Thursday 19 December 2013

'फकिराचे राजकीय प्रयोग'



"दिल्ली विधानसभा  निवडणुकीत आम आदमी पार्टी २८ जागांवर विजयी!"


बातमी ऐकली आणि अंगात दहा हत्तीचं  बळ संचारलं . 
पेपर हातात नाचवीत आम्ही थेट मास्तर भागवतचं दुकान गाठलं . मास्तर भागवत म्हणजे आमच्या सुरूच न झालेल्या राजकीय कारकिर्दीचे फ्रेंड, फिलोसोफर आणि गाईड होते. आमच्या दुष्काळी गावातल्या रिकामचोट राजकीय टोळांचे ते पितामह भीष्म होते. 
मास्तर नेहमीप्रमाणे दुकानात माशा मारीत बसले होते .  मास्तरसमोर पेपर आदळला आणि म्हटलं, 
"मास्तर हे बघा! दिल्लीत काय धोबी पछाड दिलाय केजरीवालभाऊनं  कॉंग्रेस- बीजेपीवाल्यांना …" 
मास्तर पेपरात घुसले . पण आमच्या अज्ञानमिश्रित उत्साहाचा धबधबा धो धो वाहतच चालला, 
"… मायला, आता कळंल त्यांना . आम्हाला दारात उभे करीत नव्हते.… तुम्हाला  सांगतो मास्तर , आपल्या देशात जो काही भ्रष्टाचार चालला आहे ना, त्या सगळ्या भ्रष्टाचाराची इंजिनं आहेत हे राजकीय पक्ष म्हणजे . इंजिनं ! आपल्याला ना मास्तर, आधीपासूनच लोकशाहीतला हा 'राजकीय पक्ष' नावाचा प्रकारच मुळात कधी पटला नव्हता .साला ते महात्मा गांधी का  कोण म्हटलं होतं तसं राजकीय पक्ष पाहिजेतच कशाला हो मास्तर? सरळ सरळ जनता आणि उमेदवार असा हिशोब राहू द्या न भाऊ . म्हणजे तुम्हीच तिकीटं विकायची , लोकांची मतं वरच्यावर हायज्याक करायची, शेवटी तिसऱ्याच पक्षासोबत आघाडी करायची आणि जनतेला दाखवायचा बाबाजी का ठुल्लू … ही तर मायला लोकशाहीची होलसेल दुकानदारीच झाली… आन आमच्या सारख्या तरुण तडफदार धडाडीच्या …. "
मास्तर केव्हाशिक उठून माझ्याजवळ आले आणि तोंडाचा वास घेत म्हणाले, 
"सकसक्काळ नशापाणी करून आलायस का काय बे ? ही दिल्लीची बातमी वाचून तुला पुन्हा एकदा  निवडणुकीची हुडहुडी भरली का काय जणू ? . तुला इथं गल्लीत कोणी इचारीना अन गप्पा मारतोस दिल्लीच्या ? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उताणा पडलास ते विसरलास काय बे इतक्यात? मायला,बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. हो भाईर!" 
मास्तरनं  एका फटक्यात आमच्या दंडात उठलेली राजकीय बेटकुळी जिरवून टाकली. ते बोलले ते पण काही खोटं नव्हतं म्हणा . अपयश ही  यशाची पहिली पायरी असते असं मानून आम्ही आतापर्यंत ग्रामपंचायत ते जिल्हापरिषदेपर्यंत सगळ्या निवडणुकांना उभे राहिलो. सोसायट्या म्हणू नका पतपेढ्या म्हणू नका…आम्ही सगळीकडं हातपाय मारून पहिले . पण यश तर सोडाच , निवडणुकीनंतर साधं डिपोजिटपण हाती लागलं नव्हतं. मास्टरनं घाव फारच वर्मी हाणला होता . निराश होऊन आम्ही मोर्चा 'पार्लमेंट' कडे वळवला. 'पार्लमेंट' म्हणजे आमच्या गावातल्या कामानं रिकामचोट अन पैशानं भिकारचोट असलेल्या स्वयंघोषित बुद्धिवाद्यांच चर्चेचं ठिकाण होतं . इथं हे चार पाच टोळ दिवसभर बसून गुऱ्हाळ घालीत. 
मी गेलो तेव्हा यांच्या चर्चा ऐन रंगात आल्या होत्या. मास्टरमाईंड बंटी मालुसरे खाजगी आवाजात सगळ्यांना सांगत होता- 
