Wednesday, 17 August 2011

गांधीजींचे 'चौथे' माकड


काल  मला  एक  विलक्षण  स्वप्न  पडलं . 
रात्री  माझ्या  स्वप्नात  बापूजी   आले . 
बापूजी  सारखं  काहीतरी  शोधत  होते .
मी  म्हटलं, "बापू  काय  चष्मा  शोधताय  की  काय?  तो  काय  तुमच्या  डोक्यावरच  आहे  की"!! 
बापू  म्हणाले, " नाही  रे  फकिरा!  मी  काहीतरी  दुसरंच  शोधतोय ..." आणि  पुन्हा  इकडेतिकडे  शोधायला  लागले .
मी म्हटलं ,   "बापू , अहो  सांगा  तरी  काय  शोधताय  ते. मी  मदत  करीन  तुमची  सापडून  द्यायला  " 
मग  बापूंनी  नजर  वर  करून  माझ्याकडे  पाहिलं . त्यांच्या  चेहऱ्यावर  आशा  जागी  झाली . बापू  माझ्या  दिशेने  जवळपास धावतच  आले  आणि  म्हणाले,  "खरंच ? खरंच  शोधून  देशीन  मला ?"
स्वप्नात  बापूच्या  चेहऱ्यावर  तेवढा  उजेड  दिसत  होता.  बाकी  सर्वत्र  अंधार  होता . पण  तेवढ्या  उजेडातही  बापूच्या  दातांच्या  फटीतून  'खरंच'  म्हणण्यात  मला  एक  वेडाची  झलक  दिसली .
मी  जरा  आश्वासक  सूर  धारण  केला  आणि  विचारलं ,
"काय  हरवलय  बापू?" 
पुन्हा  अस्वस्थपणे  इकडेतिकडे  पाहत  बापू  मला  म्हणाले, 
"अरे,  माझं  चौथं  माकड  हरवलय  रे ..."
मी  चक्रावून  गेलो 
"अहो  बापू  असं  काय  करताय?  तुमची  तीनच  माकडं  नव्हती  का ? एक  डोळे  बंद केलेलं , एक  कान  बंद  केलेलं , आणि  एक  तोंड  बंद  केलेलं ?
"नाही  रे.  मला पक्कं आठवतंय . माझं  एक  चौथं  माकड  पण  होतं ...कुठे  हरवलय  कोण  जाणे?" 
आणि  असं  म्हणून  बापू  पुन्हा  इकडे -तिकडे  अस्वस्थपणे  भिरभिरत  शोधायला   लागले .
मला  शंका  आली  बापूंना   काही  वेड -बीड   तर  लागलं  नाही  ना ? 
मी  ठरवलं  की  आपण  बापूंची  मदत  करायची . मी  बापूंचा  हात  धरला  आणि  म्हटलं  ,
"बापू , चला  आपण  त्या  चौकात  जाऊ ,तिथे  काही   लोक  जमलीत . आपण  जाऊन त्यांना  विचारू .त्यातल्या   कोणीतरी नक्कीच  चौथे  माकड  पहिले  असेल ".
बापूंना लहान मुलासारखा आनंद झाला.
आम्ही दोघे चौकात गेलो.
तिथे धूसर उजेड होता आणि भयाण शांतता होती.
माणसांच्या काही आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या. पण आवाज कशाचाच होत नव्हता.
मी अजून जवळ गेलो...आणि माझं रक्तच थिजून गेलं.
यातल्या कुठल्याच माणसाला चेहरा नव्हता...
बापूंना हाताशी धरून मी धिटाईने एकाला विचारले,
"का हो! तुम्ही चौथं माकड पाहिलंत का?"
माझा प्रश्न ऐकून तो बिन-चेहऱ्याचा माणूस काहीच बोलला नाही. फक्त त्याने बोट दुसऱ्या एका माणसाकडे दाखवले. ही सगळी माणसे सारखीच दिसत होती!
त्याच्याजवळ जाऊन  मी त्यालाही  तोच प्रश्न केला.
"का हो! चौथं माकड पाहिलंत का?"
प्रश्न ऐकून हा माणूस एकदम रडायला लागला. मी आणि बापू  गोंधळून गेलो. त्याने रडतरडतच तिसऱ्या एकाकडे बोट दाखवले.
त्याच्याकडे जाऊन मी पुन्हा प्रश्न केला.
प्रश्न ऐकला आणि हा माणूस मोठ मोठ्याने हसायला लागला.
मी आणि बापू त्याच्या हसण्याने दचकून गेलो. लगबगीने आम्ही तिथून निघून दूर, एका घोळक्याकडे गेलो.
तशीच बिना चेहऱ्याची माणसे.
मी पुन्हा तोच प्रश्न केला,
"का हो! तुमच्यापैकी कुणी चौथं माकड पाहिलंय का?"
एकजण बोलला आणि कुत्सितपणे म्हणाला,  
"चौथे माकड होय?  हुं.....ते गेलं पळून. बाकी तिघांची दुर्दशा बघून त्याने पळ काढला. काही बोलायचं नाही, ऐकायचं नाही, बघायचं नाही.....गेला पळून !ह्याच दिशेने गेला बघा."
त्याच्यानंतर  दुसरा बोलला .दोन्ही हात जोडून म्हणाला,
"नमस्कार बापू! तुमचे चौथे माकड आम्हाला चांगले ठाउक आहे. ते आता आमचे नेते आहेत. हो,थोडं पोट सुटलंय त्यांचं आता, पण बापू,त्यांच्यासारखा थोर जगात कुणीच नाही. आता चौकात  तुम्ही त्यांची लाईफ साईझ पोस्टर्स पहिलीच असतील.गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं  काहीही काम असू द्या, ते नक्की करतील याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. अहो, अख्खी सत्ता शेपटात गुंडाळून फिरतात ते!....पण बापू,यंदाच्या निवडणुकीत तुमचं मत मात्र त्यांनाच पडायला हवं बरं का?  ख्या ख्या ख्या  !"
त्याच्यानंतर  तिसरा बोलला.हा सारखा सिग्रेट पीत होता.
“चौथे माकड  ना? . Oh i see! I know him. तो  गेला . I mean he has left this country for good. You know this country is going to dogs... मी  पण  देश  सोडतोय  लवकरच ” असं म्हणून त्याने जळालेलं थोटूक दूर भिरकावून दिलं.
मी  बापूंच्या   चेहऱ्याकडे  बघायचं  टाळत  चौथ्याकडे वळलो. 
तो  मला   दुर्लक्षित  करून  थेट  बापूंकडेच   बघत  म्हणाला ,
“केम  छे  बापू ? ते  चौथे  माकड  ने ? ते  धंद्यामंदी लय  मोठा  झ्याला . बेज्या मोठ्ठा! आता  ते  मोठ  मोठे   MNCs चलावते . तुमचा  ते  tribal  लोकांचे  जमीन  घेते  अन  मोठेमोठे  प्लांट  उभे करते ...तुमचा  सरकारला  इलेक्शनमंदी  finance करते ...अन  मोठ्या मोठ्या   २७   मंजीली   घरात   राहते  . तेच्या  एकदम  च्यांगला  झाला बापू .हे  हे  हे !”
त्या  चौथ्याला  बाजूला  सारीत  पाचवा माणूस  धाडदिशी  समोर  आला  आणि  म्हणाला ,
“ ए  बापू , तेरा  चौथा  माकड  अभी  भाई  बन  गयेला  है . बोले  तो  एकदम  बडा  डॉन ! अभी  वो  दुबई  से धंदा करता  है . इधर  का  पूरा सट्टा  मार्केट , स्मगलिंग, match fixing  पूरा  देखता  है ...सुप्पारी भी लेता है .तेरा  कुछ  सेट्टिंग  होयेगा  तो  बोल ..”
अजून  कोणी  बोलायच्या  आत  बापूंनीच  माझ्या  हाताला एक  हिसका  दिला  आणि  म्हणाले, 
"आधी  इथून  निघ" .
आम्ही  जात  होतो  तोच   अजून  एक  तसाच  बिन  चेहऱ्याचा  माणूस  आम्हाला  सामोरा  आला .
त्याच्या  आवाजात  नम्रता  होती . तो  म्हणाला ,
"बापू , तुमचं  चौथं  माकड  पण  तुमची  गांधी  टोपी  घालतंय . देशात  भ्रष्टाचाराविरुद्ध  जनमत  जागवतंय   . तुमच्यासारखीच  आंदोलने  करतंय  ...आणि  तुमच्यासारखच  अटक पण  होतंय ."
पहिल्यांदा  बापूंच्या  चेहऱ्यावर  मी  तिरस्काराशिवाय  एखादी  भावना  पहिली .
आनंद , व्याकुळता , अभिमान , हताशपणा..... बापूंच्या  डोळ्यात  पाणी  तरळलं .
एक एक शब्द मोजीत बापू  म्हणाले,
“ नथूरामांना  आता  अजून  एकदा  पिस्तुलं  तयार  ठेवा  म्हणावं ”
आणि एवढं  बोलून  उद्वेगाने   बापू  पुढे  चालू  लागले .
चौकापासून  खूप  दूर  एका   भेसूर  दिसणाऱ्या  झाडाच्या  पारावर  कुणीतरी  एकटच  मान  खाली  घालून बसलं  होतं . तिथून  अस्पष्टसे    हुंदके  ऐकू  येत  असल्यासारखं  मला  वाटलं .
अभावितपणे  मी  बापूंचा  हात  ओढीत  तिकडे  चालायला  लागलो .
ती  एक  वृद्ध  स्त्री  होती ! जुनकट  आणि  बिनचेहऱ्याची.   
बापुपासून  नजर  चोरत  तिने  पदर  तोंडाला  लावला .
डोळे  पुसायच्या  निमित्ताने  ती  बापूंना  चेहरा  दाखवायचं  टाळत  होती .
पदराआड तोंड लपवून तिच्या  थकल्या  वृद्ध  आवाजात ती  बोलायला लागली,
"बापू , तुमचं  चौथं  माकड  मला  माहित  आहे . खूप  वर्षे  ते  इथे  होतं . उणीपुरी  साठ  वर्षे  आम्ही  संसार  केला . ही  जी  सगळी  बिना  चेहऱ्याची  प्रजा  तुम्ही  बघताय  ती  आमच्या  दोघांचीच  संतती  आहे . पण  चौथं माकड  कुठे  गेलं  मला  काहीच   ठाउक  नाही  बापू ....." एक  हुंदका  देऊन  पुन्हा  निर्धाराने  ती  बोलली, 
 "असो  ते  कधीतरी  जाणारच  होतं ”
सुन्न  शांतता   पुन्हा  पसरली.
मी  विचारलं ,
"बाई  तुझं   नाव  काय ?"
बापुंपासून  अजूनच  तोंड  झाकत, अत्यंत  खजील  आवाजात  ती वृद्ध स्त्री म्हणाली, 
"माझं  नाव  लोकशाही !"

