घाटीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॉलेज लाईफचं एक अविभाज्य अंग 'गेट' ने व्यापलेल होतं. इथे सगळी सुख-दुख शेअर केल्या जातात...
पोरं जनरली फर्स्ट ईअरच्या शेवटी शेवटी 'गेट' च्या नादी लागतात. हळूहळू मग चहासोबत सिगारेटही हातात येते. अफझलच्या पानटपरीवर उधारी खातं उघडल्या जातं . 'गेट' वरचे चहा देणारे पोरे नावानिशी ओळखायला लागतात. गेटवर अधिकार गाजवणारा बल्क मात्र सेकंड/ थर्ड आणि थर्ड /फर्स्ट च्या पोरांचा असतो. रीडिंगमधून अभ्यास करून थकल्यावर किंवा संध्याकाळी होस्टेलवरून फ्रेश होऊन बाहेर पडल्यावर किंवा मार्केटमध्ये जायच्या आधी किंवा एक्झाम पेपर संपला की एप्रन , स्टेथो, pad घेऊन पोरं गटागटाने गेटवर येऊन बसतात...... गटातल्या संख्येनुसार मग 'एक-मे-दो' , 'दो- मे-चार', 'तीन-मे-छे' असल्या ऑर्डर्स झडतात. सिगरेटी पेटतात . चर्चा सुरु होतात.... नेमकाच viva संपलेला असला की- मास्तराने एखाद्याला कसं झापलं , अमुक विद्यार्थी cryopencil ला condom कसं म्हणाला, काहीच येत नसतानाही मी मास्तरला कसं चुत्या मारला... असले किस्से रंगतात. बाकी वेळी मग एकमेकांची खेचणं चालू असतं.
एखाद्याचं अफेअर सुरु होण्यात असलं की बाकीचे त्याला 'प्रपोज मार' म्हणून उचकवतात. नंतर ह्यानच प्रपोज मारून मुलीच्या शिव्या खाल्ल्या की "कसा गेम केला!" म्हणून एकमेकांना ( त्याच्याच पैशाने चहा पिऊन ) टाळ्या देतात! कुणा दोघांच वाजलेल असलं की इथे बाकीचे मित्र compromise घडवून आणतात. पेपर अवघड गेल्यामुळे कुणी डिप्रेस झालेला असला की त्याला धीर दिल्या जातो. ही धीर देण्याची 'गेट' ची एक खास पद्धत होती.
कुणी जर एखाद्याला विचारलं,
'झाला काय अभ्यास?"
आणि दुसरा म्हणाला,
"नाही रे, अजून काहीच वाचलं नाही. वाचलं तेही लक्षात राहत नाहीय. टेन्शन यायला लागलंय बे, मायला!"
तर तिसरा त्याला म्हणणार,
"झेपत नाही तर कशाला येताव बे MBBS ला ? तिकडच कुठेतरी बी. ए. फी. ए. करायचं असतं की! नाहीतर गावाकडं शेती करायची".
मग तो दुसरा एकदम धडपडून म्हणणार -
"म्हणजे तसं नाही रे. तसं एक रिविजन झालय. उगं जर्रासं वाचायचं राहिलंय. पण परिक्षा म्हटल्यावर वाटतंच ना जरा..."
यावर तो पहिला आणि तिसरा -कसा दुसर्याचा 'गुलूप शाट' केला म्हणून ख्या-ख्या करून हसणार.
घाटीमध्ये जे कॉलेज स्पेसिफिक jargon चलनात असायचं त्याच ओरीजीन 'गेट' हेच असत. 'गुलूप शाट' , 'धातू', 'PC', 'किर्र',' क्रोनिक', असे शब्द आणि 'संसारा उध्वस्त करी दारू, संसारच नका करू', 'मुलगा मुलगी भेद नसो, दोघांची मुतारी एक असो', 'ताट तांब्या वाटी, सबसे आगे घाटी' या स्लोगन्स- ही 'गेट'ची घाटीला देणगी होती!