"… म्हणून म्हणतो त्या  केजरीवालला काही सरकार बिर्कार स्थापन करायचच नाही . त्याला नुस्ता टाईम काढायचाय. म्हणजे पुन्हा निवडणुका होतील आणि आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत मिळेल. त्यांना नेमकं तेच पाहिजे - निर्विवाद बहुमत. तोपर्यंत त्यांचा मेडियाच्या पैशानं फुकट प्रचार चाललाय. आणि त्या १८ अटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुनर्निवडणुकीचा मेनिफेस्टो आहे त्यांचा . प्रशासकीय मुद्दे कोणते आणि राजकीय मुद्दे कोणते हे न कळण्याइतका दुधखुळा आहे की काय तो? सगळ्या अटी populistic… "
बंटी मालुसरे  म्हणजे आमच्या गावातून  दिल्लीला जाऊन आलेला एकुलता एक माणूस . कलेक्टर होण्यासाठी हा दिल्लीला गेला . तिथं  परीक्षा तर पास  झाला नाही पण एक पंजाबी पोरगी पटवून तिकडंच लग्न करून गावाकडे परत आला . त्यामुळं याचं  गावात खूप नाव झालं . तिकडं बुकात शिकलेली इंग्रजी वाक्यं बासुंदीत काजू किसमिस पेरावी तसा हा चर्चेत पेरायचा . त्यामुळं ह्याच्या कोणी नादीच लागायचा नाही . 'वासरात लंगडी गाय शहाणी' या न्यायानं पार्लमेंटनं  त्याला 'मास्टरमाईंड' हा किताब देऊन टाकला होता . 
बंटी मालुसरे सुरूच होता- 
"… पण  सत्तेत आल्यावर ह्यांची काय ग्यारंटी देता ? 'Power corrupts and absolute power corrupts absolutely' . (शांतता ) अन तू काय घाबरू नको मुन्न्या.  आम आदमी पार्टी काय महाराष्ट्रात येत नाही . ह्या चळवळ गोठून राजकीय पक्ष बनलेल्या पार्ट्यांना मराठी माणूस भीक घालीत नाही . माजघरात कोणाला घ्यायचं अन शेजघरात कुणाला न्यायचं हे मराठी माणसाला पक्कं ठाऊक असतं."
मुन्ना गवळीचा चुलत चुलत चुलत भाऊ राष्ट्रवादीचा आमदार होता . त्यामुळं मुन्ना दिल्लीतलं बघून धास्तावला होता .
इतक्यात कोपऱ्यात बसलेल्या दुलेखान बाबरची नजर आमच्यावर पडली .आमची एन्ट्री झाल्याचे कळताच पार्लमेंटचं कामकाज तहकूब करण्यात आलं . आमचा एकंदरीतच अवतार बघून भाऊ आज काहीतरी भयानक गौप्यस्फोट करणार याचा सगळ्यांना अंदाज आला. सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. पार्लमेंटमध्ये अभूतपूर्व शांतता पसरली…       
 त्या शांततेचा भंग करीत आम्ही गंभीरपणे खंबीर राहून  आमचा मानस सगळ्यांसमोर जाहीर केला .  
"दोस्तहो! या वेळेस  आपण ठरवलंय … यंदा आपण आमदारकीला उभे राहणार !"
आम्ही पार्लमेंटवर असा बॉम्ब टाकल्यावर सगळे काहीवेळ स्तब्ध झाले . आणि एकाएकी फिस्स करून सगळेचजण हसत सुटले . 
बंटी मालुसरेनं  सगळ्यांना आवर घातला . पुन्हा पार्लमेंट बसली . अन चार घंटे पन्नास सिग्रेटीनंतर पार्लमेंटचा असा ठराव झाला की नाहीतरी देशात सध्या प्रयोगशील राजकारणाचे वारे वाहत आहे . जनमत कधी नव्हे इतके सेन्शिटिव झाले आहे . Gay rights पासून ते foreign diplomats पर्यंत जनता कशावरूनही चेकाळून उठायला लागली आहे.  तेव्हा अशा अंदाधुंदीच्या वातावरणात गावातला एक नवीन राजकीय प्रयोग म्हणून भाऊ फकीरला आमदारकीला उभा करायला काहीएक  हरकत नाही.   
ठरलं ,भाऊ फकीर यंदा आमदारकी लढवणार!