बापू , मी ,  तो   चौक ... सगळेच  स्तब्ध  झाले .... स्मशान  शांतता पसरली .
सगळी  बिनचेहऱ्याची  माणसे  आमच्या  भवती  गोल  रिंगण  करून  गोळा  झाली .
बापू  पुतळ्यासारखे  खिळून  निश्चल  उभे  राहिले  होते .
आणि  आता  अंधार   चहुबाजूंनी  आमच्या  जवळ  जवळ  सरकत येत चालला होता .




Tuesday, 2 August 2011

काल एक चमत्कार झाला!

काल एक चमत्कार झाला! 
तीन महिन्याची बाळं सहसा बोलत नाहीत...सहसा म्हणजे काय बोलतच नाहीत, पण माझी तीन महिन्याची मुलगी मला बोलली!
अहो नाही, तुम्ही म्हणता तसं डोळ्यातल्या हावभावांनी वगैरे नाही हो! चक्क  मोठी माणसं बोलतात तस्स बोलली!!!
म्हणजे त्याचं असं झालं बघा, मी आपला रात्री उशीरापर्यंत कुठलसं पुस्तक वाचत बसलो होतो.... साधारणतः रात्री दोनचा सुमार असेल.... बाळ अशी  माझ्या बाजूला झोपली  होती.... आणि मला अचानक खुदकन हसण्याचा मोहक आवाज ऐकू आला!  आता झोपेत लडिवाळ हसण्याचे बायकोचे दिवस राहिले नाहीत हे मला ठावूक आहे. मग हसतंय कोण म्हणून पाहिलं तर माझी मुलगी माझ्याकडे बघून खुदुखुदू हसत होती.
तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहून मला वाटलं की हिला आताच बोलता आलं तर किती छान होईल!
कधी कधी जीभेवर सरस्वती का काय विराजमान होते म्हणतात ना,तसं झालं बघा! मी परत पुस्तकात डोकं खुपसतोय इतक्यात पुन्हा मला हसण्याचा आवाज आला आणि त्यापाठोपाठ चक्क बाळाचे बोल ऐकू आले-
" काय वाचतोयस रे बाबा इतकं? माझ्याशी पण बोल की जरा" !
क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. पण खरंच ती मला बोलत होती. अगदी अस्खलित शब्दात ती माझ्याकडे बघून बोलायला लागली.
"असं दचकतोयस  काय रे बाबा?  मी बोलू शकते याच्यावर विश्वास नाही ना बसत? पण मी खरंच बोलतेय. तू स्वप्नात वगैरे नाहीस. ते स्वतःला चिमटा वगैरे घेऊन बघतोयस ते बंद कर.
....आता तुला मी सांगते की मला असं बोलणं का भाग पडतंय. बाबा,आवश्यक होतं रे. त्याचं कायै, मी थोडी confused आहे सध्या.... हसायला काय झालं? छोटी बाळं confuse होऊ शकत नाहीत का?... तुला सांगते बाबा,अरे, उलट आम्हा newcomers चे  tensions तुम्हा आई-बाबांपेक्षा जास्त आहेत.
त्यात मी मुलगी. म्हणजे मला तर जन्मायच्या आधीपासूनच tension! बरं जन्मल्यानंतर सुखी म्हणावं तर ते तरी सोपं दिसतंय का?. अरे काय काय चालू असतं हल्ली आपल्या देशात! ...श्ह्या! मला तर बाई पश्च्चात्तापच  होतोय इथे जन्माला आल्याचा!
....बरं हे जन्माला येणं तरी सुखाचं होतं म्हणतोस की काय? तू काय सांगत होतास ना एका मित्राला की तू कुठल्याशा परीक्षेला चार वेळा बसलास, अरे मी तुला सांगते, मागच्या सहा महिन्यात मी पाच वेळा जन्म घेतलाय! प्रत्येक वेळी मी मुलगी आहे म्हणून मला जन्म नाकारला गेला. तू जरा भला माणूस आहेस, त्यातून थोडा शिकला सवरलेला आहेस, शिवाय मी तुझं पहिलं बाळ नं....आले जन्माला!
.....खोचक बिचक नाही रे, हे असंच आहे बघ. पाहिलं बाळ असलं ना की आनंदाने "मुलगी काय मुलगा काय आम्हाला सारखेच" असं म्हणून मुलीला जन्माला घालतात. पण दुसरीसुद्धा मुलगीच होणार असेल तर मात्र बरोबर क्लिनिक मधे जाऊन 'आधी सोनोग्राफी मग एम्.टी.पी.' असा रीतसर कार्यक्रम उरकून घेतात.
तू असशील रे डॉक्टर-बिक्टर पण मला या गोष्टींचा  'याचि देहि याचि डोळा' अनुभव आहे म्हणून सांगते. नेमकं तिसऱ्या महिन्यात मला ultra -sound waves चा कर्ण कर्कश्श आवाज ऐकू यायचा.आणि माझं काळीज धड धड करायचं. आणि मग काही दिवसात TERMINATE !
यावेळेस तर मी आशाच सोडून दिली होती. But you see I am here ,ALL ALIVE !
बरं ते सोड, मुद्द्याचं बोलू... तर मी तुला काय सांगत होते...हं, की मी थोडी confused आहे!
....नाही रे, तसलं existential confusion वगैरे नाही, साधा आपला logical dilemma आहे...म्हणजे बघ आता मी जन्माला आले म्हणून तू एवढा कौतुक सोहळा वगैरे केलास, 'जन्मले एकदाची' म्हणून मला पण बराच आनंद वगैरे झाला...पण बाबा मला आता वाटायला लागलंय की खरंच Is this world a safe place to be in ?
.....कालचाच न्यूजपेपर बघ की-   आंतरराष्ट्रीय बातम्याचं पान बघ- सिरियातील गोळीबारात ४५ आंदोलक ठार, इराक मधील आत्मघातकी स्फोटात १२ जण ठार, जगाच्या दारावर पुन्हा मंदीची थाप...शिवाय अफगाणिस्तान, कोरिया, ग्लोबल वार्मिंग,दहशतवाद हे रोजचं स्टफ.... आता राष्ट्रीय बातम्याचं पान काढ  - बिहारमध्ये माओ वाद्यांनी दोघांची हत्या केली, त्रिपुरामध्ये ग्रामस्थांचा B.S.F. कडून छळ....आणि बाकी कलमाडीचं स्मृतीभ्रंश , अण्णा हझारेंचा लढा, येदियुराप्पाचा शिरजोरपणा, ए राजाची तिरंदाजी हे रोजचं...आता तुझा पुरोगामी महाराष्ट्र बघ- बुलढाण्यात  एका C.E.O. ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.....पुढे अजून काही सांगण्याची गरज आहे का?
