Wednesday 4 December 2013

प्रेषित


सगळा गाव
अंधाराची चादर पांघरून
चुपचाप निजला की
मला आपोआप जाग येते

आणि

काळोखात निपचित पडलेल्या
रस्त्यांवरून
माझे पाय मला
अगतिकपणे ओढत घेऊन जातात

हमरस्ते मी मुद्दामहून टाळतो
मला गल्ली-बोळातून जाणारे
वळणा-वळणाचे रस्ते
स्वतःच खेचून आणतात

अनवाणीच असतो मी अशावेळी
म्हणून
जमिनीखालचे सुप्त प्रवाह देखील
मला सहज कळतात

शांत निजलेल्या घरांच्या भिंतींना चाचपडत
मी कानोसा घेत असतो
आणि ह्या भिंती मला
घरांची रहस्ये सांगायला लागतात

गढीखाली दडलेल्या धनाचे
रहस्य
माजघरात पुरलेल्या प्रेताचे
रहस्य
वेड लागलेल्या थोरल्या मुलाचे
रहस्य
तुळईला दोर बांधून गळफास घेतलेल्या कुमारिकेचे
रहस्य…
तडा गेलेल्या घरभिंतींचे
रहस्य

घरांनाही वासना असते
घरांनाही स्वप्न पडतात

घरभिंतींची गुपितं तोलून धरीत
हळुवारपणे वाट काढीत मी पुढे चालत जातो
आणि घरस्वप्नांचे धुके माझ्या मेंदूला
वेढून टाकते

आर्जवे करीत काही कहाण्या
अजून सरसावून येतात
काहींची फिर्याद काहींचा आक्रोश…
कल्लोळ माजतो

गल्लीबोळातून वाट काढीत
मी गावाबाहेर येतो तेव्हा
गावाबाहेरच्या तळ्यावर धुके
जमलेले असते

तिथे घरस्वप्नांची कावड मी
जमिनीवर ठेवतो
आणि
मातीमध्ये पाय रोवून
आकाशाकडे पाहत

अनंतात पसरलेल्या
काळोखास
दोन्ही हात उभारून
आवाहन करतो

"तुझ्या गर्भातून सोन्याची
किरणे निघू देत आणि
उजळून जाऊ देत ही भूमी

राख होऊ दे इथल्या घराघरांची
आणि ढासळू देत
भिंती

नष्ट होऊ देत ही कोळीष्टके
आणि मुक्त होऊ दे
घुसमटलेले श्वास


बदल्यात
ह्या युगाचे शाप मी माझ्या कपाळावर कोरीन
बदल्यात
ह्या युगाचे करंटेपण मी पाठीच्या कुबडावर वाहीन
आणि
कातडीवर मिरवीन ह्या युगाच्या जखमांची रांगोळी "


कळकळून मी प्रार्थना करतो
तेव्हा दिशा हेलावून जातात
प्राण कंठाशी येतो
आणि गात्रे थरथरू लागतात

हजारो रात्रींची जाग सोसून
जर्जर  झालेला मी कोसळतो
तेव्हा क्षितिजावर सोनेरी छटा
उमटू लागलेली असते