      

एकदा आम्हाला राजकीय प्रयोगातला गिनिपिग बनवायचा ठरवल्यावर सगळी टीम पार्लमेंट कामाला लागली. प्रत्येकाने कामे वाटून घेतली .आमच्या मिशन आमदारकीचे राजकीय सल्लागार म्हणून मास्तर भागवत, थिंकटैंक म्हणून मास्टरमाईंड बंटी मालुसरे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून दुलेखान बाबर तर जनसंपर्क प्रमुख म्हणून मुन्ना गवळी यांनी जबाबदाऱ्या उचलल्या . प्रायोजकपदाची जबाबदारी मात्र पद्धतशीरपणे खुद्द आमच्याच गळ्यात येउन पडली .
दुलेखान बाबर म्हणजे निव्वळ गोबेल्सची अवलाद होता. प्रोपोगंडा कसा करावा ते कुणी दुल्याकडून शिकावं. दुल्या आधी पुण्यात फ्लेक्स-बँनर प्रिंटींगचं काम करायचा. त्यामुळे 'आधी इमेज बिल्डींग, मगच निवडणुकीची फिल्डिंग' असा टीमचा ठराव झाल्याबरोबर दुल्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली .

पांढरा शुभ्र शर्ट , पांढरी शुभ्र प्यांट , तेवढाच पांढरा बूट अशा वेषात एका हाताने मोबाईल कानाला लावलेला आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी V अशी दोन बोटे दाखवणारा आमचा लाईफसाईझ  फोटो अन त्याच्या शेजारी हे वाक्य -

'डिपॉझिट जप्त होण्याला पण अंत आहे
म्हणूनच  भाऊ शांत आहे!'

कामं वाढली तसा दुल्या पेटलाच .
मुख्य प्रश्न फायनान्सचा होता. मास्तर भागवत म्हणाले, "राजकारणात सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पैशाला हात आखडून राजकारण होत नाही भाऊ फकीर" .
मग काय एक घाव दोन तुकडे . फटक्यात नदीकडची दोन एकर विकून झटक्यात पैसा उभा केला.
दुल्याचं फ्लेक्स तयार-

" नदीकाठची दोन एकर विकून निवडणुकीला पैसा उभा केल्याबद्दल भाऊचे अभिनंदन !
  चर्चा तर होणारच ! होऊ दे खर्च!!!"
           - शुभेच्छुक-
   भाऊ फकीर फ्यान क्लब .

प्रचारासाठी म्हणून आम्हाला एक गाडी विकत घेणं भाग होतं. गाडी घेतली.
दुल्या तयार -
" रोख क्याश देऊन नवी कोरी टाटा सुमो गोल्ड विकत घेतल्याबद्दल भाऊंचे  हार्दिक अभिनंदन ! होऊ दे डिझेलचा खर्च!"
खाली गाडीच्या बाजूला एका हातात मोबाईल  (अजून कानाला लावलेला)  अन दुसऱ्या हातानं गाडीची चाबी श्रीकृष्णासारखी फिरवीत असलेला आमचा फोटो!

दुल्याचं हे अती व्हायला लागल्यावर आम्ही मास्टरमाईंड बंटी मालुसरेला म्हटलं की हे काही बरं नाही.  अशानं आपण लोकांच्या नजरेत येऊ . त्यावर तो एकदम भारी बोलला. म्हणाला,
"भाऊ पंचे नेसून राजकारण करण्याचा  काळ गेला आता. आजकाल लोकांना नेता कसा भपकेबाज पाहिजे. आपण स्वतः जे करू शकत नाही ते जनता आपल्या नेत्यात पाहत असते. आपल्या दुष्काळी भागात तर भाऊ चार पाच गाड्या मागेपुढे घेऊन फिरल्याशिवाय अन अंगावर किलोभर सोनं घातल्याशिवाय  लोकं कुणाला नेता मानायलाच तयार होत नाहीत. म्हणून म्हणतो भाऊ ' Expenditure should not only be done , it must be seen to be done "
"अरे पण अशा मंदीच्या काळात भाऊनं ही  काय उधळपट्टी चालवली म्हणून लोक आपल्याला बदनाम करतील त्याचं काय ? राहुल गांधी काय म्हणील? नरेंद्र मोदी  काय म्हणील? ओबामा काय म्हणील ?"
"भाऊ, मंदीतच संधी साधायची असते. अमेरिकेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी 'केन्स' नावाच्या त्यांच्याच अर्थतज्ञानं सर्वप्रथम 'होऊ दे खर्च' चा नारा दिला होता. अमेरिकी अध्यक्षाला त्यानं बजावलं  "Dig holes in the ground and then fill them up- होऊ दे खर्च!"
बंटी मालुसरेनं असं इंटरन्याशनल अपील टाकल्यावर मात्र आम्ही दोन्ही खिसे मिशन आमदारकीसाठी मोकळे करून दिले. तेवढंच इंटरन्याशनल अपील आमच्या प्रचाराला यावं म्हणून दुल्यानं अजून एक पोस्टर बनवलं . थेट अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा आमच्या गळ्यात गळा घालून स्माईल करीत असलेला फोटो अन त्याच्याखाली वाक्य -