या गेटवरच अडचणीतल्या मित्रांना उधाऱ्या दिल्या जायच्या, भांडणं मिटविल्या जायची, gatheringsचे प्लान्स आखल्या जायचे, 'जास्तीत जास्त चहा कोण पितो' असल्या शर्यती लावल्या जायच्या. कधी जर बाहेरच्या पोरांसोबत एखाद्याचं भांडण झालं तर अख्ख गेट त्या भांडणात हिरीरीने सामील व्ह्यायचं आणि बाहेरच्याला बद्दी मार द्यायचं .
इथे प्रत्येकाला ज्याची त्याची identity बहाल केल्या जायची. म्हणूनच गेट म्हणजे जसं पोरांसाठी एक व्यासपीठ होतं तसच वैद्यकीय विद्यार्ध्यांच्या आयुष्यात नेहमीच छळणाऱ्या तणावासाठी ते एक स्वच्छंद 'आउटलेट' होतं. एक विरेचन होतं....
गेट नसतं तर घाटीत होतात त्यापेक्षा कितीतरी पट आत्महत्या झाल्या असत्या!
अभ्यासू पोरे तर फक्त चहा पिण्यासाठीच गेटवर यायचे .पण तथाकथित वाया गेलेल्या 'क्रोनिक' पोरांना इथे आपल्यासारखे बाकीचे भेटायचे .त्यांच्या interaction मधून स्ट्रेसचा निचरा व्हायला मदत व्हायची .व्यसनी पोरांना इथे आपले alter -ego सापडल्यामुळे त्यांची व्यसने प्रतिष्ठीत व्हायची . 'गेट' एकंदरीतच या मागे पडलेल्या , हरवलेल्या पोरांना त्यांची अस्मिता मिळवून द्यायचं, असण्याला एक justification मिळवून द्यायचं... .आणि म्हणूनच 'गेट' बदनामही होतं! इथे studious , sincere पोरांची सत्ता चालत नसे .'New-comers ला व्यसनांची ओळख करून देणारे' , 'potentially हुशार पोरांना 'झोड' बनवणारे' , 'वाया जाण्यालाही प्रतिष्ठा मिळवून देणारे' म्हणून 'गेट'ची बरीच बदनामी होती . पण हे मान्य करूनही हेच 'gate -mechanism ' घाटीचं लाईफ healthy ठेवण्यासाठी ventilator चं काम करीत होतं! ते एक फार मोठं buffer होतं . एक असं shock - absorber की ज्याच्यामुळे कितीही मोठा धक्का ही मुलं बिनदिक्कत पचवू शकत ...
निकाल लागला आणि एखादा फेल झाला हे कळलं की त्याचे - सोबतच फेल झालेले , आधीच गेटवर येऊन बसलेले - मित्र तो आला की त्याच्याकडं पाहत खो -खो हसायचे .
"च्युत्या ! एका मार्कावरून कसं fail होतोस बे ? हे 'ठो' बघ , पंधरा मार्क कमी आहेत, अन सालं थिअरीत first-class आलंय सायकाड!
घे , सिगरेट घे , बस ”
असलाच एखादा attempt holder प्रपोज मारायला जाऊन तोंड पाडून परत आला की बाकीचे फिदीफिदी हसत आणि त्यातला सिनिअरमोस्ट मोठ्या नाटकी थाटात त्याला सांगत -
"अटेम्प्टवालों की कोई प्रेमकहाणी नहीं होती"
पुन्हा फिदीफिदी हसत जमावातला कुणीतरी त्याला म्हणत
" ईन काढ भडव्या आता . आणि माझा शर्ट धुवून परत दे "
इथे दांभिकपणाला अजिबात वाव नव्हता . एखादा कुणी फारच शहाणपणाचा आव आणीत प्रचारकी थाटात काही सांगायला लागला की ग्रुपमधला एकजण दुसर्यांकडे पाहून कुटील हसून, तोंडातला गुटखा चघळीत म्हणायचा,
"घ्या लिहून , नायतर बाबा जायचा निघून ’
या सगळ्या प्रकारात मार्दव किंवा नाजुकपण कुठेच नव्हतं. जे काही होतं ते राकट रांगडं सच्चेपण!