हा झाला एका दिवसाचा पेपर....काय? एवढं पेज नंबरसहित कसं लक्षात राहिलं म्हणतोस? अरे मेमरी strong आहे माझी....आईवर गेलेय नं! 
चल एकवेळ आपण जगाचं  सोडून देऊ, पण individual life तरी कुठे सोपं राहिलंय? अरे competition किती भय्यंकर आहे हल्ली आणि survival साठी struggle करता करताच आयुष्य हातचं निघून चाललंय की.... म्हणायला मी एक अख्ख आयुष्य घेऊन आलीय पण ह्या सगळ्यात धावता धावता नेमकं तेच आयुष्य जगण्याची उसंत तरी मला भेटणार आहे की नाही.....बाय द वे यावर्षी इंजिनीरिंगचि admissions कितीला क्लोज झालीय रे ?
आणि नुसता intelligent वगैरे असून तरी  कुठे भागतय? वरतून पुन्हा पैसे लागतातच.
ए बाबा, आपण गरीब आहोत की श्रीमंत? खजील नकोस रे होऊ. कायै की top वर असल्याशिवाय कुणी विचारतच नाही... घुमवून फिरवून गोष्ट तिथेच येते. आता तो सिनेमा नाही का... 'तारे जमीन पर'... शेवटी त्यात पण काय दाखवलय, तो मुलगा top पेंटिंग बिंटिंग  काढतो तेव्हाच त्याला recognition मिळतं की नाही? आणि तेच त्याला काहीच येत नसतं  आणि नुसतीच त्याला learning disability असती तर? झाला असता तो हिरो? निघाला असता त्याच्यावर चित्रपट?..बाबा, मी पण समजा कुठल्याच क्षेत्रात extra -ordinary निघाले नाही तर...avarage लोकांना खरच काही स्थान नाही का रे बाबा या जगात ? त्यात पुन्हा तू तर खेड्यापाड्यात settle व्हायचं म्हणतोयस म्हणजे आमचं तर करियरच बोम्बललं!
.....अच्छा! ते चित्रपटाचं मला कसं माहीत म्हणतोस? अरे तेव्हा मी पोटात होते ना! का बरं ? अभिमन्यू पोटात राहून चक्रव्युव्ह भेदायचं लक्षात ठेवू शकतो मग  मला काय साधी पिक्चरची  स्टोरी पण लक्षात राहू नये काय?.... आणि थांब मधेच लिंक तोडत जाऊ नकोस अशी... 
.....ही धावपळ पण कशी चाललीय बघ ना, आधी शिक्षण, उच्च शिक्षण, मग नोकरी, लग्न, घर, गाडी,EMI ,savings,... सगळेच कसे आपण जणू eternity पर्यंत जिवंत राहणार आहोत अशा धुंदीत जगल्यासारखे जगत आहेत , जे जगून घ्यायचे त्या एक-एका क्षणाची value कोणी ठेवीतच नाही.जणूकाही.....बाबा?...ऐकतोयस ना? का झोपलास?
थोडी philosophical वगैरे sound करतेय ना मी? सहा महिन्यात पाच वेळा जन्म घेणारा कुणीही philosopher बनेल.
Good for me ! बाबागिरीत काय सोल्लिड करीअर बनेल नं? 
ए बाबा, नाहीतर आयडीया! तूच का रे नाही बाबा-बिबा होत? नाहीतरी तू काहीतरी career-crisis वगैरे बोलत होतास नं मघाशी फोनवर...
काय धम्माल होईल नाही! पैसा,फेम,पावर सगळच मिळतं. अरे चक्क नट्या लग्नाची ऑफर टाकतात बोल! काय म्हणतोस? घाबरू नकोस आई झोपलीय!
.....अरे हो! आई उठायच्या आत मला तुझ्याशी सगळं बोलून घ्यायला हवं. मला बोलताना बघितलं तर shock मधेच जाईल बिचारी!  बाकी काही नाही रे बोललं की मन मोकळं होतं म्हणे. तसा तू काही टिपिकल 'male chauvinist pig' नाहीस खात्री आहे मला, पण कुणास ठाऊक उद्या तू बदलशील... जरा मी कॉलेजात जायला लागले की 'असले  कपडे घालू नको, तसली फ्याशन करू नको' टाईप फंडे झाडशील.... मुलगी आहे नं मी.....सेंटी नाही मारत रे, सेंटी मारायला मी काही आई नाही!
....मी बघ आपले doubts बोलून दाखवले. तसं उत्तरांची अपेक्षा मला नाहीच. पण आज मी prejudiced नाही . कोरी पाटी आहे तोवर बोलून दाखवते... उद्या मी तू घडवशील तशी घडेल तुझ्या 'हो' ला 'हो' आणि 'नाही' ला 'नाही' म्हणायला लागेल....I may not be so lucid tomorrow ...शिवाय  'life adds to confusion' (म्हणतात). आणि माझी तर सुरुवातच कन्फ्युजनपासून आहे! माझी एकटीचीच नाही, आम्हा सगळ्याच नव्याने जन्मलेल्या बाळांची ! काय गम्मत आहे नं!
अरे एवढा काय गंभीर झालास? मी काही concrete उत्तरं मागत नाहीये तुझ्याकडे. मला माहित आहे ती कुणाकडेच नाहीत. असती तर तू स्वतः आज एवढा confused नसतास. so chillaxx ! नाहीतरी लोक म्हणतातच 'पोरगी बापावर गेलीय' म्हणून!
बाप रे! आई उठतेय वाटतं. चल आता मी झोपते. बाकी गप्पा मी मोठी झाल्यावर करू ...अरे एक राहिलंच की, बाबा माझं नाव कधी ठेवणार आहेस तू?  ठेव काहीतरी छानसं..... 