" लक्षुमन राज्य करतो रामासंगं , भाऊची दोस्ती ओबामासंगं "
           -शुभेच्छुक -
 भाऊ फकीर NRI फ्यान क्लब !

गावात जिकडे तिकडे असले अचाट पोस्टर बघून आमच्याबद्दल हळूहळू जनमत जागे व्हायला लागले. चार दोन फुटकळ कार्यकर्तेही आमच्या मागे पुढे फिरायला लागले .
तेव्हा मास्तरच्या सल्ल्यानुसार गावात आमचा एक जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरले .
बंटी मालुसरे म्हणाला "हीच योग्य वेळ आहे. Timing is very crucial in politics."
पण कार्यक्रमाचे स्वरूप काय ठेवायचे यावर कुणाचे एकमत होईना . मुन्न्या म्हणायचा आपण एक भव्य marathon स्पर्धा ठेऊ . गुजरातेत नरेंद्र मोदी च्या 'रन फॉर युनिटी' ने मुन्न्या फारच भारावून गेला होता . पण आम्ही त्याच्या ह्या कल्पनेला व्हेटो दिला . सालं काही लोक चड्ड्या घालून रस्त्यावर पळाल्यामुळं समाजात जागृती कशी निर्माण होते हे कोडंच आपल्याला अजून उमगलेलं नाही. हा सगळा प्रकारच आपल्याला एकदम हस्तिदंती मनोऱ्यातला वाटत आलेला आहे . राष्ट्रीय एकत्मेसाठी पळा , जागतिक शांततेसाठी पळा, स्त्रियांच्या सुरक्षेसाठी पळा… अन  शेवटी पळता भुई थोडी झाली तरी एक प्रश्न सुटायच्या मार्गी नाही? अरे हुडूत!  मुन्नाचा प्रस्ताव आम्ही धुडकावून लावला .
बऱ्याच चर्चेनंतर  एक जंगी सभा घ्यायची असा  निर्णय पक्का झाला .सभेसाठी पत्रकं छापण्यात आली . आमचा राजकीय दृष्टीकोण सर्वसमावेशक वाटावा म्हणून या पत्रकांवर भारतीय उपखंडातल्या तमाम राजकीय विचारधारांच्या प्रणेत्यांचे फोटो छापण्यात आले . एका टोकाकडून सुरुवात करून - महात्मा गांधी, त्यांना खेटून भगतसिंग, त्यांच्या बाजूला अयोध्या मंदिराच्या ब्याग्रौंडवर उभे असलेले प्रभू रामचंद्र, त्यांना चिटकून दाढीवाले कार्ल मार्क्स, त्यांच्यानंतर दाटीवाटीने फुले-शाहू-आंबेडकर, त्यांच्या पलीकडे ह.भ.प. मोतीराम महाराज… सगळी मांदियाळी त्या पत्रकावर अवतरली .   मास्टरमाइंड बंटीचं लॉजिक पक्कं होतं -कोणीच सुटायला नको आणि कोणीच नाराज व्हायला नको. ह्याला तो  'Politics of Inclusion' म्हणायचा. "Not exclusion but inclusion is the essence of true democracy"!
सभेच्या तयारीसाठी मुन्न्यानं  कंबर कसली . गरज पडेल म्हणून तो आणखी डझनभर पोरं घेऊन आला आणि वाघासारखा कामाला लागला.
"मतदारसंघातली सगळी गावं कव्हर करायची म्हणजे भाऊ लाखभर तरी पत्रकं वाटावी लागतील." मुन्न्याने म्हटल्याबरोबर आम्ही फट्कन हजाराच्या नोटांचं एक बंडल काढून त्याच्या हातात दिलं.
"भाऊ धा-वीस गाड्या तरी बुक कराव लागतीन " म्हटल्याबरोबर आम्ही अजून एक बंडल त्याच्या हातात दिलं. नंतर नंतर कामं वाढली तसतशी मुन्न्याची पोरं सुद्धा पैसे न्यायला येऊ लागली. 'भाऊ शामियानावाल्याचे पैसे', 'भाऊ साउंडवाल्याचे पैसे', 'भाऊ डेकोरेशनचे पैसे','भाऊ डिझेलचे पैसे ',' भाऊ कार्यकर्त्यांना दारू तर पाजावीच लागते… त्याचे पैसे!'
मुन्ना एकदिवस म्हणाला, "भाऊ तयारी जोरदार चालू आहे . लई मोठी पब्लिक येणार असं दिसतंय . पण ऐन वेळेस काही राडा बिडा झाला तर आपल्याकडं बी काही मानसं पाहिजेत. "  असं म्हणून मुन्न्या दहाएक पहिलवानांच्या सरबराईचा खर्च घेऊन गेला.
पैसा पाण्यासारखा खर्च होऊ लागला . जादूची कांडी फिरावी तशी तिजोरीतली बंडलाची थप्पी खाली खाली येऊ लागली . रोज रात्री आमच्या स्वप्नात 'फादर ऑफ होऊ दे खर्च फिलॉसाफी' जे . एम . केन्स  यायचा आणि म्हणायचा ,
" खर्च करायला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होऊ दे खर्च!"

