होलसेल प्लास्टिक सर्जरी करून घ्या. आणि एका 'नव्या चेहऱ्यानिशी' परत येउन एक नवीनच राजकीय पक्ष सुरु करून मगच जनतेसमोर या! (तुमच्या नवीन पक्षासाठी  राजकीय सल्लागार म्हणून मी आहेच!)
यातूनही यशाची खात्री वाटत नसेल तर एक काम करा. एखादं नवीन बेट शोधून काढा. तिथे जावून निवडणूक लढवा. गेलाबाजार राहुलबाबाचं पंतप्रधान व्हायचं  स्वप्न तर नक्की पूर्ण होईल!
एक खबरदारी मात्र बाळगा. तुमचे काही कच्चे सल्लागार "अन्नांनाच तिकीट द्या" असं सुचवतील. ही घोडचूक अजिबात करू नका! अशी खतरनाक माणसं सत्तेच्या रिंगणात मुळीच घुसता कामा नयेत.
आता आपण राजकीय उपायांकडे वळलोच आहोत तर पान नंबर ८२ वरचा, ८ व्या धड्यातला एक उपाय जाता जाता सांगून टाकतो.' विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणे'. आज तुम्ही जात्यात आहात ते सुपात आहेत. तुमच्याकडे अशोक चव्हाण आहेत तर त्यांच्याकडे येडीयुरप्पा आहेत. तेव्हा त्यांनी नुसती मजा बघून किंवा आगीत तेल ओतून कसं चालेल? पण सध्या कात्रीत तुम्ही अडकला आहात तेव्हा पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागेल. एकत्र मिळून अण्णांवर काही तोडगा निघतो ते पहावे. 

हे उपाय करा न करा. पण एक गोष्ट मात्र आधी करा. आधी ते मख्ख  चेहऱ्याचे पक्ष प्रवक्ते हटवा आणि स्वतः पब्लिकला सामोरे जा. अहो लोकशाहीत तुम्ही खऱ्या अर्थाने लोकनेते आहात. तुम्हीच  असं लोकांपासून तोंड लपवून कसं चालेल? इकडे तुम्ही ताटी लावून बसलात. तिकडे सोनियाबाई सोवळ्यात असल्यासारखं वागतायत. लोकशाहीत जनतेलाच असं अस्पृश्यासारखं वागवून कसं चालेल? जा की त्यांना सामोरे. आणि त्यात एवढं कानकोंडा वाटून घ्यायची गरजच काय? शेवटी ती तुमचीच जनता आहे. आणि भ्रष्टाचार जगात कुठे होत नाही? या एकदा समोर. संवाद घडला की सगळ्यांची मने निर्मळ होतात.
जन-लोकपाल बिलाचे तुम्ही म्हणता तसे 'grave consequences for parliamentary democracy ' , तुमची 'theory of parliamentary supremacy ' ,' एक शक्तिशाली लोकपाल बनविण्यातल्या मर्यादा आणि संभाव्य  धोके' .....हे सगळं अगदी बरोबर आहे हो. पण सामान्य जनतेला एवढं जास्त कळत नसतं. ते त्यांना समजेल अशा भाषेत आणि योग्य त्या व्यक्तीने सांगणेच ...जाऊ द्या. त्यापेक्षा सरळ तुम्ही पान नंबर २१४ काढा आणि धडा १४ वा 'public perception management ' वाचून काढा.
अण्णांच्या उपोषणाचे दिवस वाढत जातील तशी तुमची गोचीही वाढत जाणार आहे. तेव्हा काही निर्वाणीचे उपायही आताच सांगून ठेवतो. पुस्तकात ते Annexture -२ मधे दिले आहेत.
फारच अटीतटीची  वेळ आली तर अण्णांना एक 'जादू की झप्पी' द्या आणि त्यांचे म्हणणे सरळ मान्य करून टाका! लोकपाल ते म्हणतात तस्साच  काही अगदी बनवायची गरज नाही. पण काहीतरी बनवा तर खरे! अहो लोकांनी तर  तुमचा लोकपाल येणार की अन्नाचा लोकपाल येणार यावर सट्टा लावायला सुरुवात केली आहे म्हणे!
शेवटी आता तुम्हाला खरं सांगू का, मूळ मुद्दा भ्रष्टाचाराचा नाहीच आहे. 'तळे राखील तो पाणी चाखील' हा न्याय भारतीय जनतेला अनादी काळापासून मान्य आहे. आज मुद्दा आहे तो महागाईचा, misgovernance चा  आणि असल्याच छोट्या छोट्या गोष्टींचा. आणि ह्याच छोट्या गोष्टी बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. म्हणूनच ती लोक आज अण्णा हजारेंच्या मागे उभी राहतात.  त्यांच्या मागे उभ्या असलेल्या गर्दीला आणि त्यांच्या आंदोलनाला मेणबत्त्या घेऊन फिरणार्यांचा  urban  middle class phenomenon समजण्याची चूक करू नका. राष्ट्राचं भवितव्य बदलण्याच्या शक्यता या आंदोलनात दडलेल्या आहेत.तेव्हा पंतप्रधान साहेब... सावध असा!
सगळेच उपाय काही मी तुम्हाला फुकट  सांगणार नाही. हे फक्त एक ट्रेलर दाखवतोय. बाकी पुस्तकात मी सगळं लिहिलंच आहे. पुस्तकाचे मानधन म्हणून माझी फार काही मागणी नाही. आपल्या सरकारात जेवढे काही  भ्रष्ट व्यवहार होतील त्याच्या फक्त 0 .१%  रक्कम माझ्या बँक खात्यात जमा होत रहावी इतकेच. घाबरू नका...माझेपण स्विस बँकेत खाते आहे! आधी तिकडे खाते उघडून मगच पुस्तक लिहायला बसलो!
(ता.क. - चुकून माकून परत सत्तेवर आलात तर तुमचा राजकीय सल्लागार म्हणून माझ्या नावाचा गांभीर्याने विचार व्हावा ही नम्र विनंती.)

                                                                     आपलाच-
                                                                       फकीरा