Thursday, 14 July 2011

"कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं "


१३ जुलै २०११
मुंबई 

कसाब-
"माझी दोन वर्षाची कमाई- 
माझ्या सुरक्षेसाठी या सरकारला बसलेला ४० कोटी भुर्दंड, आजचे ३ बॉम्ब स्फोट ,१७ बळी११० जखमी...Happy birthday to myself! अजून १०० वर्षे मी इथे राहायला तयार आहे!"

गृहमंत्री आर.आर. पाटील-
स्फोटानंतर ज्या पद्धतीने  चिदंबरम, NSG , NIA , यांनी बाह्या सरसावून हालचाली सुरु केल्या ते पाहून महाराष्ट्राचे  गृहखाते  केंद्राने  दत्तक  घेतले  की काय  अशी  शंका यायला लागली.
दरम्यान महाराष्ट्राचे स्वतःचे गृहमंत्री कुठे गायब झाले कुणाला काही पत्ता नाही. नागपुराहून येतो म्हटले आणि मधेच कुठेतरी तोंड लपवून बसले. बऱ्याच जणांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या,
'यावेळेस एखादा भारी डायलॉग सुचतो का म्हणून वेळ घेत असतील... ते मागच्या वेळेसचं  "बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है" जरा अंगलटच आलं होतं.' 
त्यांच्या निकटवर्तीयांनी  आणि विशेषतः गृहखात्याच्या बाबू लोकांनी "गेले आबा कुणीकडे?" म्हणून एकच टाहो फोडला.
काही उत्साही मंडळींनी तर पेपरातही जाहिरात दिली.
"आपण यांना पाहिलात का?
नाव- आबा पाटील
हुद्दा- गृहमंत्री म.रा. (महाराष्ट्र राज्य) 
वर्ण- सावळा (फारच प्रामाणिकपणे  बोलायचं ठरलं तर काळा) 
कमी उंची ( शरीराची आणि कर्तृत्त्वाचीही) 
मध्यम बांधा
सदरहू इसम काल झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हरवले आहेत. शोधून देणारास चव्हाण साहेब योग्य ते इनाम देतील" ( आणि आबांना काय द्यायचं याचं ते नंतर ठरवतील!)