हे राड्याचं मुन्न्यानं इतकं जीवावर घेतलं होतं की खबरदारी म्हणून त्यानं दुल्याला सांगून एक खास पोस्टर बनवून घेतलं .  त्यात आमच्या रुबाबदार फोटोच्या शेजारी मुन्न्याचा खतरनाक गुंडासारखा दिसणारा क्लोज-अप फोटो अन खाली लिहिलेलं -
 " एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
   भाऊचा नाद केला तर हातपाय गळ्यात "
पण खटक्यावर बोट ठेवलं ते दुल्याच्या पुढच्या पोस्टरनं. सभा दोन तीन दिवसावर आली तेव्हा दुल्यानं गावातल्या मेन चौकात एक मोठ्ठ  फ्लेक्स लावलं . त्याच्यावर एका बाजूला दस्तुरखुद्द भाऊ फकीर आणि दुसऱ्या बाजूला चक्क कतरिना कैफ! खालची लाईन तर कहरच होती -
" राजाचं राजपण , कालपण आजपण
  फकीर भाऊ तुमच्यासाठी कायपण
  कधीपण , कुठेपण "

गावात चर्चेला नुसतं उधाण आलं . सभा उद्यावर आली म्हणता मुआइना करण्यासाठी म्हणून आम्ही गावात एक चक्कर टाकून यायचं ठरवलं .गाडी काढली आणि चार पाच कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही निघालो . गावात जिकडं तिकडं आमच्याच नावाची चर्चा सुरु ! चौकात, बाजारात, हॉटेलात, पानाच्या टपऱ्यावर, ब्यानर्सच्या खाली जिथं तिथं लोक गटागटानं जमून आमच्याच नावाचा महिमा गात होते . सगळं वातावरण फुल्ल पेटलं  होतं. आता सभा यशस्वी होणार हे तर पक्कंच होतं . आम्हाला तर दिवसाढवळ्या आमदार झाल्याचं स्वप्न पडायला लागलं होतं.  शेवटी एक नजर सभेच्या जागी टाकून येऊ म्हणून तिथे गेलो तर दुल्याचं लेटेस्ट ब्यानर स्वागताला तयारच होतं -
" फकीर भाऊ आहे राजकारणात दर्दी
   भाऊच्या सभेला लाखानं गर्दी !"
तृप्त मनाने आम्ही घरी परत आलो . म्हणजे एवढा खर्च केला तो काही फुकट जाणार नाही तर! 'मिशन आमदारकी' सक्सेसफ़ुल्ल होणार!
सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही मनातल्या मनात आभार मानले आणि ठरवलं 'उद्याची सभा अश्शी गाजवून सोडायची की अख्खा मतदारसंघ दणाणून उठला पाहिजे' .

