Monday, 20 June 2011

तो

   
                                                         समुद्र त्याला फार आवडायचा. कधी मी एकटाच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो की हा मला हमखास भेटायचा. कुणास ठावूक कसा पण कुठूनतरी अचानक अवतीर्ण झाल्यासारखा माझ्या बाजूला येऊन उभा रहायचा. आणि समुद्रात थेट दूरवर बघत बोलायला लागायचा.स्वतःशीच बोलल्यासारखा. त्याचा आवाज ऐतिहासिक असावा तसा, मंदिराच्या गाभ्यात घुमल्यासारखा खोल, गंभीर आणि गूढ असायचा.तो दूर क्षितिजाकडे बघून बोलत असला की त्याचा पांढराशुभ्र लांब सदरा वाऱ्यावर फडफड  उडायचा.आणि हा बेफिकीरपणे संपूर्ण पृथ्वीवर एकटाच अस्तित्वात असल्यासारखा एखादं स्वगत बोलल्यासारखा सांगायचा,
"समुद्राचं अन माझं खूप जुनं नातं आहे. खूप युगांचं. या इथे आम्ही लाखो वर्षे एकत्र राहिलोत...समुद्र तेव्हाही एकटाच होता...समुद्र आजही एकटाच आहे."
तो असा बोलायला लागला की तो खूप प्राचीन आणि तेवढाच दिव्य भासायचा. समुद्रा इतकाच  धीरगंभीर वाटायचा.
मी त्याची नजर होती तिकडे दूर क्षितिजाकडे पाहिलं. तो बोलतच होता.
"तेव्हा इथे कुणीच नव्हतं.ही झाडं नव्हती,हे पशुपक्षी नव्हते, मनुष्यप्राणीपण नव्हते. अथांग पसरलेला हा एकटाच होता...."
मधेच थोडावेळ हरवल्यासारखा तो गप्प राहिला आणि वर आकाशाकडे पहात म्हणाला,
"....त्याचं चंद्रावर खूप प्रेम होतं. तेव्हा आम्ही फार कमी लोक होतो इथे. ही दोघं बराच वेळ बोलत बसायची. दूर...त्या तिथे. पण मग एके दिवशी चंद्र त्याला सोडून खूप दूर निघून गेला. खूप दूर. करोडो मैल.....तेव्हापासून समुद्र असा एकटाच आहे. नंतर तो कधीच कुणाशी बोलला नाही. आजपर्यंत तो तसाच मौन आहे.त्याच्या अगणित किनाऱ्यांवर कित्येक संस्कृत्या उपजल्या,बुडाल्या. कित्येक लढाया झाल्या. कितीक प्रेमी त्याच्याजवळ आपली कथा सांगून रडले...कित्येक तारकांनी त्याच्याशी सलगी केली. पण हा नंतर कधीच बोलला नाही.

"करोडो वर्षांपासून हा असा एकाकी,निरपेक्ष,मौन राहिला.इतक्या मनस्वीपणे की मग तो एक तत्त्वच बनून गेला....नंतर जीवसृष्टी आली.वनस्पती,प्राणी,पक्षी आले.पण या सगळ्यांवर समुद्राचा खूप प्रभाव होता.सगळ्यांची नाळ अजून समुद्राशी जुळून आहे.तत्त्व बनून तो इथल्या प्रत्येकच गोष्टीत  भिनलाय.त्याच्या आदिम भरती-ओहोटीचे प्रतिबिंब प्रत्येक प्राणीमात्रात उतरलंय.... तीच लय.तेच नृत्य...
तुमचा श्वाशोच्छ्वास, तुमच्या हृदयाचे ठोके,तुमच्या चक्रीय शरीरक्रिया,स्त्रियांचे मासिकधर्म, संभोगाच्या उत्कट क्षणी होणाऱ्या शरीराच्या हालचाली.....तीच लय,तेच नृत्य...
निसर्गाचे ऋतुचक्र, जीवसृष्टीचे जन्म-मृत्यू, संस्कृत्यांचा उदय-ह्रास,अणू-रेणूंची कम्पणे...पौर्णिमेला भरतीनुसार उतू जाणारे वेड....तीच लय,तेच नृत्य..." 
"चंद्र त्याला सोडून दूर निघून गेला.पण असं दूर जाऊन कुणी कुणाचं प्रेम नष्ट करू शकतं थोडीच? रात्र रात्र हा चंद्राकडे बघत राहायचा.आणि मग पौर्णिमेला चंद्राचं पूर्णरूप  पाहिलं की त्याला गहिवरून यायचं. त्याचा अणु न रेणू घुसळून निघायचा.त्याला भरून यायचं . उंच उंच लाटांनी एकदाचं त्याला कवेत घ्यावं अशी उर्मी दाटून यायची.....पण चंद्र खूप दूर निघून गेला होता. आता समुद्र एकटाच आहे."
त्याचं हे ऐकत असताना समुद्राचं वैश्विक एकलेपण माझ्या अंगावर येत गेलं. हे असं युगानुयुगे अजस्र अस्तित्त्व घेऊन आणि उरात  गूढगहन  रहस्य दडवून  काहीच  न बोलता रहाणं....असं वर्षानुवर्षे नुसतं अस्तित्त्वात असण्याचा अर्थ काय?
समुद्राच्या असण्याचं प्रयोजन काय?.त्याचं ते समुद्राचं जगद्व्यापी विवरण माझ्या मेंदूच्या चिमटीत येत नव्हतं.  मी गोंधळून गेलो.
तो शांतपणे  तसाच दूर क्षितिजाकडे एकटक पहातच होता.
एकाएकी मला वाटलं हा स्वतःच तर समुद्र नसेल???
हा प्रश्न जसा माझ्या मनात उठला तसं त्याने पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं.जणू माझ्या मनातला प्रश्न त्याला न सांगताच कळला होता.त्याचे अथांग डोळे....त्या गहणखोल नजरेने त्याने एकवार माझ्याकडे पाहिलं आणि नजर समुद्राकडे वळविली,थेट समुद्राच्या डोळ्यात जणू.
एक खिन्न छटा हास्याची त्याच्या चेहऱ्यावर उमटली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच तो अंतर्धान पावला. 



1 comment:

  1. Your styles always reminds me the accent of Bhalchandra Nemade.

    ReplyDelete