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण -
परिस्थिती चव्हाणांच्या कॅबीनमधेही फार चांगली नसणार. आयुष्य south block च्या चकचकीत ऑफिसांमध्ये  आणि गुळगुळीत रस्त्यांवर गेलेलेआता मुंबईच्या गल्ल्यांमध्ये गचके लागले की त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. नेहमी दाताखाली सुपारी फोडत असल्यासारखा चेहरा करून बोलणाऱ्या चव्हाणांना सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच दाताखाली खडा आल्यासारखे वाटत असेल. 
'आषाढीला पंढरपूरच्या विठ्ठलाला "देवा मुंबईत स्फोट होऊ देऊ नको रे" एवढं मागायचा नेमका विसरलो आणि तेच मुळाशी आलं' असं राहून राहून त्यांच्या मनाला वाटत असेल.

अशोक चव्हाण- 
"सालं आडनावातच काहीतरी नाट आहे!"

 विलासराव देशमुख- 
                   २००७-           "मुख्यमंत्रीच रहावं की दिल्लीत जावं?"
                   २६-नोवेंबर -  "दिल्लीतच जावं!"
                   २००९-           "अवजड उद्योग सांभाळावे का पुन्हा मुख्यमंत्रीच व्हावे?"
                   २०११-           "छे छे! ग्रामीण  विकासत्यापेक्षा मुख्यमंत्रीच व्हावे."
                   १३ जुलै-       "मुख्यमंत्री नाही झालो तेच चांगले झाले. आपले विज्ञान तंत्रज्ञान खातेच बरे आहे!"

मेडिया 
"चला महिन्याभराची सोय झाली!" 

दिल्लीतील 'anti -अण्णा, anti - बाबागट  - 
हुश्श! आता काही दिवस तरी लोकांचे  लोकपाल बिलावरचे लक्ष जरा कमी होईल."

पाकिस्तान, चीन - (एका सुरात)- 
"आम्ही काही नाही केलं बरं!"

काही उत्साही कवी-

"नेमेचि येतो मग पावसाळा
पावसात घडती स्फोटांच्या माळा

मृत्यूचे थैमान पाहवेना डोळा
माणसांचे जीव जायपालापाचोळा 

मेडियासी मग गवसतो चाळा
पाहोनिया जन कापे चळचळा

दिल्लीत नेते भरवोणी शाळा
शेजाऱ्यांच्या नावाने काढिती गळा 

जुनेच हे प्रश्न तरी किती दिस घोळा
अकलेसि बसले का लावूनिया टाळा

असलिया सरकारा नेउनिया जाळा
श्वान पीठ खाय दळतो आंधळा"

मृत  
"सुटलो एकदाचे..."

Monday, 4 July 2011

जुन्या डायरीतलं एक पान - "सिग्रेट"

पुस्तकातून डोकं काढून वर बघितलं.खिडकीच्या काचाबाहेर आकाशाचा काळाभोर रंग बदलून निळसर होत आला होता. पहाट झाली. खुर्चीतून उठून खिडकी उघडली. थंड हवेच्या झुळूकीसोबत काही देशभक्तीपर गाण्यांचे सूर ऐकू आले. आज २६ जानेवारीचा दिवस होता. अंगावर कपडे चढवले आणि लांब एके ठिकाणी खास चहा पिण्यासाठी म्हणून मी रूममधून बाहेर पडलो. वातावरणात बरीच स्फूर्ती होती. पायातल्या चपलांकडे बघत मी पावले उचलीत होतो. डोक्यात डॉक्टर झिवागो घोळत होता. युरी,लारा,पाशा मेंदूत फेर धरून नाचत होते......हवेत चांगलीच थंडी होती.कॉर्नरजवळ आलो तसे गाण्यांचे आवाज अजूनच ऐकू येऊ लागले.
"ऐ मेरे वतन के लोगो..."
"मेरे देश की धरती सोना उगले ,उगले हीरे मोती"
२६ जानेवारी....लहानपणी हा दिवस म्हणजे किती धावपळ असायची! सकाळी प्रभातफेरी,पांढरा शर्ट हिरवी चड्डी घालून आम्ही सगळ्यात पुढे उभे राहायचो. नेकटाय,ईन शर्ट ,आईने एका हातात दोन्ही गाल पकडून चोपून पाडलेला भांग, पावडर, बूट, सॉक्स... सगळ्या गावातून प्रभातफेरी एक एक गल्ली करत पुढे जायची. मामा चौक,बुधवार पेठ,शुक्रवार पेठ,काळी पेठ... असं सगळ्या गावाला वेढा टाकून परत झेंडा चौक,पोलीस स्टेशन करीत बहिर्जी शाळेपर्यंत. गल्ल्यागल्ल्यांतून आम्ही घोषणा देत निघालो की लोक प्रभातफेरी पहायला जमायचे.ओट्यावरून,बाल्कनीतून,नळाच्या लाईनीतून....जुन्या गल्लीत दाराच्या गोणपाटी पडद्याआडून मूल कडेवर घेऊन बघणाऱ्या मुस्लीम बायका...सगळे कौतुकाने बघायचे.आम्हाला अजूनच चेव यायचा. घोषणा देऊन देऊन घसा बसला तरी आम्ही त्वेषानं सुरूच ठेवायचो-
"एक रुपैय्या चांदी का, देश हमारा गांधी का"
"पुढे चला रे पुढे चला,गांधीजी की जय बोला"
"बसमत हो या कोहिमा,भारत हमारी एक माँ"
"महात्मा गांधी ,अमर रहे"
१५-१६ वर्षांपूर्वी नेमका या वेळेला मी कुठे असेल?
प्रभातफेरीमध्ये सगळ्यात पुढे तिरंगा झेंडा हातात घेऊन बुधवार पेठेच्या रस्त्यावरून जात असेल की मामा चौकात रस्त्याच्या कडेने कौतुकाने बघणाऱ्या एखाद्या ओळखीच्याला  पाहून अजून मोठ्याने घोषणा देत असेल?