 ठरलं, आता लक्ष्य उद्याची सभा !



(दोन दिवसानंतर)

" फकीर भाऊ आहे राजकारणात दर्दी
  भाऊच्या सभेला लाखानं गर्दी !"

हे पोस्टर म्हणजे गावात विनोदाचा विषयच होऊन बसलं होतं.  सभेला काळं कुत्रं देखील फिरकलं नव्हतं.
आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला असा सुरुंग लागला म्हटल्यावर आमच्यावर तर आभाळच कोसळले. पाणी नेमकं मुरलं कुठं हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही तत्काळ पार्लमेंट बोलावली. सगळ्यांना तडक वाड्यावरच यायला सांगितलं .
पार्लमेंट बसली. आमच्या रागाचा थोडा निचरा झाल्यावर सगळेजण म्हणाले,
"भाऊ  झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढं काय करायचं ते ठरवा."
"आता पुढचं अजून काय ठरवणार ? एका सभेतच आमचा पार लेहमन ब्रदर्स झालाय राजेहो !"  पैसाच संपला म्हटल्यावर कसचं करता राजकारण? "एका मताचा रेट हजार रुपये चाललाय  मतदारसंघात. मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत पाकिटं घरोघर नाही पोचली तर संपलं  आमचं  राजकारण"
मग सगळेजण आपापल्या परीने  पैसा जमवण्याचे उपाय सुचवू लागले .
मुन्न्या म्हणाला 'भाऊ ते आम आदमी पार्टीचं कोणीतरी म्हनं  नुस्त्या कविता वाचून दाखवून करोडपती झालंय . तुमच्या बी काही कविता हैतच कि भाऊ…'
 दुल्या म्हटला 'भाऊ, अजून एक पोस्टर बनवू आणि पब्लिकलाच चंदा देण्याचं अपील करू.'
 "अन पोस्टरवर काय लिहायचं?" .
सैपाक घरातून सौभाग्यवतीचा कडक आवाज आला,
" 'खायला नाही दाना अन मला आमदार म्हणा' असं लिहा म्हणाव."
राजकारणाच्या नादापायी चाललेली आमची उधळपट्टी बघून  बायको कावली होती . आमदारकीचा लढा आता आम्हाला घराबाहेर अन घराच्या आत दोन्ही ठिकाणी द्यावा लागत होता. अण्णा हजारे खरच हुशार माणूस . त्याला हे लाग्नाबिग्नाच लचांड आधीच कळलं असेल . आपल्या अंगात चळवळ करायची वळवळ आहे  हे लक्षात घेऊन त्यानं  लग्न करून हळहळत बसण्यापेक्षा अविवाहित राहून तळमळत बसणंच पसंत केलं . अण्णा हजारे जिंदाबाद!
बंटी मालुसरे म्हणाला, 'पैसा तर आम आदमी पार्टीला पण लागलाच असेल की . आपण थेट केजरीवाललाच पत्र लिहून विचारू'.
सगळे निघून गेल्यावर आम्ही पत्र लिहायला बसलो . त्यात आमची कैफियत मांडली आणि लिहिलं,
'जो गती भई कांग्रेस की, वही गती हमरी आज
बाजी जात 'आमदारकी'की,  केजरीवाल राखो लाज'
खरा मजकूर आम्ही पत्राच्या मागच्या बाजूस लिहिला , " अरविंद भाऊ तुमचे लग्न झाले आहे काय? झाले असेल तर तुम्ही अशा राजकीय उचापत्या करीत असताना तुमची बायको तुम्हाला काही म्हणीत नाही काय? म्हणत असेल तर तुम्ही तिला कसे  handle  करता? पत्राच्या मुख्य बाजूस विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे नाही दिलीत तरी चालतील पण ह्या प्रश्नाची उत्तरे मात्र तातडीने द्यावीत."
घायकुतीला आलेला-
आपला फकीर.

 दुसऱ्या दिवशी गावात मास्तर भागवतची गाठ पडली .
मास्तर म्हटले " अरे फकीर ,अशी कशी तुझी इलेक्शनची  तयारी भाऊ? पेपरात बोटभर बातमी वाचायला मिळाली  नाही तुझ्या नावची अजून ? तुला बजावून ठेवतो बघ पेपरात नाव छापून आल्याशिवाय राजकारणी म्हणून शिक्का लागत नाही माणसाला "
मास्तरनं  असं पेपरबाजीचं पिल्लू डोक्यात सोडल्यावर आम्ही लागलीच एक दोन कार्यकर्ते (भाड्याने) घेऊन   'दैनिक पिपाणी' चे  ऑफिस गाठले. तिथं तास दोन तास वाटाघाटी झाल्यानंतर संपादक  बातमी द्यायला तयार झाले. बदल्यात आम्ही दैनिक पिपानीच्या पुरवणीला पान भरून  रंगीत जाहिरात देण्याचे ठरलं. आधीच दिवाळं निघालेलं असताना ही जाहिरात बोकांडी बसल्यामुळं तर आमचं पार कंबरडंच  मोडलं. पण पेपरात नाव येणं तितकच महत्त्वाचं होतं म्हणून  यावेळेस आम्ही कर्ज काढायचं ठरवलं. दुल्या असता तर त्यानं ह्या प्रसंगावर काय सॉलिड लायनी छापल्या असत्या! पण पैशाचा ओघ आटला तशी दुल्याची कल्पकता आपोआप आटली होती.
बातमी छापून आणायची तर तशी काहीतरी घटना घडली पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसायचं ठरवलं.आता उपोषण करायचं म्हणजे काहीतरी मुद्दा तर पाहिजे . तेव्हा आमच्या सर्वसमावेशक राजकीय विचारसरणीला साजेसा असा उपोषणाचा विषयसुद्धा सर्वव्यापी ठेवण्यात आला . तालुक्याच्या गावापर्यंत पक्का रस्ता, कांद्याचे भाव या लोकल मुद्द्यांपासून  ते जगातिक आर्थिक संकट , ग्लोबल वार्मिंग असल्या  ग्लोबल मुद्द्यांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यात घेण्यात आल्या . ठरल्याप्रमाणे उपोषणाच्या दिवशी दैनिक पिपानीचे पत्रकार हजर  झाले . मुलाखत सुरु झाली.  पण सुरुवातीलाच पत्रकाराने 'कलम ३७७ बद्दल तुमची भूमिका काय?' वगैरे अवघड जागचे प्रश्न विचारायला सुरुवात केल्यामुळे आम्ही पार बावचळून गेलो. तेव्हा मास्टर माईंड बंटी मालुसरे जीवा महाला सारखा धावून आला . पत्रकारानं लोकपाल  कायद्याबद्दल विचारलं तेव्हा बंटी म्हणाला 'भ्रष्टाचार ही  निव्वळ कायदेशीर बाब नसून ती  एक सामाजिक व सांस्कृतिक बाब आहे असा भाऊंचा विश्वास आहे.   केवळ ढीगभर कायदे करून भ्रष्टाचार नष्ट होणार नाही . भाऊ नेहमी म्हणतात  'If you have ten thousand regulations you destroy all respect for the law.'! पुढे कुठल्यातरी प्रश्नाला उत्तर देताना बंटी म्हणत होता, '… निर्णयक्षमतेचा प्रश्नच कुठे येतो. थेट लोकांनाच एसएमएस, ई मेल पाठवून कौल घ्यायचा . नुस्ती डेमोक्रसी नाही तर 'ई - डेमोक्रसी' हे भाऊचे लक्ष्य आहे!  
मुलाखत झकास झाली .
दुसऱ्या दिवशी  मुलाखतीची बातमी वाचावी म्हणून आनंदाने पेपर उघडला . पानामागून पाने चाळतोय पण बातमी काही सापडेना.  