....आणि १५-१६ वर्षानानंतर नेमका या वेळेला मी आज या ठिकाणी दोन रात्रीचं जागरण डोळ्यावर घेऊन,भणभण डोक्यानं फकाफक सिगरेट पीत बसलो होतो. केस विस्कटलेले, दाढीचं खुंट वाढलेलं ,कपडे अस्ताव्यस्त, मागचा काही हिशोब नाही,पुढचा काही अंदाज नाही.
रूमवर परतून कपडे न काढता नुसताच डोळे उघडे ठेवून पलंगावर पडून राहिलो.डोळे जड पडत चालले .डोक्याखालची नागवी उशी कानावर घेतली अन पायाची पोटाशी मुटकुळी करून डोळे बंद केले तशी मला झपकन गुंगी आली.
जाग आली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते.  डोकं अजूनही भणभणत होतं. होस्टेलमध्ये सगळीकडे नीरव शांतता होती. उठून बसलो. डोकं चांगलंच दुखत होतं. दोन्ही हातांनी डोकं गच्च ठरून ठेवलं.नंतर तेच हात डोळ्यांवर जरावेळ दाबून धरले.जरा बरं वाटलं तसं मी हात खाली घेतले. आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून त्यांच्याकडे बघत बसलो. हातावरच्या रेषा, हातावरचे तीळ,बारावीला हात जाळून घेतल्याच्या खुणा... चंद्रपर्वतावर तीळ असला की माणूस आत्महत्या करतं म्हणे...ही सगळ्यात छोटी आहे ती आयुष्यरेषा...हुश...मी एक मोठा उसासा टाकला.टेबलाकडे समोर नजर गेली. 
सिगरेट! सिगरेट प्यावी!
झटकन उठून टेबलावर चाळाचाळ करायला लागलो.टेबलावर डाव्या बाजूला पुस्तकांची थप्पी होती. Text -books सगळ्यात खाली.वरती सगळी इंग्रजी नॉवेल्स- Doctor Zhivago, Men are from mars , psycho -analysis, Body Language, Five point someone, Emotional Intelligence...सगळ्यात वर डायरी! या थप्पीच्या बाजूला अस्ताव्यस्त पडलेल्या कागदांवर शुभदाने गिफ्ट दिलेली छोटीशी पिशवी, तिच्याखाली  लोकलची, BEST ची तिकिटे गजबजून पडलेली.टेबलावर ऐसपैस पसरलेलं DON'T QUIT चं पोस्टर. त्याच्या वर, खाली आडव्या तिडव्या स्केचेस काढून ठेवलेले काही,काही कोरे कागद, Mid Day चे एक दोन उघडे अंक. उजव्या कोपर्यात धुळीचा थर साचलेलं बिन-कवरचं medicine चं पुस्तक.त्याच्या बाजूला कुणीतरी फार आधी इथे विसरून गेलेल्या चाव्यांचा जुडगा,टेबलाच्या उघड्या सन्माईकवर धूळ धूळ. डाव्या कोपर्यात पिंजारलेला टूथ ब्रश आणि चुरागाळलेली टूथ पेस्ट.पाण्याची बाटली. धुळीत पाण्याच्या बाटलीमुळे उमटलेले अगणित गोल-गोल रिंग्स, एकमेकांत गुंतलेले, वाळून आता permanent झालेले.
सिग्रेट? सिग्रेट?
हां! Mid Day खाली एक सिगारेट सापडली. ती उलटी करून फिल्टरच्या बाजूने टेबलावर दोन-तीनदा आदळली. नंतर ओठात अलगद धरून ठेवली. अन  "माचिसमाचिस?"  म्हणून पुटपुटत टेबलावर इकडेतिकडे बघायला लागलो.
Medicine जवळ पडलेल्या सोपच्या फुटक्या पुडीजवळ AIM ची  माचिस सापडली. हातात घेऊन आधी ती दुसऱ्या बाजूने वळवून पहिली. पाठीमागे लिहिलं होतं,
" success is a capacity to go from failure to failure without losing your enthusiasm".
 माचिस उघडून बघितली. हत्. हिच्यात फक्त तीन जळलेल्या काड्या अन थोडी ash . बेफिकीरीने मी ती  माचिस टेबलावर फेकून दिली आणि दुसरी शोधायला लागलो.
Mid Day  उचलून बघितलं. एक दोन कोरे कागद......छे!
तिकिटांच्या गठ्ठ्यात एक  माचिस उभी पडलेली दिसली. पटकन उचलून मी उघडली. मध्ये तीन जळलेल्या कड्या अन थोडी ash ! पुन्हा तीच  माचिस उचलली होती!
यावेळेस काळजीपूर्वक मी ती माचिस टेबलाच्या उजव्या कोपऱ्यावर ठेवली अन मनात म्हटलं ,
"ही नाही"
नंतर ओठातली सिगारेट काढून हातात घेतली. सिगारेट जास्त वेळ ठेवल्यास ओठांना चिकटते.नंतर दोन्ही हातांनी खादीचे खिसे, प्यांटचे पुढचे मागचे खिसे चाचपून पहिले... नाहीच!
कपाटाकडे नजर गेली.झपाझप दोन ढांगात कपाटाकडे पोहोचलो.वरच्या,मधल्या,खालच्या फळ्यांवर पाहिलं. 
"इथेही नाही."
मग हँगरला लटकवलेले एकेक ड्रेस बाजूला करून पहिले. एक प्यांट...एक शर्ट... प्यांट...प्यांट-- ह्या प्यांटवर डाग कसला पडलाय? पुन्हा शर्ट...काय शोधतोय आपण?.....हां,  माचिस
"छ्या, इथं नाही."
सिग्रेटवाला  हात झटकून मी मागे वळलो. टेबलावर येऊन व्यवस्थित थप्पीतलं एक-एक पुस्तक बाजूला सारून बघितलं... माचिस... माचिस...तिकिटांच्या गर्द्यात चिवडून पाहिलं... माचिस... माचिस...पुन्हा DON'T QUIT, स्केचेसचे कागद, Mid Day उचकून पाहिलं.... माचिस.... माचिस....पेस्ट,ब्रश उगाच एका जागचा हलवून दुसरीकडे ठेवून त्या जागेकडे पाहिलं.... माचिस.... माचिस....उजवीकडे भिंतीच्या बाजूने टेबलावर बघत धुळीतल्या medicine कडे बघितलं..... माचिस..... माचिस....medicine , DON'T QUIT , चाव्यांचा जुडगा.....माचि....हांssss  सापडली!!!   
Reflexively हातातली  सिग्रेट  तोंडात  ठेवून  मी  झटदिशी   माचिस  उचलून  खर्रकन  उघडली........पुन्हा तीन जळलेल्या काड्या अन थोडीशी ash !!!
"च्याSSSयला !"
मी वैतागून ती डबी बंद केली अन आधी खिडकी उघडून ती माचीस रागाने बाहेर भिरकावून दिली. रागातच खिडकी खाडकन बंद करून चिडून एकदा सगळ्या टेबलाकडे बघितलं. एक पाउल मागे झालो अन अभावितपणे ड्रावरला हात घालून मी ते मागे ओढलं. नजर टेबलावरच. ड्रावरचा उघडताना खट्...घर्रर्र असं आवाज झाला तशी नजर ड्रावरकडे गेली. सरळ मधे....... माचिस!
एकदा खिडकीकडे अन एकदा टेबलावर बघत मी साशंकतेने ती माचिस हातात घेतली अन कानाजवळ नेऊन हलवून बघितली.
ही नवी होती.
एव्हाना सिग्रेट पुन्हा ओठांना चिकटली होती. सिग्रेट पेटवायला काडी ओढल्यावर भर्रर आवाज होऊन जाळ झाला अन धूर सरळ नाकात गेला. चेहरा बाजूला करून मी काडी थोडा वेळ लांब धरली आणि नंतर मान खाली वळवून ती जळती काडी सिगारेटच्या तोंडावर धरली.
सिग्रेट पेटली तसा काडीचा अन सिगरेटचा धूर सरळ वर चढत डोळ्यात गेला. डोळ्यात तीक्ष्ण चरचर झाली.दोन्ही डोळ्यातून लगेच टळकन पाणी आलं.
"च्यायला! काय त्रास आहे!"
मी काडीचा चटका बसायच्या आत ती दूर दरवाज्याजवळ फेकली. जरा वेळ डोळे बंद ठेवून लपलप करीत उघडले. गालावरचे अश्रू पुसले.डोळ्यांच्या कडा कोरड्या केल्या.आणि सिगरेटच्या जळत्या लाल टोकाकडे बघत एक दीर्घ कश घेतला. सगळा धूर छातीत घेताना मी डोळे मिटले अन तसाच जरा वेळ धूर मधे धरून ठेवला.
"काहीच विचार करायचा नाही"
डोळे उघडून मान वर करून छताकडे बघत सगळा धूर वर सोडला.
"काहीच विचार करायचा नाही"
  
    

Friday, 1 July 2011

जुन्या डायरीतलं एक पान- 'मोरपीस'



मोराचं पीस पुल्लिंगी असतं की स्त्रीलिंगी?
मोरपिसाचा रंग पाहिला.नीट डोळ्याजवळ घेऊन पिसाचा डोळा पाहिला.गालावरून, नाकावरून मोरपीस फिरवून पाहिलं...आणि माझं सगळं बालपण या मोरपिसावर अलगद येऊन बसलं. लहानपणी....शाळेत...वहीत...मोरपीस...
मोरपीस एवढ्या जवळून, एवढं सावकाश पाहिलं याआधी ते तेव्हाच.
मोरपीस जरासही बदलला नाही .
आपणच  खूप बदललो.

किती ठाशीव दिवस असायचे ते. शाळेतले. चौथीच्या वर्गातले. झाडाखालचे वर्ग. फांदीवर बांधलेली शाळेची घंटा. झाडाची फुलं. शाळेचा गणवेश. पाट्यांचे वर्ग. कवायत. गाणी. तळ्यात  -मळ्यात....मालनबाई.
त्या दिवसांना रूपरंग होता.
इथे सगळेच आकार ढासळत चाललेत. इतकी वर्षे जे लोक जाणवलेसुद्धा नाही  त्यांनाही crystal -cut आकार प्राप्त होत चाललेत.
अगदी आपल्या डोळ्यांखाली.

आणि आपण वरचेवर निराकार.. .. अजस्र वस्तुमान आणि आकारमान असलेला अमिबा. 

..तेव्हा कधी वाटलं होता का हे असं होईल म्हणून? मंगळवार पेठेत किरायाच्या घरात रहायचो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे सणांसारखे असायचे तेव्हा. 
दोन्ही हातात बक्षिसं, प्रमाणपत्र  घेऊन ,थकून पण आनंदी चेहऱ्यानं घरी धावत येताना, आईला भेटण्यासाठी....तेव्हा कधी वाटलं होता का हे असं होईल?
आई वाड्याच्या ओट्यावर वाट पहायची...आता तिलाही नीट दिसत नाही अंधार पडल्यावर.

मोरपीस कधीच म्हातारं होत नसतं
मोरपीस नेहमी चौथीतच जगतं 

...आणि आपणच असे मोठे होऊन स्वतःच्या मानगुटीवर बसतो.

Monday, 20 June 2011

ध्रुव ताऱ्याची गोष्ट

त्याच्याजवळ एक गोष्ट होती. ध्रुव ताऱ्याची. 
तो म्हणायचा हा ध्रुव काही तारा-बिरा नव्हता.तो एक असाच माणूस होता. सर्वांसारखा.
एकदा त्याला कुणीतरी त्याच्या हक्काच्या जागेवरून उठवलं...त्याने आपलीच म्हणून गृहीत धरलेल्या , निःशंक मनाने माया लावलेल्या जागेवरून उठवलं. आणि म्हटलं की ही  जागा तुझी नव्हतीच कधी.
मनस्वी तो.हे त्याला खूप लागलं. आणि मग तो एकटाच तिथून उठून खूप लांब निघून गेला. कुणालाच नं सांगता.
अशा एका जागेच्या शोधात जी सर्वस्वी,सर्वकाळ, विना-अट त्याचीच असेल.
तो गेला तशी इकडे शोधाशोध सुरु झाली.पण तो काही सापडलाच नाही कुणाला.
खूप दिवस लोटले.
असंच एके रात्री त्या नगरातल्या एका वेड्याला आकाशात उत्तरेला एक तारा दिसला. तेजस्वी. अढळ.
आणि तो वेडा त्या सगळ्या नगराच्या अंगावर शहारा आणील अशा तार सुरात ओरडला,
" तो पहा ध्रुव!"
वेडाने बेभान होऊन, अंगावरचे कपडे टराटरा फाडीत, नगरातल्या रस्त्या-रस्त्यावरून पळत तो सर्वांना सांगत सुटला,
"पहा,पहा तो! तो ध्रुव आहे!"
सगळं नगर गावाबाहेरच्या पटांगणावर तो तारा बघण्यासाठी जमलं.
आणि त्यांनी त्या ताऱ्याला नाव दिलं  " ध्रुव तारा".