दैनिक पिपाणीने आमचीच पुंगी  वाजवली होती . बातमी छापायला दिलीच नव्हती. तावातावाने जाब विचारायला संपादकाकडे गेलो तर संपादक दुसऱ्याच पक्षाच्या एका वजनदार नेत्यासोबत वाटाघाटी करीत बसले होते . सगळा प्रकार आमच्या लक्षात आला . आमची इथे पण घोर फसवणूक झाली होती… . आता मात्र आम्ही पुरते हताश झालो . एव्हाना निवडणुकीच्या रिंगणात नेहमीचे जंगी लोक उतरले होते . अमाप पैसा आणि ताकत घेऊन उतरलेल्या ह्या लोकांसमोर आमची मोहीम पाला पाचोळ्यासारखी कुठल्याकुठे उडून गेली . आमचे नामोनिशाण कुठे राहिले नाही . नवीन पोस्टर्स ब्यानार्स सजू लागले होते. आमच्या मागेपुढे फिरणारे कार्यकर्ते आता यांचे झेंडे घेऊन मिरवू लागले … हे निवडणुकीचं खूळ डोक्यात घेतल्यापासून सगळीकडे आमची फजितीच होत चालली होती . सर्रकन डोळ्यासमोरून मागचे सगळे दिवस गेले आणि घोर निराशेने मनाला ग्रासले. खुळ्यासारखं मृगजळाच्या मागे धावत जाऊन आम्ही दिवाळखोरी तर  ओढवून घेतलीच होती पण सगळीकडे स्वतःचं हसं पण करून घेतलं होतं. आम्हाला स्वतःचीच प्रचंड कीव आली . भाऊ फकीर आपण फसलो. डोळ्यात पाणी आलं.
इतक्यात अर्जंट सांगावा घेऊन एकजण आला . पार्लमेंट वरून बोलावणं आलं होतं . डोळे  पुशीत आम्ही निघालो. पार्लमेंटवर सगळेजण तर जमले होतेच. पण कधी नव्हे ते मास्तर पण आले होते . मास्तरला पाहताच आमच्या अश्रुचा बांध फुटला . आम्हाला धीर द्यायला सगळेजण जवळ आले.  बंटी मालुसरेने हळुवारपणे आमच्या खांद्यावर हात ठेवला आणि एक भयानक गौप्यस्फोट केला,
'भाऊ आम्हीच  सगळ्यांनी मिळून  तुमची गेम केली!'
आता मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली.  काय बोलवं तेच सुचेना.  तेव्हा मास्तर पुढे सरसावले आणि म्हणाले,
'आमच्याच सांगण्यावरून झालं हे सगळं'.
 'मास्तर … तुम्ही !' कानावर विश्वासच बसत नव्हता .
 'होय आम्हीच. या राजकारणाच्या नादी लागून तू पार घरदार बुडवायला निघाला होतास. अर्ध्या हळकुंडानंच पिवळा झाला होतास तू ! अरे, करतूद करणाऱ्याकडं  सत्ता आपल्या पायानं चालत येत असते … राजकारण करावं आपल्यासारख्यानं, पण ते आधी स्वतःचं घरदार सांभाळून.  पण तू असा घरदार वाऱ्यावर  टाकून अन गुडघ्याला बाशिंग बांधून नेतेगिरीचे स्वप्नं बघायला लागला म्हणल्यावर आमच्याच्यानं रहावलं नाही बघ…  या आंधळ्या वेडापायी देशोधडीला लागलेली काय कमी पोरं पाहतोस तू रोज ?  तुला वेळीच सावरलं नाही तर तुझी तीच गत होणार हे दिसत होतं आम्हाला.  म्हणून तुला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही हे सोंग रचलं.'
'म्हणजे मग सगळा झालेला खर्च , विकलेली जमीन … '?
"काही कुठे गेलं नाही . ते सगळं या सोंगाचाच एक भाग होतं. आता तरी थाऱ्यावर ये पोरा!  काढून टाक हे खूळ डोक्यातून… "
असं म्हणून मास्तरनं मायेनं हात पाठीवरून फिरवला आणि अंगात  होतं नव्हतं तेवढं सगळं बळ गळून पडलं . दोन्ही डोळे गच्च मिटून खाली बसकन मारली . खूप वेळानं मान वर काढून डोळे पुसले आणि  निर्धारानं सगळ्यांकडे बघून आम्ही शेवटची प्रतिज्ञा जाहीर केली,
"दोस्तहो! आता आपण ठरवलंय . आजपासून आपण राजकारणाच्या वाटेला चुकूनही जाणार नाही . भाऊ फकीर राजकारणातून कायमचा संन्यास जाहीर करीत आहे .आणि यावेळेस भाऊ खरंच सिरियस आहे !"






3 comments:

  1. sir it was awesome . had a glimpse of rular india . i could really feel tht i was part of tht culture . bohat badiya .....

    ReplyDelete
  2. Nice article... really awesome while reading!!!!

    ReplyDelete