मग एक निःश्वास टाकून तो सांगायचा,
"ध्रुव काही तारा-बिरा नव्हता"

तो

   
                                                         समुद्र त्याला फार आवडायचा. कधी मी एकटाच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो की हा मला हमखास भेटायचा. कुणास ठावूक कसा पण कुठूनतरी अचानक अवतीर्ण झाल्यासारखा माझ्या बाजूला येऊन उभा रहायचा. आणि समुद्रात थेट दूरवर बघत बोलायला लागायचा.स्वतःशीच बोलल्यासारखा. त्याचा आवाज ऐतिहासिक असावा तसा, मंदिराच्या गाभ्यात घुमल्यासारखा खोल, गंभीर आणि गूढ असायचा.तो दूर क्षितिजाकडे बघून बोलत असला की त्याचा पांढराशुभ्र लांब सदरा वाऱ्यावर फडफड  उडायचा.आणि हा बेफिकीरपणे संपूर्ण पृथ्वीवर एकटाच अस्तित्वात असल्यासारखा एखादं स्वगत बोलल्यासारखा सांगायचा,
"समुद्राचं अन माझं खूप जुनं नातं आहे. खूप युगांचं. या इथे आम्ही लाखो वर्षे एकत्र राहिलोत...समुद्र तेव्हाही एकटाच होता...समुद्र आजही एकटाच आहे."
तो असा बोलायला लागला की तो खूप प्राचीन आणि तेवढाच दिव्य भासायचा. समुद्रा इतकाच  धीरगंभीर वाटायचा.
मी त्याची नजर होती तिकडे दूर क्षितिजाकडे पाहिलं. तो बोलतच होता.
"तेव्हा इथे कुणीच नव्हतं.ही झाडं नव्हती,हे पशुपक्षी नव्हते, मनुष्यप्राणीपण नव्हते. अथांग पसरलेला हा एकटाच होता...."
मधेच थोडावेळ हरवल्यासारखा तो गप्प राहिला आणि वर आकाशाकडे पहात म्हणाला,
"....त्याचं चंद्रावर खूप प्रेम होतं. तेव्हा आम्ही फार कमी लोक होतो इथे. ही दोघं बराच वेळ बोलत बसायची. दूर...त्या तिथे. पण मग एके दिवशी चंद्र त्याला सोडून खूप दूर निघून गेला. खूप दूर. करोडो मैल.....तेव्हापासून समुद्र असा एकटाच आहे. नंतर तो कधीच कुणाशी बोलला नाही. आजपर्यंत तो तसाच मौन आहे.त्याच्या अगणित किनाऱ्यांवर कित्येक संस्कृत्या उपजल्या,बुडाल्या. कित्येक लढाया झाल्या. कितीक प्रेमी त्याच्याजवळ आपली कथा सांगून रडले...कित्येक तारकांनी त्याच्याशी सलगी केली. पण हा नंतर कधीच बोलला नाही.

"करोडो वर्षांपासून हा असा एकाकी,निरपेक्ष,मौन राहिला.इतक्या मनस्वीपणे की मग तो एक तत्त्वच बनून गेला....नंतर जीवसृष्टी आली.वनस्पती,प्राणी,पक्षी आले.पण या सगळ्यांवर समुद्राचा खूप प्रभाव होता.सगळ्यांची नाळ अजून समुद्राशी जुळून आहे.तत्त्व बनून तो इथल्या प्रत्येकच गोष्टीत  भिनलाय.त्याच्या आदिम भरती-ओहोटीचे प्रतिबिंब प्रत्येक प्राणीमात्रात उतरलंय.... तीच लय.तेच नृत्य...
तुमचा श्वाशोच्छ्वास, तुमच्या हृदयाचे ठोके,तुमच्या चक्रीय शरीरक्रिया,स्त्रियांचे मासिकधर्म, संभोगाच्या उत्कट क्षणी होणाऱ्या शरीराच्या हालचाली.....तीच लय,तेच नृत्य...
निसर्गाचे ऋतुचक्र, जीवसृष्टीचे जन्म-मृत्यू, संस्कृत्यांचा उदय-ह्रास,अणू-रेणूंची कम्पणे...पौर्णिमेला भरतीनुसार उतू जाणारे वेड....तीच लय,तेच नृत्य..." 
"चंद्र त्याला सोडून दूर निघून गेला.पण असं दूर जाऊन कुणी कुणाचं प्रेम नष्ट करू शकतं थोडीच? रात्र रात्र हा चंद्राकडे बघत राहायचा.आणि मग पौर्णिमेला चंद्राचं पूर्णरूप  पाहिलं की त्याला गहिवरून यायचं. त्याचा अणु न रेणू घुसळून निघायचा.त्याला भरून यायचं . उंच उंच लाटांनी एकदाचं त्याला कवेत घ्यावं अशी उर्मी दाटून यायची.....पण चंद्र खूप दूर निघून गेला होता. आता समुद्र एकटाच आहे."
त्याचं हे ऐकत असताना समुद्राचं वैश्विक एकलेपण माझ्या अंगावर येत गेलं. हे असं युगानुयुगे अजस्र अस्तित्त्व घेऊन आणि उरात  गूढगहन  रहस्य दडवून  काहीच  न बोलता रहाणं....असं वर्षानुवर्षे नुसतं अस्तित्त्वात असण्याचा अर्थ काय?
समुद्राच्या असण्याचं प्रयोजन काय?.त्याचं ते समुद्राचं जगद्व्यापी विवरण माझ्या मेंदूच्या चिमटीत येत नव्हतं.  मी गोंधळून गेलो.
तो शांतपणे  तसाच दूर क्षितिजाकडे एकटक पहातच होता.
एकाएकी मला वाटलं हा स्वतःच तर समुद्र नसेल???
हा प्रश्न जसा माझ्या मनात उठला तसं त्याने पहिल्यांदा माझ्याकडे बघितलं.जणू माझ्या मनातला प्रश्न त्याला न सांगताच कळला होता.त्याचे अथांग डोळे....त्या गहणखोल नजरेने त्याने एकवार माझ्याकडे पाहिलं आणि नजर समुद्राकडे वळविली,थेट समुद्राच्या डोळ्यात जणू.
एक खिन्न छटा हास्याची त्याच्या चेहऱ्यावर उमटली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच तो अंतर्धान पावला.